सातारा:-शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करा : अनिलकुमार कदम.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी २४ ऑगस्टपर्यंत अर्ज करा : अनिलकुमार कदम.

सातारा :- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी देशाबाहेर अभ्यास दौरा योजना राबविण्यात येत असून, इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मुक्त पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक तथा सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी केले आहे.
अनिलकुमार कदम यांनी सांगितले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील आधुनिक व विकसित कृषी तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतमालाची निर्यात, कृषीमालाचे पणन, कृषीमाल प्रक्रिया, जागतिक बाजारपेठेतील मागणी तसेच अत्याधुनिक कृषी यंत्रसामग्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे.
या अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित देशांतील प्रगत शेतकरी, कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, कृषी प्रक्रिया उद्योग आणि विविध कृषी प्रकल्पांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. क्षेत्रीय भेटी, तज्ज्ञांशी प्रत्यक्ष संवाद आणि आधुनिक शेती पद्धतींचा अभ्यास यामुळे शेतकऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. परदेशातील यशस्वी कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम, स्पर्धात्मक आणि आधुनिक करण्यास या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
कदम यांनी पुढे सांगितले की, इच्छुक शेतकऱ्यांनी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावेत. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी केले आहे.




