मायणीतील व्यापाऱ्यांचा तीन तासांचा बंद; वीजपुरवठा, वाहतूक कोंडीसह विविध समस्यांवर प्रशासनाला निवेदन!
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) मायणीतील व्यापाऱ्यांचा तीन तासांचा बंद; वीजपुरवठा, वाहतूक कोंडीसह विविध समस्यांवर प्रशासनाला निवेदन!

मायणी परिसरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी-जास्त दाबामुळे व्यावसायिकांचे होणारे नुकसान, आठवडा बाजारातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील हातगाडे व टपऱ्यांमुळे निर्माण होणारी अडचण, एसटी बस स्थानकात न येणे,अतिक्रमण आणि अपुऱ्या बँकिंग सुविधांसह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मायणी येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. यानंतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांना निवेदने देऊन व्यापाऱ्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता चांदणी चौकातील श्री धनगर बिठोबा मंदिर येथे व्यापारी एकत्र जमले. त्यानंतर मायणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्याशी व्यापाऱ्यांनी चर्चा केली. आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी, वडूज व दहिवडी मार्गावरील हातगाडे आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीस निर्माण होणारे अडथळे, तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता याबाबत चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, उपसरपंच समीर नदाफ आणि ग्रामविकास अधिकारी शिवकुमार कोळी यांच्याशी झालेल्या चर्चेत व्यापाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या कचरा संकलन गाडीची व्यवस्था, रविवारी बाजारदिवशी बसस्थानक परिसरात बसणारे विक्रेते, अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि स्ट्रीट लाइटच्या समस्यांवर चर्चा चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आले.
मायणीतील एकमेव राष्ट्रीयीकृत बँक म्हणून उल्लेख करण्यात आलेल्या बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. चालू खातेधारकांसाठी स्वतंत्र रोख व्यवहार काउंटर सुरू करावा, ग्राहकांशी सौजन्यपूर्ण वर्तन करावे आणि बाजारपेठेतील एटीएममध्ये नियमितपणे रोख रक्कम उपलब्ध ठेवावी, अशा मागण्या बँक प्रशासनाकडे मांडण्यात आल्या.
माणिक वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच विजेच्या कमी-जास्त दाबामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा मुद्दा व्यापाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. व्यावसायिकांना नियमित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा मिळावा, तसेच वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मागणी करून महावितरणचे अधिकारी पवार यांनाही निवेदन देण्यात आले.
रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी बस गावात येत नसल्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. बाजारदिवशी बससेवा गावात नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी बसस्थानकाच्या प्रमुखांकडे करण्यात आली.
मायणीच्या व्यापारी पेठेतील या समस्या केवळ व्यापाऱ्यांपुरत्या मर्यादित नसून त्यांचा परिणाम ग्राहक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांवरही होत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून समन्वयाने ठोस उपाययोजना कराव्यात. केवळ चर्चेपुरते प्रश्न न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
2) मायणी:-भाऊसाहेब देशमुख यांचे निधन.

मायणी येथील भाऊसाहेब पांडुरंग उर्फ बी.पी.देशमुख सर यांचे वयाच्या ८८व्या वर्षी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते शारीरिक शिक्षणाचे शिक्षक होते.त्यांच्या मागे२मुले व १ मुलगी,सुना, नातवंडे असा परिवार आहे.



