वाई:-वादाला ‘ब्रेक’, सलोख्याला ‘टेक’! बावधनच्या तंटामुक्तीची मांढरेंच्या नेतृत्वाखाली नवी सुरुवात.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वादाला ‘ब्रेक’, सलोख्याला ‘टेक’! बावधनच्या तंटामुक्तीची मांढरेंच्या नेतृत्वाखाली नवी सुरुवात.

वाई, दि. २६ : गावातील तंटे पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच संवाद आणि सामंजस्यातून सोडविण्याचा निर्धार करत दिलीप मांढरे यांनी बावधन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मांढरे यांच्यासह ५१ सदस्यीय समितीने पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
‘गावातील प्रत्येक कुटुंब माझे कुटुंब’ या भावनेतून काम करण्याचा निर्धार व्यक्त करत दिलीप मांढरे म्हणाले, “गावातील छोटे-मोठे वाद वाढण्यापूर्वीच त्यावर संवादातून तोडगा काढला जाईल. सर्व ५१ सदस्यांना सोबत घेऊन सामाजिक सलोखा आणि गावातील ऐक्य अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांच्या सहकार्याने बावधनला आदर्श तंटामुक्त गाव बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
यावेळी प्रमुख पाहुणे वाईचे नूतन पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी तंटामुक्ती समितीने युवकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “बावधन हे मोठे आणि समृद्ध गाव आहे. गावाच्या प्रगतीसाठी युवकांना योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. ‘युवक घडला तर गाव घडेल’ या विचाराने युवकांना सकारात्मक वाटेवर आणण्यासाठी समितीने पुढाकार घ्यावा.”
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांनी दिलीप मांढरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “मांढरे यांचा वारकरी संप्रदाय आणि अध्यात्माशी जवळचा संबंध आहे. संयमी स्वभाव व अनुभवाच्या जोरावर ते समितीचे काम प्रभावीपणे पुढे नेतील. त्यांच्या नेतृत्वामुळे गावातील सामाजिक एकोपा अधिक दृढ होईल,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास माजी कृषी सभापती शशिकांत पिसाळ, सरपंच वंदना कांबळे, पंचायत समिती सदस्य सचिन भोसले-पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, ॲड. दिप्ती पिसाळ, दिगंबर रासकर, अंकुश कुंभार यांच्यासह ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.





