कराड:-श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा.

कथाकथन स्पर्धा, वाचन कट्टा आणि लेखक अनिल थोरात यांची मुलाखत ठरली आकर्षणाचे केंद्र
कराड :-श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड संचलित श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे अभिजात मराठी भाषा सप्ताह विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा, साहित्य, वाचन आणि लेखन यांविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने कथाकथन स्पर्धा, वाचन कट्टा आणि ‘शाळांची घंटा’ या पुस्तकाचे लेखक श्री. अनिल थोरात यांची मुलाखत अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि साहित्याचे महत्त्व विशद केले. अभिजात भाषा म्हणजे काय, मराठी भाषेचा प्राचीन इतिहास किती समृद्ध आहे, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी भाषेचे वैभव जपण्याबरोबरच तिचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर करून भाषेची समृद्धी वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचन कट्ट्याला विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वाचन कट्टा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांची निवड करून वाचन केले. या उपक्रमात शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञान, विचार आणि अनुभवांची समृद्धी साधता येते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कथाकथन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या सादरीकरणातून कथाकथन कौशल्य, कल्पकता आणि अभिव्यक्तीचे दर्शन घडविले.
लेखक अनिल थोरात यांच्या मुलाखतीने सप्ताहाची सांगता
अभिजात मराठी भाषा सप्ताहाचा सांगता समारंभ ‘शाळांची घंटा’ या पुस्तकाचे लेखक श्री. अनिल थोरात यांच्या विशेष मुलाखतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. एस. आर. पवार यांनी त्यांची मुलाखत घेतली.
या मुलाखतीदरम्यान श्री. थोरात यांनी आपल्या लेखनप्रवासातील अनुभव, वाचनाची आणि लेखनाची आवड कशी निर्माण झाली, तसेच लेखक म्हणून घडताना आलेल्या विविध अनुभवांविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मराठी भाषेचे अभिजात महत्त्व स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे, विविध साहित्यप्रकारांचा आस्वाद घ्यावा आणि स्वतःची निरीक्षणशक्ती व कल्पकता वाढवावी, असे मार्गदर्शन केले.
वाचनाची सवय ही व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वाची असून पुस्तकांमधून जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते, हा विचारही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. या मुलाखतीमुळे विद्यार्थ्यांना लेखकाच्या अनुभवविश्वाची ओळख झाली आणि वाचन व लेखनासाठी प्रेरणा मिळाली.
कथाकथन स्पर्धा, वाचन कट्टा आणि लेखक संवाद अशा विविध उपक्रमांनी समृद्ध झालेल्या या सप्ताहाची सांगता प्रेरणादायी वातावरणात झाली. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्याबरोबरच वाचनसंस्कृतीचा विकास, साहित्याविषयी आवड आणि मराठी भाषा संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभागप्रमुख सौ. एस. एस. पवार आणि श्री. ए. एस. लोंढे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.




