पुणे पिंपरी:-पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी – आयुक्त शेखर सिंह.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी – आयुक्त शेखर सिंह.
पिंपरी, दि. ६ (शफिक शेख) :- नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून त्यासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पर्यावरण पूरक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
हवेतील प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच हवेची दैनंदिन प्रदूषण पातळी तपासण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि परिसर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे फुफ्फुसाचे बिलबोर्ड (वायू गुणवत्ता दर्शक फलक) बसविण्यात आले असून या बिलबोर्डचे अनावरण आयुक्त तथा प्रशासक शेखर सिह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. आयुक्त शेखर सिंह म्हणाले, थर्मोमिटर जसे शरीरातील ताप दर्शवते तसेच बिलबोर्ड वायुतील प्रदूषण दर्शवते, बिलबोर्ड बसवणे हा महापालिकेचा वेगळा उपक्रम असून शहरामध्ये विविध ठिकाणी असे बिलबोर्ड बसविण्याचा महापालिकेचा मानस आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बसविण्यात आलेल्या फुफ्फुसाच्या बिलबोर्डमध्ये फुफ्फुसांची भव्य प्रतिकृती पांढऱ्या फिल्टरपासून बनवलेली आहे. आपल्या श्वासावाटे परिसरातील हवा शरीरातील फुफ्फुसांमध्ये जाते, त्याच प्रकारे या प्रतिकृतीच्या मागच्या बाजूला पंख्यांची जोडी लावली असून त्याद्वारे हवा आत खेचली जाते. पंख्यांच्या या हालचालींमुळे विविध स्रोतातून हवेत पसरणारे पार्टिक्युलेट मॅटर हे प्रदूषक या प्रतिकृतीमध्येही जाईल. पुढील काही दिवसात वा आठवड्यात त्याचे परिणाम ठळकपणे दिसून येतील, म्हणजे फुफ्फुसाच्या प्रतिकृतीचा पांढरा रंग आधी तपकिरी व नंतर काळा होईल. परिसरातील हवेची गुणवत्ता त्या त्या वेळी कशी आहे हा ‘हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक’ दाखवणारा डिजिटल मॉनिटर या प्रतिकृतीसोबतच लावण्यात आलेला आहे.
यावेळी संजय कुलकर्णी, रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, विनोद जळक, अनिल भालसाखळे, प्रा. डॉ. दिपाली गायकवाड, सोहम निकम, योगेश अल्हाट, रणजीत गाडगीळ, श्वेता वेर्णेकर, शर्मिला देव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.