अहिल्यानगर:-अकोले शहरात डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे उत्साहात स्वागत!
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) अहिल्यानगर:-अकोले शहरात डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे उत्साहात स्वागत!

अकोले तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचे अकोले शहरात ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार वैभवराव पिचड साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी वैभवराव पिचड साहेब यांनी डॉ. सुजयदादा विखे पाटील यांचा सत्कार केला. या सत्काराचा स्वीकार करत डॉ. विखे पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम गायकर साहेब यांच्या अकोले येथील पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यादरम्यान स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली.
2) अकोले:-नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर ‘हृदया कलेक्शन’चा शुभारंभ!
📍 राजूर

नवरात्रीच्या पवित्र पर्वाची सुरुवात आणि घटस्थापनेचा मंगलमय शुभमुहूर्त साधत राजूर येथे श्री. बाळासाहेब आरोटे यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘हृदया कलेक्शन’ या दालनाचा शुभारंभ भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते, व आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
यावेळी आरोटे परिवाराच्या वतीने डॉ. सुजय विखे पाटील यांचे औक्षण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्नेहपूर्ण सत्काराचा स्वीकार करत डॉ. विखे पाटील यांनी आरोटे परिवाराचे आभार मानले. उपस्थित मान्यवरांसमवेत त्यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या दालनाची पाहणी केली आणि आरोटे परिवाराशी संवाद साधला.
नवरात्रीच्या शुभदिनी सुरू झालेल्या ‘हृदया कलेक्शन’च्या माध्यमातून आरोटे परिवाराने आपल्या व्यावसायिक वाटचालीतील एक नवा अध्याय सुरू केला आहे. व्यवसाय उभा करण्यामागे असलेली मेहनत, जिद्द आणि कुटुंबाच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची धडपड हीच यशस्वी वाटचालीची खरी ताकद असते.
स्थानिक स्तरावर नवे व्यवसाय सुरू होणे, उद्योजकतेला चालना मिळणे आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होणे, ही परिसराच्या प्रगतीच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आरोटे परिवाराला त्यांच्या या नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा देताना व्यवसायाने उत्तरोत्तर प्रगती करावी, ग्राहकांचा विश्वास संपादन करावा आणि यशाची नवनवी शिखरे गाठावीत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. विखे पाटील परिवाराच्या वतीनेही त्यांनी आरोटे परिवाराच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. सीताराम गायकर, श्री. मधुभाऊ नवले, श्री. योगी केशव बाबा, श्री. कैलासराव वाकचौरे, श्री. कुंजीर साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, आरोटे परिवारातील सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आई जगदंबेच्या आशीर्वादाने ‘हृदया कलेक्शन’च्या व्यवसायाची भरभराट होवो, ग्राहकांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा भक्कम आधार लाभो, आरोटे परिवाराच्या स्वप्नांना यशाची सुंदर किनार लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
3) अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सर्व एकच ; डॉ. सुजय विखे पाटील.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांना समन्वयाचे आवाहन.
राजूर,(अकोले) प्रतिनिधी: राजकारणात आरोप-प्रत्यारोप, मतभेद आणि निवडणुकीतील संघर्ष हा लोकशाहीचा भाग असला, तरी शेतकऱ्यांचे प्रश्न, पाण्याचे नियोजन आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राजकीय मतभेद असले, तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण एक आहोत, अशी स्पष्ट भूमिका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी मांडली
नवरात्री घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर राजूर येथे बाळासाहेब आरोटे यांनी सुरू केलेल्या ‘हृदया कलेक्शन’ या दालनाचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. विखे पाटील यांनी आरोटे परिवाराला व्यवसायाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांतील नेत्यांची उपस्थिती होती.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना डॉ. विखे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विकासाच्या मुद्द्यांवर एकत्र येण्याचे आवाहन केले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अकोले तालुक्यात येताना काहीशी काळजी वाटत होती, अशी मिश्कील टिप्पणी करत त्यांनी तालुक्यातील राजकीय वातावरणाकडे लक्ष वेधले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अकोले तालुक्यातील विविध प्रवर्गांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. यावरून तालुक्यातील राजकीय जागरूकता आणि सहकार क्षेत्रातील सक्रियता स्पष्ट होते. अकोले तालुक्याला वैचारिकतेची परंपरा लाभली आहे. राजकीय मतभेद असतानाही तालुक्याच्या प्रश्नांवर एकत्र काम करण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी दाखवली, तर विकासाला अधिक गती मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले.
स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून विखे पाटील परिवाराने जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले आहे. अकोले तालुक्याशीही परिवाराचे जुने संबंध आहेत, असे सांगत डॉ. विखे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानले.
बाळासाहेब आरोटे यांनी जपलेली माणुसकी, नाती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती यामुळे वेगवेगळ्या राजकीय विचारांचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याचे त्यांनी नमूद केले. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे; मात्र त्यामुळे वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ नये. परस्परांचा सन्मान राखत संवादाची परंपरा कायम ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचे अनुभव सांगताना डॉ. विखे पाटील यांनी राजकीय प्रतिमा आणि पेहरावावर मिश्कील भाष्य केले. पूर्वी पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या स्वागताचा अनुभव सांगत त्यांनी उपस्थितांना हसवले. मात्र, केवळ पेहरावावरून माणसाचे मूल्यमापन करता येत नाही. माणसाचे कार्य, कर्तृत्व आणि समाजासाठी केलेले काम हीच त्याची खरी ओळख असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार किरण लहामटे यांच्याशी संवाद साधताना, तुम्ही माझ्या एका शब्दाला मान दिलात, तर मीही तुमच्या दहा शब्दांना मान देईन,’ असे सांगत त्यांनी परस्पर सन्मान आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले.
अकोले तालुक्यातील पाणीप्रश्न, शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र काम करणे आवश्यक असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले. शेतकरी अडचणीत असताना राजकीय मतभेदांपेक्षा त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. विकासाच्या मुद्द्यांवर संवाद साधून प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची निवडणूक असो किंवा तालुक्यातील पाणी आणि विकासाचे प्रश्न, राजकीय स्पर्धा कायम राहणारच; मात्र सार्वजनिक हिताच्या विषयांवर सहकार्याची भूमिका असली पाहिजे. अकोले तालुक्याची वैचारिक परंपरा जपत सर्वपक्षीय नेत्यांनी समन्वयाने पुढे यावे, हीच आपली अपेक्षा असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर, मधुभाऊ नवले, योगी केशव बाबा, कैलासराव वाकचौरे, कुंजीर साहेब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, आरोटे परिवारातील सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
4) राहाता:-घटस्थापने निमित्त तिसगाव प्रवरा तालुका राहता येथे अखंड हरिनाम सप्ताहाची व किर्तन महोत्सवाची सुरुवात मोठ्या जल्लोषात.

त्याबद्दल पहिल्या दिवसाची किर्तन सेवा ह भ प ज्ञानेश्वरी ताई घुले यांनी अतिशय सुंदर. भावपूर्ण आणि भक्तीरसाने भरलेले कीर्तन सादर करून सर्व तिसगाव ग्रामस्थांची मने जिंकली. त्यांच्या अमृततुल्यवाणीतून भक्ती संस्कार आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला तिसगाव गावातील पहिल्या महिला कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी ताई सतीश घुले यांनी तिसगाव या गावाचे नाव पंचक्रोशीत नव्हे तर पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात नावलौकिक केले. त्यांची शारदीय नवरात्र उत्सव प्रसंगी पहिली कीर्तन सेवा त्यांनी आज सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भजनी मंडळ यांच्या समावेत संपन्न केली.अतिशय सुंदर किर्तन सेवा दिल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




