वाई:- किसन वीर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.12
किसन वीर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.
यशस्वी जीवनाची वाटचाल कष्टाविना पूर्ण होत नाही. आपणाला यश हवं असेल तर त्याला कठोर परिश्रम घ्यावेच लागतील. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शॉर्टकट रस्त्याला बगल दिली पाहिजे. मी २५ वर्षांपूर्वी या महाविद्यालयात आलो होतो परंतु आज आल्यावर मला या महाविद्यालयात आमुलाग्र बदल दिसून येतो. हे केवळ जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या कष्टाचं फलित आहे. अलीकडे समाजाला कष्ट घेणाऱ्या व्यक्ती आवडत नाहीत असे लक्षात येते आणि जे कष्टविना समाजकारण करतात त्यांना मात्र लोक डोक्यावर घेऊन नाचतात. ही सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, कष्ट करून आपले भविष्य उज्वल करावे. या महाविद्यालयात विद्यार्थी संख्या प्रचंड आहे. केवळ बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनीच या कार्यक्रमाचा हॉल भरून उरलेला आहे. परंतु ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनीही या कार्यक्रमात सहभागी झाले असते तर बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची प्रेरणा त्यांनाही मिळाली असती”असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवी व माजी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले होते. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी, पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष श्री. भिमराव पटकुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, श्री. भैय्यासाहेब जाधवराव, प्रा. रमेश डुबल, श्री. चंद्रकांत इंगवले, तसेच तीनही शाखांचे उपप्राचार्य इ. मान्यवर उपस्थित होते. डॉ. विठ्ठल वाघ पुढे म्हणाले की, “साहित्य हे जीवनाला आकार देणारं औषध आहे. आपल्या भावना गद्यात्मक स्वरूपात प्रकट न करता सौंदर्यात्मक शैलीत, काव्यमय शैलीत प्रतिमा, प्रतिकांचा वापर करून केला तर त्या भावना आपल्या हृदयापर्यंत पोहोचू शकतात’’. याप्रसंगी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी त्यांच्या खास शैलीत आपल्या कवितांचे सादरीकरण करून उपस्थित विद्यार्थी रसिक यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले म्हणाले की, “पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने आज या कार्यक्रमात साहित्याच्या पंढरीतील विठ्ठल उपस्थित आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला एक आध्यात्मिक वातावरण निर्माण झालेले आहे. याप्रसंगी ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालेले आहे त्यांचे मी मनापासून कौतुक करतोच परंतु ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळालं नाही त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कै. किसन वीर (आबा), स्व.प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये जनता शिक्षण संस्थेची जडणघडण कशी झाली? तसेच महाविद्यालयामध्ये कोणकोणत्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाच्या शैक्षणिक अहवालाचे वाचन कार्याध्यक्ष श्री. भिमराव पटकुरे यांनी केले. क्रीडा व एन.सी.सी. या विभागाचे अहवाल वाचन कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी केले. एन.एस.एस विभागाचे अहवाल वाचन डॉ. संग्राम थोरात तर कला व सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन डॉ. धनंजय निंबाळकर यांनी केले. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्यानिमित्त महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, एन.सी.सी. व एन.एस.एस या क्षेत्रामध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे कवी डॉ. विठ्ठल वाघ व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे यांनी आभार मानले. तर श्रीमती रेश्मा मुलानी व श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी किसन वीर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ शाखेतील आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी, पालक, एन.एस.एस., एन.सी.सी. तसेच कला व सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.