वाई:-हरवलेला मोबाईल शोधण्यात वाई पोलिसांची कमाल! काही वेळातच लावला छडा; मालकाला केला सुपूर्द.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-हरवलेला मोबाईल शोधण्यात वाई पोलिसांची कमाल! काही वेळातच लावला छडा; मालकाला केला सुपूर्द.

लोकेशन ट्रेसिंगच्या मदतीने पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; शिक्षकाचा हरवलेला मोबाईल सुखरूप परत.
सातारा | वाई, दि. १९ : हरवलेली वस्तू पुन्हा मिळण्याची आशा मावळत असतानाच वाई पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका शिक्षकाला मोठा दिलासा मिळाला. वाई एसटी बसस्थानक परिसरात गहाळ झालेला मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे काही वेळातच शोधून काढत मालकाच्या हातात सुपूर्द केला. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धर्मपुरी (वाई) येथील शिक्षक मिहीर अभिजीत कलंत्रे यांचा बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास वाई एसटी बसस्थानक परिसरात मोबाईल हरवला. परिसरात शोधाशोध करूनही मोबाईल न मिळाल्याने त्यांनी अखेर वाई पोलीस ठाणे गाठले.
तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस हवालदार ज्योतेष सकपाळे आणि पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे यांनी घटनास्थळी जाऊन मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. तांत्रिक माहिती आणि प्रत्यक्ष शोधमोहीम यांच्या मदतीने पोलिसांनी गहाळ झालेला मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले.
त्यानंतर कोणताही विलंब न करता मोबाईल मूळ मालक मिहीर कलंत्रे यांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलिसांच्या वेगवान प्रतिसादामुळे हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण नव्हे, तर नागरिकांच्या छोट्या-मोठ्या अडचणींतही तत्परतेने मदतीचा हात देणाऱ्या वाई पोलिसांनी या कृतीतून कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय दिला आहे.
2) सातारा:-२७ वर्षांची विश्वासाची परंपरा! आरफळच्या शेतकरी, उद्योजकांसाठी वाई अर्बन बँकेची शाखा ठरली आर्थिक आधार

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या शाखेचा वर्धापन दिन उत्साहात; गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव, कर्जदारांना वाहनांच्या चाव्यांचे वाटप.
सातारा | आरफळ, दि. १९ : ग्रामीण भागातील शेतकरी, बागायतदार आणि व्यावसायिकांच्या आर्थिक प्रगतीत बँकिंग संस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हीच सामाजिक व आर्थिक बांधिलकी जपत दि वाई अर्बन बँकेच्या आरफळ शाखेने गेल्या २७ वर्षांपासून परिसरातील नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत आर्थिक विकासाला हातभार लावला आहे. शेतकरी आणि व्यावसायिकांसाठी ही शाखा खऱ्या अर्थाने आर्थिक आधारवड ठरली आहे, असे गौरवोद्गार आरफळच्या सरपंच अर्चना शेखर भोसले यांनी काढले.
आरफळ येथील दि वाई अर्बन बँकेच्या शाखेचा वर्धापन दिन आणि स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. संत हैबतबाबांच्या पुण्यभूमीला कृष्णा नदी आणि कालव्याच्या पाण्यामुळे समृद्ध बागायतीचा वारसा लाभला आहे. अशा कृषिप्रधान परिसरातील शेतकरी, बागायतदार तसेच सर्वसामान्य कुटुंबांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात बँकेचे योगदान मोलाचे असल्याचे भोसले यांनी नमूद केले.
उपसरपंच श्रीकांत साबळे यांनी शाखेच्या अलीकडील तीन वर्षांतील प्रगतीचा विशेष उल्लेख केला. ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखत कर्मचारी देत असलेली तत्पर, आपुलकीची आणि विश्वासार्ह सेवा हीच शाखेची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.
पालक संचालक महेश राजेमहाडीक यांनी शाखेच्या २७ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ग्रामीण भागातील मर्यादित उलाढालीच्या शाखेनेही सातत्यपूर्ण कामकाजातून शेतकरी, व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा समर्थपणे पूर्ण केल्या आहेत. ग्राहकांचा विश्वास हीच बँकेची सर्वात मोठी ताकद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात ज्युदो-कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सलोनी भगवान पवार हिचा बँकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच बँकेच्या कर्जसुविधेचा लाभ घेऊन नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मान्यवरांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. या माध्यमातून बँकेच्या आर्थिक सहकार्यामुळे ग्राहकांची स्वप्ने प्रत्यक्षात साकार होत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले.
कार्यक्रमास बँकेचे संचालक ॲड. बाळकृष्ण पंडित, रमेश ओसवाल, काशीनाथ शेलार, रामचंद्र कानडे, सरव्यवस्थापक संतोष बागुल, उपसरव्यवस्थापक सुहास पानसे, प्रसाद कुंभारे उपस्थित होते. सहायक सरव्यवस्थापक शामराव झोरे यांनी सूत्रसंचालन केले. शाखाधिकारी महेश जाधव यांनी आभार मानले, तर ओंकार गुरव याने पसायदान सादर केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या प्रभा पवार, पूजा पवार, माजी उपसरपंच वैभव पवार, बँकेचे पालक अधिकारी जे. पी. शिंदे, उमेश पवार, शरद कदम, नितीन साबळे, युवराज पवार, विजय पवार, किरण कदम, उमेश शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3) सातारा:-जिल्हा बँकेत सत्तेचा सारीपाट फिरला! भाजपचे नऊ संचालक असूनही राष्ट्रवादी-शिवसेनेने सत्ता खेचली.

१२ संचालकांची एकजूट ठरली निर्णायक; ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर अध्यक्ष, तर दीपक चव्हाण उपाध्यक्षपदी बिनविरोध.

सातारा |सातारा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेची गणिते अखेर बदलली आहेत. संचालक मंडळात सर्वाधिक नऊ जागा जिंकूनही भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आणि शिवसेनेचे चार अशा १२ संचालकांनी एकत्र येत बहुमताचे समीकरण जुळवले आणि बँकेच्या सत्तेवर आपली पकड निर्माण केली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. या निकालाने जिल्ह्यातील महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
सातारा जिल्हा बँकेच्या २१ संचालकांच्या निवडणुकीत भाजपने नऊ जागा मिळवत सर्वाधिक संख्याबळ प्राप्त केले होते. त्यामुळे अध्यक्षपदावर भाजपचाच दावा राहणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मंत्री जयकुमार गोरे यांनी अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे स्पष्ट केले होते. तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक पातळीवरील चर्चेतून निर्णय होण्याचे संकेत दिले होते.
मात्र, प्रत्यक्ष सत्तास्थापनेच्या वेळी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्रित रणनीती आखत १२ संचालकांची मोट बांधली. या संख्याबळामुळे भाजपचे नऊ संचालक असूनही अध्यक्षपदाचा मार्ग बंद झाला. पडद्यामागे झालेल्या राजकीय जुळवाजुळवीने जिल्हा बँकेतील सत्तेचा सारीपाटच बदलून टाकला.
बुधवारी सकाळपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय बैठकांना वेग आला होता. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भाजपच्या संचालकांची बैठक पार पडली. दुसरीकडे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येत पुढील रणनीती निश्चित केली. या बैठकांमधूनच सत्तास्थापनेचे अंतिम गणित आकाराला आल्याचे चित्र आहे.
त्यानंतर अध्यक्षपदासाठी ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि उपाध्यक्षपदासाठी दीपक चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यामुळे संचालक मंडळातील सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला बँकेच्या नेतृत्वाची संधी मिळू शकली नाही.
नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे दिवंगत सहकारमहर्षी विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र आहेत. कराड उत्तर परिसरातील प्रभावी राजकीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. रयत सहकारी साखर कारखाना आणि कोयना सहकारी बँकेच्या नेतृत्वाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदामुळे आता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील त्यांच्या भूमिकेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपाध्यक्षपदी विराजमान झालेले दीपक चव्हाण हे फलटणचे माजी आमदार असून, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्हा बँकेच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाल्याने सहकार क्षेत्रातील त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे.
या सत्तासमीकरणामागे जिल्हा परिषद निवडणुकीतील घडामोडींची पार्श्वभूमी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जिल्हा परिषदेत भाजपने अवघ्या एका मताच्या फरकाने सत्ता मिळवली होती. या प्रक्रियेनंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा होती. त्याचे पडसाद जिल्हा बँकेच्या सत्तावाटपात उमटल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता मिळवली, मात्र जिल्हा बँकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्रित ताकद दाखवत नेतृत्वाची पदे मिळवली. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षांमधील स्थानिक राजकीय समीकरणे, परस्पर समन्वय आणि सत्तेच्या वाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नऊ विरुद्ध बारा अशा संख्याबळाच्या या राजकीय गणिताने सातारा जिल्हा बँकेतील नेतृत्व बदलले आहे. आता नव्या संचालक मंडळाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील कारभाराला कोणती दिशा मिळते आणि या एकजुटीचे पडसाद आगामी राजकीय घडामोडींमध्ये कसे उमटतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
4) वाई:-तपास यंत्रणेची मुदत चुकली; दोन आरोपींना डिफॉल्ट बेल मंजूर!

ॲड. ऋषिकेश सकुंडे यांचा न्यायालयात प्रभावी युक्तिवाद; प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्ततेचे आदेश.

वाई | दि. १९ : तपास यंत्रणेकडून निर्धारित वैधानिक मुदतीत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने दोन आरोपींना डिफॉल्ट बेलचा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. वाई येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले. आरोपींच्या वतीने ॲड. ऋषिकेश आनंद सकुंडे यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद या निकालात महत्त्वपूर्ण ठरला.

वाई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७७/२०२६ अन्वये आर्म्स ॲक्ट कलम ३ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबर २०२६ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र, कायद्यानुसार निर्धारित ६० दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यात तपास यंत्रणेला यश आले नाही.
त्यानंतर आरोपींच्या वतीने ॲड. ऋषिकेश आनंद सकुंडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १८७ अन्वये डिफॉल्ट बेलसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान त्यांनी आरोपींच्या वैधानिक जामीन हक्काची कायदेशीर बाजू ठोसपणे मांडली. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे सुरेश कुमार भिकाणचाँद जैन , राकेश कुमार पॉल आणि उदय मोहनलाल आचार्य या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयांचा संदर्भ देत प्रभावी युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध कागदपत्रांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपींचा डिफॉल्ट बेल अर्ज मंजूर केला. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि समान रकमेच्या जामीनदारावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. याशिवाय, तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक मंगळवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासह अन्य अटी घालण्यात आल्या आहेत.
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने हा आदेश पारित केला. वैधानिक मुदतीत दोषारोपपत्र दाखल न झाल्यास आरोपींना प्राप्त होणाऱ्या कायदेशीर अधिकारांचे महत्त्व या निकालातून अधोरेखित झाले आहे. या प्रकरणात ॲड. ऋषिकेश आनंद सकुंडे यांनी आरोपींच्या वतीने प्रभावीपणे बाजू मांडली.




