वाई:-अण्णा भाऊ साठे हे चतुःरस्त्र लेखक होते : डॉ.दत्ता घोलप – किसन वीर महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-अण्णा भाऊ साठे हे चतुःरस्त्र लेखक होते : डॉ.दत्ता घोलप – किसन वीर महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी.

वाई | प्रतिनिधी | दि. १ ऑगस्ट २०२६
मराठी साहित्याला वास्तववादी आणि जनसामान्यांच्या जीवनाशी जोडणारी नवी दिशा देणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यविश्वातील चतुःरस्त्र लेखक होते. त्यांनी कथा, कादंबरी, शाहिरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन अशा साहित्याच्या विविध प्रकारांतून समाजातील वास्तव प्रभावीपणे मांडले, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती कार्यालय, वाई येथील संपादकीय सहायक डॉ. दत्ता घोलप यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, वाड्मय मंडळ, स्टाफ वेल्फेअर समिती आणि स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. दत्ता घोलप प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर, विश्वकोश कार्यालयातील रवींद्र घोडराज, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, वाड्मय मंडळाचे समन्वयक डॉ. संग्राम थोरात, स्टाफ वेल्फेअर समितीचे समन्वयक डॉ. शिवाजी ताटे, तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक राजेंद्र जायकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. दत्ता घोलप म्हणाले की, “लेखक हा समाजाचा आरसा असतो. अण्णा भाऊ साठे यांच्या अनुभवसंपन्न जीवनामुळे त्यांच्या साहित्याला वास्तवाची धार लाभली. त्यांनी समाजातील शोषित, वंचित आणि कष्टकरी वर्गाचे जीवन अत्यंत प्रभावीपणे मांडले. लेखकाने भरपूर वाचन करून स्वतःच्या भाषेत आणि स्वतःच्या अनुभवातून लेखन करणे आवश्यक आहे. सामाजिक आशयाला केंद्रस्थानी ठेवणारे अण्णा भाऊ यांचे साहित्य आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
ते पुढे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांच्या कथा या केवळ साहित्यकृती नसून संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाच्या जीवनाचा दस्तऐवज आहेत. शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीसोबत राष्ट्रीय प्रश्नांनाही वाचा फोडली. त्यांचे साहित्य कोणत्याही साचेबद्ध चौकटीत अडकलेले नव्हते.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “अनुभवातून जन्माला आलेले साहित्यच दीर्घकाळ समाजाच्या स्मरणात राहते. अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनाची भाषा चित्रदर्शी असून त्यांच्या साहित्यामध्ये माणुसकी, समता आणि सामाजिक मूल्यांचा प्रभावी संदेश आहे. ते खऱ्या अर्थाने सामाजिक तत्त्वचिंतक होते.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा परिचय करून देत ‘लेखन प्रेरणा दिनाचे’ महत्त्व स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. संग्राम थोरात यांनी करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती धनश्री भोसले यांनी केले, तर डॉ. धनंजय निंबाळकर यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ. अमोल कवडे, राहुल तायडे, पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक विशाल महांगडे, शारीरिक शिक्षक शिवराज तलवारे, किशोर पिसाळ आणि श्रीधर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.




