आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पारनेर:-किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात संपन्न.

पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात संपन्न.

-सुपा ,पारनेर – राजकुमार इकडे(अहिल्यानगर )

सध्याच्या धावपळीच्या युगात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी आणि समाज चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पारनेर येथील किसान इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या केंद्रातर्फे ‘दहा कोटी नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियानांतर्गत’ विशेष व्यसनमुक्ती प्रतिज्ञा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
ब्रह्माकुमारी साधना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष चंद्रकांत चेडे हे होते. याशिवाय राम भाई, पत्रकार भगवान गायकवाड आदी मान्यवर विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मिळून एकसंधपणे व्यसनमुक्त समाज घडविण्याचा दृढ संकल्प केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ब्रह्माकुमारी साधना दीदी यांनी सांगितले की, आजच्या काळात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे विद्यार्थी, युवक तसेच संपूर्ण समाजावर अत्यंत गंभीर परिणाम होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, त्यांनी मूल्याधिष्ठित जीवनशैलीचा स्वीकार करावा आणि एका निरोगी समाजाची निर्मिती व्हावी, याच उद्देशाने प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयातर्फे हे देशव्यापी महाअभियान राबवले जात आहे.
आजचा भारत हा प्रचंड ताणतणाव आणि मानसिक अस्वस्थतेमुळे त्रस्त झाला आहे. या तणावातून बाहेर पडण्यासाठी अनेक व्यक्ती चुकीच्या मार्गाने व्यसनांच्या आहारी जातात; परंतु व्यसन केल्यामुळे टेन्शन कधीही कमी होत नाही, तर उलट ते आणखी वाढते, असा महत्त्वपूर्ण संदेश दीदींनी दिला. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी ब्रह्माकुमारी विद्यालयाने राबवलेल्या अभियानांतर्गत आतापर्यंत देशभरात ४ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले असून, त्यापैकी तब्बल ३ कोटी लोकांनी व्यसनांना कायमचा रामराम ठोकून व्यसनमुक्त जीवन स्वीकारले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची व गौरवाची बाब आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
येत्या २५ ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणीजी यांच्या स्मृतीनिमित्त खरी श्रद्धांजली तेव्हाच अर्पण ठरेल, जेव्हा आपण सर्वजण मिळून या ‘नशा मुक्त भारत अभियानाचे’ रूपांतर एका विराट जनआंदोलनात करू. हे अभियान भविष्यात विश्वरूप धारण करेल आणि खऱ्या अर्थाने आपला भारत देश पूर्णपणे ‘नशा मुक्त’ बनेल, असा दृढ विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना आयुष्यभर व्यसनमुक्त राहण्याची आणि आपल्या परिसरातील इतरांनाही व्यसनमुक्तीसाठी प्रेरणा देण्याची सामूहिक शपथ व प्रतिज्ञा देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार पाहायला मिळाला.

2) पारनेर सुपा:-म्हसणे येथे नवबुद्ध दलित वस्ती सुधार योजनेतील रस्ता काम निकृष्ट.

निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये संताप – प्रतिक शेळके यांचा आमरण उपोषणाचा इशारा.

पारनेर,सुपा, (राजकुमार इकडे)
पारनेर तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर गावांमधील गायकवाड मळा येथे ‘नवबुद्ध व दलित वस्ती सुधार योजने’मधून करण्यात आलेल्या रस्ता काँक्रिटीकरण कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जनशक्ती सामाजिक असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रतिक विलास शेळके यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय पारनेर यांच्याकडे यासंदर्भात सविस्तर तक्रार दाखल केली असून, संबंधित दोषी अभियंता आणि ठेकेदारावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, म्हसणे येथील गायकवाड मळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत ९ मार्च २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात पहिली तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीचे अभियंता बेरड यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. यावेळी ठेकेदाराला अंदाजपत्रकानुसार (एस्टिमेटप्रमाणे) काम करण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ठेकेदाराने आपसात मिळून अभियंता बेरड यांना हाताशी धरले. रस्त्याचे मजबुतीकरण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतानाही घाईघाईने त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले.
या प्रकाराची तक्रार करण्यासाठी जेव्हा अर्जदार प्रतिक शेळके यांनी अभियंता बेरड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यावरून अभियंता बेरड यांनी ठेकेदारासोबत आर्थिक हितसंबंध जोडून कामामध्ये अनियमितता केल्याचा व त्यांना पाठीशी घातल्याचा संशय बळावला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्याला आणि ठेकेदाराला अभय देणाऱ्या संबंधित अभियंत्यावर कायदेशीर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या रस्त्याच्या कामात अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या आहेत. नियमानुसार काम सुरू होण्याआधी कामाचा फलक (बोर्ड) लावणे बंधनकारक असताना, संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर फलक लावण्यात आला. तसेच, ८० मिमीचे दगड हाताने फोडून वापरणे अपेक्षित असताना त्या ठिकाणी वेळेचे खरपड (चुकीची सामग्री) वापरण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूच्या अरुंदीकरणासाठी पुरेशी जागा न सोडल्यामुळे साईड भरणे अशक्य झाले असून त्याठिकाणी मुरूम न टाकता माती टाकण्यात आली आहे, रस्ता पूर्ण लेव्हलमध्ये न करता तिथे चढ-उतार ठेवण्यात आले आहेत. शिवाय, अंदाजपत्रकात खडीचा डबल लेयर बंधनकारक असताना प्रत्यक्षात सिंगल लेयरच वापरल्याचे निदर्शनास आले आहे.
या सर्व गंभीर अनियमिततेबाबत पंचायत समितीच्या गुण नियंत्रण कक्षाकडून (क्वालिटी कंट्रोल) रस्त्याच्या कामाची सखोल तपासणी करण्यात यावी आणि त्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करावे, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. अन्यथा, या अर्जाची दखल न घेतल्यास जिल्हा परिषद कार्यालय, अहिल्यानगर यांच्यासमोर 18 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे .

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button