ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
वाई:-!! कृष्णाकाठी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांची कळवंड !! वाई नगरपरिषद निवडणूक.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) !! उडदामाजी काळे- गोरे !!
वाई नगरपरिषद निवडणूक.

निवडणार्यांनी काय निवडावे एकदम बवंडर हाय. पात्रं तीच तंबू मात्र वेगवेगळे, निकष काय तर निवडून येण्याची क्षमता. जसा वाई नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय तश्या पेंढा भरलेल्या वाघांच्या डरकाळ्या कृष्णातीरी घुमू लागल्यात. इच्छुक उमेदवारांच्या ताकतीचे आकडे कानावर पडायला लागले, निवडणूक खर्चासाठी लाखो-करोडोंची वार्ता होऊ लागली. मतदारांच मूल्य अगोदर ठरवलं जातयं साधारणपणे मताला १००० ते २००० हजार रुपये पाच वर्षाचे दिवस जवळपास १८२५ म्हणजे दिवसाला ५० पैसे ते १ रुपया, गंभीर्याने विचार केला तर मतदारांसाठी हा विषय लय हार्ड हाय.
दक्षिण काशीस वर्णावे ते काय, प्रघात पंडितांचं गाव, सुसंस्कृत, अध्यात्मिक, ज्ञानी, कर्तृत्ववान मंडळींचा वारसा लाभलेली नगरी. स्वातंत्र्यानंतर शहराची दहा पटीने लोकसंख्या वाढली, पूर्वीच्या काळी शहरात विणकारांचा उद्योग तेजीत होता असं जुनी मंडळी सांगतात. जसं उशाला धरण झालं तसं तालुक्याच्या बहुतांश भागात शेतीला बरे दिवस आले, स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे शहराच्या विकासाला खीळ बसली, सगळ्याच बाबतीत पीछेहाट बघायला मिळते.शैक्षणिक क्षेत्रात वाई शहरात एकमेव कॉलेज, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना इतर शहरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे खाजगी क्लासेसचा सुळसुळाट आहे. शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग समस्या कायमस्वरूपी वाईकरांच्या मानगुटावर आहेतच, कुठल्याही राजकीय नेतृत्वाला त्याचं सोयरं-सुतक नाही. शहरातील सोयीसुविधा, नागरिकांचे प्रश्न वर्षानुवर्षे तेच, उखडलेले रस्ते, गटारांची दुरावस्था, भारत पेट्रोलियमला लागून असलेला कचरा डेपो, कचऱ्याची विल्हेवाट लावण्या करीता कोटींचा खर्च, सुसज्ज क्रीडांगणाची वाणवा, गटार पाण्यावरील प्रक्रिया योजना फक्त चर्चेपुरत्या, पाण्याचा एसटीपी प्लांट बासणात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत आहे.शहरातील छत्रपतींच्या पुतळ्याचा विषय जेंव्हा प्रश्न म्हणून समोर येतो तेव्हा शहरातील समस्यांची तीव्रता लक्षात येते. आजअखेर नगर परिषदेच्या आजी-माजी कारभाऱ्यांना हे प्रश्न सुटले नाहीत, इच्छुक तसेच संभाव्य नगरसेवकांनाही त्याच्याशी काही देणं-घेणं नाही कारण तसा कोणी प्रयत्न करताना दिसत नाही ही दक्षिणकाशीतील करदात्यांची खरी शोकांतिका आहे.
अशा विदारक पार्श्वभूमीवर वाई नगरपरिषदेची निवडणूक येवू घातलीय. तालुक्यात मुख्य दोन राजकीय मतप्रवाह आहेत, सत्ताधारी व त्याविरोधी विचारसरणी. राज्यात युती, आघाडी मिळून सहा प्रमुख राजकीय पक्ष असल्याने राजकारणातील मुकादमांना भरपूर चॉईस आहे. एका ठिकाणी सर्व सत्ता एकवटल्याने सत्ताधाऱ्यांकडे भाऊ गर्दी आहे, साहजिकच नाराजांच्या सूरपाट्या, पळापळी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशावर चांगलाच भरणा आहे. युतीतील घटकपक्ष असणाऱ्या भाजपची स्वबळाची तयारी सुरू आहे परंतु फुटीर व पक्षनिष्ठा घाण टाकलेल्या टोळी मुकादमांमुळे त्यांचा रस्ता खडतर असल्याचं बोललं जातं, दुसरीकडे महाविकास आघाडीचीही जोरदार तयारी चालू आहे, वाई शहरात राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग लक्षणीय आहे परंतु आघाडीतही फुटीरांचं, पक्षद्रोह करणाऱ्यांचं पीक उदंड आहे ही वस्तुस्थिती आहे. तिसऱ्या आमदार गटाचे वाई नगरपरिषदेवर निर्विवाद वर्चस्व असल्यामुळे तिथं इच्छुकांची मांदियाळी असणं स्वाभाविक आहे. तेच तेच चेहरे आहेत, इथे नाहीतर तिथं काही करून उमेदवारी पदरात पाडून घ्यायची त्यासाठी प्रस्थापित नेत्यांच्या अंगणात इच्छुकांकडून जोर-बैठकांचा धडाका चालू आहे, उमेदवारी मिळेल तो पक्ष तीच निष्ठा असा एकंदरीत फंडा आहे. पाच-पाच वर्षे विजनवासात असणारे महाभाग अचानक निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या विकासाच्या वार्ता करायला लागले.
वाई नगरीतील जनता सोशिक आहे परंतु ठेकेदारांची अनागोंदी व स्थानिक राजकीय कुरघोड्यांमुळे वैभवसंपन्न अशा दक्षिणकाशीची झालेली गटारगंगा निमूटपणे पाहण्याशिवाय जनतेकडे दुसरा मार्ग नाही. पारंपरिक दोन विचारप्रवाहात नगरपरिषदेची लढत झाली तर ताटात काय आणि वाटीत काय अशी परिस्थिती होऊ शकते, आघाडीसह तीन पॅनल झाले तर मतदारांना पर्याय उपलब्ध होऊ शकतो अधिक चांगल्या उमेदवाराची निवड करणे सोयीचं होणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काँग्रेस पक्षाने सर्व प्रभागात उमेदवार देण्याची तयारी ठेवलीय ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. सामान्य परिस्थिती असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना ज्यांना समाजकार्याची ओढ आहे, वाई शहराच्या विकासाची तळमळ आहे अशांनी समोर येऊन निडरपणे उमेदवारी स्वीकारून तिसरा पर्याय उपलब्ध करून दिला तर सामान्य मतदार नक्कीच त्यांच्या पदरात मताचं दान टाकतील, लोकांना फक्त निष्कलंक, प्रामाणिक काम करणारा, शहरासाठी लढणारा सक्षम पर्याय हवा आहे तशी चर्चा आजमितीला शहरात चालू आहे. लोकांना खरंच पर्याय मिळेल का सालाबाद प्रमाणे आषाढी-कार्तिकी अनुभवायला मिळेल हे येणारा काळचं सांगेल.
क्रमशः
2) !! कृष्णाकाठी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांची कळवंड !! वाई नगरपरिषद निवडणूक.
निमित्त आहे साधारण ७ वर्षानंतर लागलेल्या वाई नगरपरिषद निवडणुकीचं.वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळा)चं निर्विवाद वर्चस्व आहे, मतदारसंघातील सर्व सत्तास्थाने त्यांच्या ताब्यात आहेत, सोबतीला महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद, राज्यसभा खासदारकी, जिल्हा बँकेचं अध्यक्षपद, साखरकारखाना, लाभार्थ्यांची भरमसाठ संख्या. एखादी निवडणूक लढण्यासाठी लागणारी साधनसामग्री, दारूगोळा अगदी भरगच्च कशाचीही कमतरता नाही, एवढं सर्व असूनही वाई विधानसभा मतदारसंघात जवळपास निम्म्याच्या बरोबरीने जनमत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे त्याला कारणंही तशीच आहेत, ऐन – केन प्रकारे विरोधकांचा आवाज दाबून टाकायचा सबकुछ मी, माझं, माझ्याकडं. वेगवेगळ्या संस्थांची मिळून जवळपास २० पेक्षा जास्त पदं स्वतःच्या घरात आहेत, आमच्याशिवाय तिन्ही तालुक्यांचा विकास होऊ शकत नाही ही दृढ भावना. कट्टर राजकीय विरोधक असणारी बहुतांश मंडळी वेगवेगळ्या पक्षात विखुरल्याने सक्षम पर्याय उभा राहू शकत नाही ही अनेक वर्षापासूनची समस्या आहे. विरोधात असणाऱ्या मंडळींचं एकत्रीकरण होत नाही हे यांचं बलस्थान.
चालूघडीला वाई नगरपरिषदेवर आमदार गटाचं वर्चस्व आहे, नगरपरिषद निवडणुकीत आपला प्रमुख विरोधक कोण असायला पाहिजे याचे भान विरोधी गटातील/ पक्षातील मंडळींना नाही ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न काही प्रमाणात झाला परंतु त्याला यश आले नाही. जिल्ह्यात काहीजणांची राजकीय भूक प्रचंड प्रमाणात आहे, अपचन झालं तरी भरत राहायचं हा त्यांचा स्थायीभाव, माणदेशच्या मंत्र्यांनी वाई नगर परिषदेची निवडणूक स्वतःच्या प्रतिष्ठेची बनवली आहे, या निवडणुकीचे सुकाणू स्वतःच्या हातात ठेवल्याने मुकादमांना लाखो, कोटींची भुरळ पडली तशा स्वबळाच्या बेंडकुळ्या काढायला सुरुवात झाली. अखेर संपूर्ण पॅनल उभे करता करता भाजपाची झालेली दमछाक सर्वांना माहीत आहे, वरकरणी वाई नगरपरिषदेची ही निवडणूक वाई शहरातील करदात्यांच्या, सामान्यांच्या हितासाठी, विकासासाठी वाटत असली तरी ती जिल्ह्यातील दोन विद्यमान मंत्र्यांमधील आहे, दोघांनीही ताकद पणाला लावलीय आणि हेच ह्या निवडणुकीचे खरं स्वरूप आहे. निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे राहिलेली मंडळी फक्त सारीपाटावरची प्यादी आहेत ह्यापेक्षा अधिक त्यांचे महत्त्व नाही. वाईच्या भवितव्याविषयी त्यांचा दुरान्वयेही संबंध असणार नाही असं बोललं जातं हेही तितकंच खरं आहे. यानिमित्ताने वाई तालुक्यातील जुनी, जाणती नेतृत्व निस्तेज झाली असं समजायला वाव आहे. तरुण चेहऱ्यांच्या उठपटांग हरकतींमुळे ही मंडळी सुरू व्हायच्या आतच संपण्याच्या मार्गावर आहेत असं खेदानं म्हणावसं वाटतं.
“मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है” ही भावना वाईतील मंत्र्यांची असावी तसेच माझं ते माझं आणि तुझं ते बी माझंच अशी वर्तणूक माणदेशी मंत्र्यांची राहिलेली आहे त्यामुळे वाई नगरपरिषदेचा प्रथमदर्शनी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना दिसतो, दोन्हीकडे पराकोटीची बदमाशी आहे जिकडे तिकडे मनी, मनी, मनी ५०० ते १०००० रु. ची खिरापत असं निवडणुकीदरम्यानच वातावरण असणार आहे, दारू आणि जेवणाळींचा विक्रम रचला जाईल. दक्षिणकाशीच्या झालेल्या गटारगंगेचे पात्र आणखीन रुंदावत जाणार, संस्कारी वाई शहराला नेत्यांच्या साठमारीमुळे अराजकतेचं स्वरूप येऊ शकतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत महाविकास आघाडी, इतर पक्ष व काही अपक्षांनी या निवडणुकीत सत्ताधीशांना टक्कर देण्याचा चंग बांधलाय, त्यांचा प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. वाई शहरातील मतदारांना तिसरा पर्याय उपलब्ध आहे, पैसा आणि सत्तेच्या नशेत धुंद असणाऱ्या जित्राबांना जागा दाखवण्याची चांगली संधी मतदारांना आहे. शहराच्या विकासाची तळमळ असणारे अनेक चेहरे आहेत ज्यांच्या नीतिमत्तेविषयी, प्रामाणिकपणाविषयी खात्री आहे अशांनाच या निवडणुकीत मतदान करून नगरपरिषदेत पाठवलं तर सत्ताधाऱ्यांच्या बेलगाम वागणुकीला बऱ्यापैकी पायबंद घालता येईल, ती पर्यायी सुवर्णसंधी आमजनतेच्या हातात आहे.
नगराध्यक्षपद हे थेट जनतेतून असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे, सर्वांचे मतदान असल्याने दुसऱ्या विचारांचा व्यक्ती नगराध्यक्षपदी बसला तरी विशेष फरक पडू शकतो. यापूर्वी अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत. भाजपा, राष्ट्रवादी, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात आहे. आघाडी-युतीच्या राजकारणात लुप्त झालेले काँग्रेसचं चिन्ह पुन्हा पर्याय म्हणून जनतेसमोर आहे, अपक्ष एक उमेदवार आहे. काही झालं तरी दोन्हीपैकी एक कोणीतरी सत्तेत येणार ही परिस्थिती वाई मध्ये नाही, इथे पर्याय उपलब्ध आहे त्याचा निर्णय सर्वस्वी सर्वसामान्यांच्या हातात आहे.
हलत्या, चालत्या धडावर डोकं असतं ते चांगल्या वाईटाचा विचार करून शकतं, निर्णय घेवू शकतं, त्याचा जनतेने सारासार विचार करून मतदान केलं तर स्वच्छ, सुंदर, सुजलाम, सुफलाम वाईनगरी भविष्यात सगळ्यांचे डोळे दिपवून टाकेल यात मात्र शंका नाही.
3) !! नायक नही खलनायक हू मैं !!
वाई नगरपरिषद निवडणूक २०२५
वर्षभर शेतात काम करून दगड, मातीत, चिखलात राबून आपल्या धन्याची खळगी भरणाऱ्या बैलाच्या नशिबात बेंदराच्या/पोळ्याच्या रूपाने एक सुखाचा,आनंदाचा, आरामाचा, गोडकौतुकाचा दिवस येतो. मुकाप्राणी असलातरी शेतकऱ्यांच्यामनी त्याच्याप्रती कृतज्ञता भाव असतो, एका दिवसाकरता तो शेतकरी कुटुंबाचा नायकच असतो. भारतवर्षात मतदानाचा अधिकार असलेल्या व्यक्तीला लोकशाहीचा आत्मा मानलं गेलंय, सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय, नोकरी करून मतदार कराच्या रूपाने शासनाची झोळी भरत असतो. लोकशाहीत राज्यघटनेने नेमून दिलेल्या प्रत्येक ५ वर्षानंतर सार्वत्रिक निवडणूक जाहीर होत असते, निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदाराच्या नशिबीही काही दिवस आनंदाचे, सोनियाचे येतात. मतदारांचं गोडकौतुक, जयजयकार होत असतो. विशेषणं काय तर पवित्रदान, पवित्र दागिना, लोकशाहीचा मानबिंदू वगैरे, वगैरे दरम्यानच्या काळात उमेदवाराकडून मतदारांचे सर्व प्रकारचे लाड पुरवले जातात त्यांच्यासाठी वाट्टेल ते, सगळीकडे आनंदी-आनंद असतो. मतदार एकदाचा मतदान करून मोकळा झाला की पुढची ५ वर्षे हाताश होवून निर्विकारपणे सत्ताधाऱ्यांकडून चालवलेला तमाशा बघण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच उरत नाही, सामान्यपणे होऊन गेलेल्या निवडणूक काळातील कृतीची मतदाराच्यामनी पश्चातापाची भावना असते. चुका करणं हा मनुष्यप्राण्याचा स्थायीभाव आहे, प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडून मतदार वारंवार चुका करतो ही वस्तुस्थिती आहे.
येवू घातलेली वाई नगरपरिषदेची निवडणूकही त्याला अपवाद नाही. प्रस्थापित राजकारण्यांच्यालेखी सामान्य मतदारांच्याप्रति असणारी भावना म्हणजे “मुकी बिचारी कशीही हाकावी” अशीच असते, दामूअण्णांचा (पैशाचा) प्रभाव असाकी सामान्य मतदारांची मती गुंग होते. ऐतिहासिक काळापासून महत्व लाभलेली, कृष्णातीरी वसलेली वाईनगरी विकासाच्या,समृद्धीच्या कसोटीवर मात्र दिवसेंदिवस संकुचित होत गेली. वाई तालुक्यातील राजकीय कारभाऱ्यांनी मनात आणलं असतं तर वाई शहर ऐक उत्कृष्ट फिल्मसिटी बनू शकलं असतं, शहराच्या चारही बाजूने पर्यटनवाढीस मुबलक वाव असताना त्यापद्धतीची धोरणं राबवली गेली नाहीत, धरणाच्या पाण्यावर होणारं विमानतळ एक आख्यायिका बनूण राहिलं, धोम-पाचगणी रोपवे त्याच पठडीत गेलं, एमआयडीसीची दुरावस्था, रोजगार समस्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढ होत आहे. वाईसारख्या सांस्कृतिक शहरात एखादं नाट्यगृह नसावं? छत्रपतींच्या पुतळा उभारणी जागेचं भूमिपूजन नव्वदीच्या दशकात झालं असल्याची माहिती आहे, आज तागायत ते पूर्णत्वास गेलं नाही. पाचगणी-महाबळेश्वर ह्या पर्यटण स्थळांमुळे वाईत पर्यटकांचा राबता कायम असतो, वाई हे तालुक्याचे ठिकाण आहे का डम्पिंग ग्राउंड असा प्रश्न बाहेरच्या लोकांना पडतो ही गोष्ट खरी आहे. ज्ञानपंढरी म्हणून वाखाणलेल्या वाईचं बकालपण अगदीच बोलकं आहे, इथं कशाचीच कमी नाही विकासासाठी, उद्योग- व्यवसायाकरता लागणारी सिद्धता,उपयुक्तता अगदी मुबलक प्रमाणात आहे, वाई शहरातील वातावरण जगण्यासाठी आदर्श मानलं जातं,इथे ना नेत्यांची कमी ना विद्वानांची कमी परंतु गेल्या २५-३० वर्षात प्रामुख्याने दोन गटांचा राजकीय प्रभाव शहरावर राहिलेला आहे, आमदार खासदार, मंत्रीपद सर्व सत्तास्थाने मिळाली परंतु वाई शहरात काही विशेष बदल झाला नाही, त्याच समस्या, त्याच व्यथा मागच्या पानावरून पुढे. आलटून,पालटून त्याच राजकारण्यांनी वाई नगरपरिषदेची सत्ता उपभोगली. होवू घातलेली नगरपरिषद निवडणूक ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच होत असल्याचे चित्र आहे, सोंगट्या फक्त बदलल्यात तेच काय ते नाविन्य. इथला तिथं आणि तिथला इथं. नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना त्या पदाचे महत्व,जबाबदारी याचे गांभीर्य आहे का?त्यांना स्वतःच मत, विचार, कल्पना पालिकेत मांडन्याचे ते राबवण्याचे अधिकार
नेत्यांकडून मिळणार आहेत का? हे सगळे संशोधनाचे विषय आहेत.अलीकडेच संभाव्य नगरसेवकांकडून पारदर्शक कारभार करण्याबद्दल बॉण्डपेपरवर शपथपत्र लिहून घेण्याची प्रथा साकोली शेंदूरवाफा शहरात सुरू झाली आहे तसा प्रयोग वाईत करण्यास काय हरकत आहे?
कुठल्याही संस्थेत सत्ता एका विचारांची असावी असा लोकशाहीचा संकेत आहे त्यायोगे संस्थेची,समाजाची उन्नती साधली जाते परंतु हाच संकेत वाईच्या बाबतीत मात्र आजार, व्याधी म्हणून समोर आला आहे. एकहाती सत्ता मनमानी, दडपशाहीला खतपाणी घालते त्याचे भोग वाईकर जनता आजतागायत भोगतेय. ह्या निवडणुकीत सर्वसत्ता एका ठिकाणी एकवटता कामा नये, दोन प्रमुख प्रस्थापितांना नेहमीच आळीपाळीने सत्ता मिळाली आहे त्यांच्या लबाड्या, अपयश, नाकर्तेपणा प्रत्येकवेळी सिद्ध झाला आहे ही वस्तुस्थिती आहे.ह्या निवडणुकीत काँग्रेस(हाताचा पंजा), राष्ट्रवादी(तुतारी),शिवसेना, अपक्ष असे मिळून साधारण १७ उमेदवार पर्याय म्हणून रिंगणात आहेत, ह्या मंडळींना मतदारांनी साथ दिलीतर नगरपरिषदेचं चित्र बदलू शकतं, वाई शहराचा इतिहास-भूगोल बदलू शकतो तेवढं सामर्थ्य सामान्य माणसाच्या एका मतात आहे. त्रिशंकू परिस्थिती हे सत्ता अस्थिरतेचे लक्षण मानलं जातं परंतु वाई शहराला त्याची गरज आहे. कारभाऱ्यांवर वचक ठेवायचा असेल तर सत्ता एकहाती लबाडांच्या हाती जाणार नाही याची दक्षता सूज्ञ वाईकरांना घ्यावी लागणार आहे, रात्र वैऱ्याची आहे, ही निवडणूक उमेदवारांपेक्षा मतदारांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. नगराध्यक्षपदाचे प्रस्थापित दोन गटांचे उमेदवार म्हणजे नवकोट नारायण! इकडून तिकडे, तिकडून इकडे हीच त्यांची पात्रता, योग्यता. नगराध्यक्षपदासाठी पर्याय म्हणून काँग्रेसचा उमेदवार मतदारांसमोर आहे, मतदारांनी सूज्ञपणे मतदान केलं तर प्रस्थापितांचे आडाखे बिघडू शकतात, नवीन विचाराला संधी मिळू शकते त्यातच वाईकरांचं हित असेल असं म्हणावसं वाटतं.
तेव्हा वाई नगरपरिषद निवडणुकीत सक्षम पर्याय म्हणून उभे असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी(तुतारी), शिवसेना व अपक्षांना निवडून नगरपरिषदेत पाठवलं तर भविष्यात काहीतरी आशादायी चित्र दिसेल अन्यथा येणारी पुढची पिढी आपणास माफ करणार नाही. आज नायकाच्या भूमिकेत असलेल्या मतदाराला “नायक नही खलनायक हू मैं” अशी स्वतःचीच संभावना करत, स्वतःलाच दुगण्या झाडत पुढची ५ वर्षे व्यतित करावी लागतील हे मात्र निश्चित.
4) !! थोडी खुशी थोडा गम !! वाई नगरपरिषद निवडणूक २०२५
नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने कृष्णातरी दोन सत्ताधीशांत लागलेली कळवंड अखेर बरोबरीत सुटली. बक्कळ रसद व वारेमाप सत्ता पाठीशी असल्यामुळे दोघांनाही आलेली राजकीय सूज जागरूक मतदारांनी कमी केली त्याबद्दल वाई शहरातील सर्व मतदारांचे त्रिवार अभिनंदन. तालुक्यातील जनता विचार करू लागल्याचे हे द्योतक आहे. ह्या निवडणुकीत तुटपुंज्या साधनसामग्रीच्या बळावर सत्ताधीशांशी दोन हात करण्याची हिम्मत दाखवणाऱ्या काँग्रेस,राष्ट्रवादी व अपक्षांचे विशेष अभिनंदन. स्थानिक पातळीवर कोणासोबतही साठ-गाठ करण्याचे सर्वपक्षीय संकेत असताना ह्या मंडळींनी रामशास्त्री बाणा दाखवला व आपली भूमिका मतदारांसमोर मांडली हीच गोष्ट भविष्यात तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलण्यास मदत करणारी आहे.
हल्लीच्या राजकारणात कुठलीही निवडणूक लढण्यास उमेदवारीसाठी विशेष मापदंड लावले जातात प्रामुख्याने सर्वर्थाने सक्षम पैलवानांना पहिली पसंती असते, नैतिकता, नितिमूल्ये, प्रामाणिकपणा या गोष्टींना सोयीस्कर तिलांजली दिली जाते ह्या परिस्थितीला सर्वच राजकीय विचारधारा / पक्ष समानपातळीवर जबाबदार आहेत, अशा पक्षीय ध्येय- धोरणांमुळे मुळे राजकारणात अपप्रवृत्ती, समाजविघातक अनुयायी वाढीस लागतात अशाच मंडळीचा निवडणुकीत प्रभाव राहतो, हा विचार त्यांच्या पथ्यावर पडतो ही वस्तुस्थिती आहे. वाई तालुक्याच्या राजकारणातील या मस्तवाल सत्ताधीशांचा वारू मतदारांनी समर्थपणे रोखला तर दुसरीकडे सर्वप्रकारचे राजकारण कवेत घेण्याची असूया बाळगणाऱ्या शुक्राचार्यांना सामान्य जनतेने त्यांची जागा, योग्यता दाखवली. नगराध्यक्षपद भाजपच्या पारड्यात गेल्याने सत्ता असून नसल्यासारखी भावना वाईतील आमदार गटाची असणार अर्थात अतिरेकी वर्तणुकीचं फळ त्यांच्या पदरी आलं,त्यायोगे भवीष्यात घोडेबाजार चालू झाला तर नवल वाटायला नको. निवडणूकीपूर्वी एकतर्फी वाटणारी राजकीय परिस्थिती अनिल सावंतांच्या भाजपा प्रवेशामुळे रंगतदार अवस्थेत पोहोचली. भाजपाला मिळालेल्या यशानं माजी आमदारांच्या अंगावर मुठभर मांस वाढणं साहजिक आहे, बऱ्याच दिवसानंतर त्यांनी स्वतः जातीनिशी लक्ष देऊन प्रयत्न केल्याचे दिसते.आता मात्र पुढे श्रेयवादासाठी संघर्ष चालू होईल, आयाराम गयारामांची मांदियाळी येईल एवढं मात्र निश्चित.
ह्या निवडणुकीत दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप अनेकप्रकारचे वादे होणार होते ते झालेही परंतु ही निवडणूक सर्वार्थाने गाजली ती दरम्यानच्या काळातील दामूअण्णांच्या(पै.) प्रभावाने, सामान्य व्यक्ती कल्पनाही करू शकत नाही इतका अर्थपूर्ण स्वैराचार निवडणूक काळातील किस्से ऐकल्यावर डोळे पांढरे होण्याची वेळ येते. वाईतील उमेदवार कित्येक लाखांनी, कोटींनी दानशूर झाले, काहींची आयुष्यभराची पुंजी कामी आली, एवढं सगळं करून नगरपरिषदेत गेल्यानंतर त्या नगरसेवकाच्या मताला, विचाराला, कल्पनेला कितपत वाव मिळेल हा एक संशोधनाचा विषय ठरू शकतो, निवडून गेलेले नगरसेवक खरंच जनहिताची काम करतील का पाच वर्ष नेत्यांच्या अंगणात दंडवाट घालत बसतील हे येणारा काळच सांगेल. निवडणुकीदरम्यान उमेदवारांकडून, राजकीय विश्लेषकांकडून, पत्रकारांकडून विकासाच्या अनेक गोष्टींचा उहापोह झाला, विकासकामांची यादी फार मोठी आहे. शहरातील काही समस्या ज्वलंत आहेत जसे की वाहतूकसमस्या, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा इत्यादी रोजच्या जीवनाशी निगडित आहेत प्रामुख्याने या विषयांचे निवारण करण्याचे शिवधनुष्य नूतन पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. प्रत्येकवेळची वाई नगरपरिषदेची निवडणूक ही मतदारसंघातील आगामी राजकारणाची दिशा निश्चित करते असं जाणकार सांगतात त्यामुळे पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा सामान्य मतदार सत्तापीपासूंचा असाच माज उतरवेल असं मानायला वाव आहे.
संघटनापातळीवर असणाऱ्या अनास्थेमुळे तालुक्यातील महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला, याला संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता समजायचं का ? तालुक्यात प्रभाव असूनही राष्ट्रवादीच्या (तुतारी)पदरी निराशा आली, काँग्रेस विचार अजूनही घरोघरी आहे परंतु पक्ष म्हणून काँग्रेस निद्रिस्त अवस्थेत आहे, दिवसेंदिवस पक्षाच्या चिंतेत वाढ होत आहे असं हे खेदानं म्हणावसं वाटतं, नेहमीच आक्रमक असणारे शिवसेना(मशाल)ह्या निवडणुकीत प्रभावीहीन राहीली,असो.
तथाकथित लोकशाही मार्गाने निवडून आलेले सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष अभिनंदनास पात्र आहेत. सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचं ओझं त्यांच्या खांद्यावर आहे त्याच्या निवारणाकरिता निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीस अनेक, अनेक शुभेच्छा.
✍🏻 कल्याण पिसाळ देशमुख, ओझर्डे.
सरचिटणीस-सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी.
फोन – ९८५०४१२९०९.




