पारनेर:-सह्याद्री रत्न गुण गौरव पुरस्काराने रांजणगावचा गौरव! आदर्श सरपंच संध्याताई देशमुख व आदर्श ग्रामविकास अधिकारी गोरख गायकवाड यांचा राज्यस्तरीय सन्मान.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पारनेर:-सह्याद्री रत्न गुण गौरव पुरस्काराने रांजणगावचा गौरव!
आदर्श सरपंच संध्याताई देशमुख व आदर्श ग्रामविकास अधिकारी गोरख गायकवाड यांचा राज्यस्तरीय सन्मान.

पारनेर / सुपा (अहिल्यानगर), दि. १ : प्रतिनिधी – राजकुमार इकडे
पारनेर तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांना आणि लोकाभिमुख प्रशासनाला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, नालंदा ऑर्गनायझेशन आयोजित ‘सह्याद्री रत्न गुण गौरव पुरस्कार’ सोहळ्यात आदर्श सरपंच म्हणून सौ. संध्याताई महेश देशमुख तसेच आदर्श ग्रामविकास अधिकारी म्हणून श्री. गोरख अर्जुन गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.
पुणे येथे आयोजित झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘देऊळ बंद’ फेम अभिनेत्री आर्या घारी यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याने रांजणगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सौ. संध्याताई देशमुख यांनी सरपंच म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, स्वच्छता, सामाजिक उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागावर भर देत त्यांनी विकासाची नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यशैलीमुळे त्या कर्तव्यदक्ष, स्वाभिमानी आणि जनतेशी सतत जोडलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात.
त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी श्री. गोरख अर्जुन गायकवाड यांनी ग्रामपंचायत प्रशासनात पारदर्शकता, नियोजनबद्ध विकासकामे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेची दखल घेत त्यांनाही या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या दुहेरी सन्मानानंतर रांजणगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, उपसरपंच शिवाजी शिंदे, माजी सरपंच शरद सरोदे, बाबा जवक, बंटी साबळे, महेश देशमुख, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक, पारनेर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील तसेच पारनेर दूध संघाचे दत्ता नाना पवार यांनी दोन्ही पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
रांजणगावच्या विकासासाठी झटणाऱ्या या दोन्ही मान्यवरांच्या राज्यस्तरीय सन्मानामुळे संपूर्ण पारनेर तालुक्याचा अभिमान उंचावला असून, गावाच्या प्रगतीला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.




