खंडाळा:-बनावट कागदपत्रांचा आधार घेत विधवा सुनेच्या मालमत्तेवर डल्ला; सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) खंडाळा:-बनावट कागदपत्रांचा आधार घेत विधवा सुनेच्या मालमत्तेवर डल्ला; सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा.

सातारा | खंडाळा, दि. २३ : पतीच्या निधनानंतर विधवा सुनेचा मालमत्तेवरील कायदेशीर हक्क डावलण्यासाठी सासू-सासऱ्यांनी कथित बनावट प्रतिज्ञापत्राचा आधार घेत जमीन स्वतःच्या नावे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता ही जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप असून, या प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोनिका विजय निंबाळकर (वय ३९, रा. केंजळ, ता. वाई) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या पती विजय चारुदत्त निंबाळकर यांचा १३ ऑगस्ट २०२२ रोजी पुणे येथील राहत्या घरी गळफास घेऊन मृत्यू झाला होता.
पतीच्या निधनानंतर मोनिका निंबाळकर यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत चौकशी केली असता, सावळ (ता. बारामती, जि. पुणे) येथील पतीच्या नावे असलेली १० गुंठे जमीन त्यांच्या नावावर नसल्याचे निदर्शनास आले. महसूल नोंदी तपासल्यानंतर या जमिनीवर सासरे चारुदत्त अनंतराव निंबाळकर आणि सासू जयश्री निंबाळकर यांची नावे करण्यात आल्याचे समोर आले.
तक्रारीनुसार, विजय निंबाळकर हे अविवाहित असल्याचे खोटे नमूद करणारे प्रतिज्ञापत्र खंडाळा तहसीलदार कार्यालयात सादर करून संबंधित जमीन सासू-सासऱ्यांनी आपल्या नावे करून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी बारामती उपनिबंधक कार्यालयात या जमिनीची ताई देवकाते व महेश देवकाते यांच्याकडे विक्री केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
एकाच पद्धतीने पुन्हा गैरप्रकाराचा आरोप
विशेष म्हणजे, याच आरोपींविरुद्ध लोणंद येथील २० गुंठे जमिनीबाबतही बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आरोप असून, त्या प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक, सातारा यांच्या परवानगीने खंडाळा पोलिसांनी सदर प्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, संबंधित कागदपत्रे, महसूल नोंदी आणि जमीन व्यवहाराची पडताळणी केली जात आहे.
2) पाटणच्या प्राचीन शिवमंदिरात भक्तिरसात रंगला रुद्रपाठ; शिवभक्तांची मोठी उपस्थिती.

पाटण, दि. २३ : तळमावळे-खळे, ता. पाटण येथील प्राचीन पांडवकालीन शिवमंदिरात शनिवारी (दि. २२) मंत्रोच्चारांचा निनाद आणि हर हर महादेवच्या जयघोषात रुद्रपाठ सेवा भावपूर्ण वातावरणात पार पडली. श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार, पुणे यांच्या वतीने आयोजित या धार्मिक सेवेला सेवेकरी तसेच शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अविनाश बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रुद्रपाठ सेवेदरम्यान भगवान शिवशंकरांची विधिवत आराधना करण्यात आली. रुद्रपठणाच्या मंत्रघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. श्रद्धा, सेवा आणि अध्यात्मिक वातावरणाने उपस्थित भाविक भारावून गेले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना लक्ष्मण मस्कर यांनी श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या भावना व्यक्त केल्या. गुरुवर्य अविनाश दादा बडगुजर यांना दीर्घायुष्य लाभावे, त्यांना अखंड ऊर्जा व सामर्थ्य मिळावे तसेच भक्त परिवाराच्या सेवाकार्याचा देश-विदेशात व्यापक प्रसार व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना भगवान भोलेनाथांच्या चरणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या रुद्रपाठ सेवेस लक्ष्मण मस्कर, प्रकाश मस्कर, कविताताई कचरे, कमलताई शेळक, वनिताताई चव्हाण, मालन मोरे, साधनाताई, मनीषाताई, संगीताताई, शारदाताई, यशोदाताई, यादवताई, कांता ताई यांच्यासह श्री गुरुदेव दत्त भक्त परिवारातील सेवेकरी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचीन शिवमंदिरात झालेल्या या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
3) कराड:-कराडमध्ये मध्यरात्री ‘मोबाईल चोर’ टोळीचा धुमाकूळ; एकाच दुकानातून ३०० हँडसेट गायब!
स्विफ्टमधून आलेल्या चौघांचा काही मिनिटांत लाखोंवर हात साफ; ५० ते ६० लाखांच्या चोरीने व्यापारी हादरले.

कराड, दि. २३ : कराड शहरात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत मोहिते हॉस्पिटल परिसरातील ‘एस.एस. मोबाईल शॉपी’ फोडून तब्बल ३०० मोबाईल संच लंपास केले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार मुखवटाधारी व्यक्तींनी दुकानाचे शटर अथवा कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि काही मिनिटांतच सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. या घटनेने कराड शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. दुकानात प्रवेश केल्यानंतर महागडे मोबाईल निवडून ते गोणपाटात भरण्यात आले. त्यानंतर चौघांनी बाहेर उभी केलेल्या स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून वेगाने पलायन केले. चोरीची पद्धत पाहता आरोपींनी दुकानाची पूर्वीच पाहणी केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दुकानाची पाहणी करून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये संशयितांनी वापरलेली पांढरी स्विफ्ट कार पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. कारचा नंबर, चोरट्यांची हालचाल आणि त्यांनी शहराबाहेर जाण्यासाठी वापरलेला मार्ग याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी सुरू आहे.
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. चोरी गेलेल्या मोबाईलची अचूक संख्या व किंमत पंचनामा आणि दुकानातील नोंदी तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहे. या धाडसी चोरीमागे सराईत टोळीचा हात आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कराडसारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात लाखो रुपयांची चोरी झाल्याने रात्रीच्या पोलिस गस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून, शहरातील प्रमुख बाजारपेठा व व्यावसायिक भागांमध्ये रात्रीची गस्त अधिक कडक करण्याची मागणी जोर धरत आहे.
4) कराड:-कासारशिरंबेत रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५५ जणांनी दिले रक्तदान
शिवस्मारक समितीचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी; पर्यावरण संवर्धनासह सेवाभावी कार्याची परंपरा कायम.

कराड, दि. २३ : कासारशिरंबे (ता. कराड) येथे स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शिवस्मारक समितीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामस्थ आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५४ पुरुष आणि एका महिलेने अशा एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. तब्बल ७० नागरिकांनी रक्तदानासाठी नोंदणी करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
शिवस्मारक समिती, कासारशिरंबेतील युवा कार्यकर्ते आणि यशवंत ब्लड बँक, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासतानाच पर्यावरण संवर्धनालाही समितीने सातत्याने प्राधान्य दिले आहे.
समितीच्या वतीने आतापर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक प्रसंगांचे औचित्य साधून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव मंदिर डोंगर परिसरात ३० झाडांची लागवड व संगोपन, महाराष्ट्र कृषी दिनी खरजाई मंदिर डोंगर परिसरात ६५ वृक्षांची लागवड, आषाढी एकादशीनिमित्त माळ्याची पानंद येथे ५० झाडांचे रोपण, तसेच जोतिबा मंदिरासमोरील टेकडीवर १०० फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.
रक्तदानातून गरजू रुग्णांना मदतीचा हात आणि वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धन, अशा दुहेरी सामाजिक जाणिवेने शिवस्मारक समितीने राबविलेल्या उपक्रमांचे कासारशिरंबे व परिसरातून कौतुक होत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित रक्तदान शिबिराने सामाजिक एकजुटीचा संदेश देत तरुणाईला सेवाभावी कार्याची प्रेरणा दिली.
5) फलटण:-सुरवडीच्या रस्त्यावर काळाचा घाला; जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.

फलटण, दि. २३ : फलटण तालुक्यातील सुरवडी येथे रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून उभ्या असलेल्या तरुणाला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संदिप जालिंदर जाधव (रा. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी संबंधित कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे चार वाजता संदिप जाधव हे दुचाकीवरून फलटण-लोणंद मार्गाने प्रवास करत होते. सुरवडी येथे लघुशंकेसाठी त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहनातून खाली उतरत असतानाच मागून वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत जाधव यांच्या उजव्या पायासह डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिकेतून, तर कारचालकानेही मदतीसाठी पुढाकार घेत त्यांना फलटण येथील कोकरे रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील भारती विद्यापीठ रुग्णालय, त्यानंतर वायसीएम रुग्णालय, पिंपरी तसेच आयुष्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र डॉक्टरांचे प्रयत्न सुरू असतानाच ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास जाधव यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेप्रकरणी मृताची पत्नी यांनी १९ ऑगस्ट रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कारचालकाने वाहन निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवल्यानेच अपघात घडून पतीचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.





