सातारा:-भाजपा इच्छुकांच्या मुलाखती लेक व्ह्यू ला पण, गर्दी मंत्र्यांच्या सुरूची बंगल्यावर…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

भाजपा इच्छुकांच्या मुलाखती लेक व्ह्यू ला पण, गर्दी मंत्र्यांच्या सुरूची बंगल्यावर…

सातारा दि: भारतीय जनता पक्षाने सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आपलं अस्तित्व निर्माण केले आहे. परंतु, आज रविवारी भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हॉटेल लेक व्ह्यू ला असल्या तरी सर्वाधिक गर्दी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या सातारा शहरातील सुरुची बंगल्यावरच दिसून आली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या नजरा आता ए.बी. फॉर्म बरोबरच सुरुची बंगल्यावर लागल्या आहेत. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
सातारा – जावळी विधानसभा मतदार सघाचे प्रतिनिधित्व करणारे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मजबूत पकड सातारा व जावळी तालुक्यात सोबतच कोरेगाव आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही आहे.

जिल्हा परिषद व सातारा, जावळी, कोरेगाव, कराड पंचायत समिती साठी इच्छुकांच्या मुलाखती भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्या मधूनच घेण्यात आल्या. तर पाटण तालुक्यातील इच्छुकांच्या बाबत स्वतः मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जोरदार तयारी भाजपाने केली आहे . सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी कमळ चिन्हाचा उमेदवार असेल आणि त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नेते , पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत आहेत. असे चित्र निर्माण केले असले तरी दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेने सुद्धा मित्र पक्षाच्या सहकार्याने भाजपला रोखण्यासाठी उघडपणाने मोर्चा बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. महिला उमेदवारांचे पती व त्यांचे नातेवाईक अधिक धडपड करताना दिसून येत होते. त्यामुळे महिला सबलीकरण करण्याचे दाणे अजून जात्यातच असून त्याचे पीठ होण्यास अजून काही काळ वाट पाहावी लागणार असे दिसते.
या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांच्या मुलाखतीसाठी सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू, गोडोली, सातारा. या ठिकाणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तरीही अनेक इच्छुक व त्यांच्या समर्थकांनी सातारा शहरातील मंत्री महोदय यांच्या सुरुची बंगल्यावर खूप मोठी गर्दी केली होती. याचा फायदा आजूबाजूच्या हॉटेल व्यवसायिकांना चांगलाच झाला आहे.तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांना बोलवावे लागले.
रविवारी दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता, सातारा तालुका. दुपारी १२ वाजता , जावळी तालुका. दुपारी १ वाजता , पाटण तालुका. दुपारी ३ वाजता, कराड तालुका. याप्रमाणे मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखती घेण्यासाठी सातारा जिल्ह्याची सर्वसमावेशक अशी एक समिती भारतीय जनता पार्टीतर्फे तयार करण्यात आली. या समिती मध्ये नामदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हा निवडणूक प्रभारी असल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.
सर्व इच्छुक उमेदवारांनी, आपापल्या तालुक्याच्या वेळेप्रमाणे उपस्थित राहावे. येताना उमेदवारी अर्ज विहित नमुन्यात भरून सोबत आणावा. तसेच राखीव जागेच्या इच्छुकांनी जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र, अर्जासोबत जोडावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा निवडणूक प्रभारी नामदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले , सातारा जिल्हा निवडणूक प्रमुख धैर्यशीलदादा कदम आणि जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले
यांनी केले होते. त्याप्रमाणे उमेदवारांनी मुलाखती दिल्या. आता फिल्डिंग लावण्यासाठी उमेदवारांचे नातेवाईक व समर्थक सज्ज झाले आहेत. महायुती एक संघ राहिली नसल्याने एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अवघड बनली असल्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे योग्य उमेदवार देण्याची प्रत्येक राजकीय पक्षाला आता काळजी लागलेली आहे. भाजपमध्ये नवख्या असलेल्या उमेदवारांना फारसा ज्ञान नसल्यामुळे पक्षाबद्दल मुलाखत घेणाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांना फारसे प्रश्न विचारले नाहीत . फक्त मतदार संघाची माहिती विचारल्याचे काही उमेदवारांनी प्रसारमाध्यमाला सांगितले.




