वाई:-किसन वीर’ च्या एन.सी.सी.छात्रांचे यश.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-किसन वीर’ च्या एन.सी.सी.छात्रांचे यश.

पत्रकार प्रतिनिधी वैष्णवी शिंदे
वाई : दि. 2 जुलै २०२६
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या एन.सी .सी. विभागाचा कॅडेट सार्थक दत्तात्रय डेरे याची भारतीय नौदलात निवड झाली. कॅडेट सार्थक डेरे याने एन.सी.सी. मध्ये प्रशिक्षण घेत असताना तो विविध उपक्रमांमध्ये त्याचा सहभाग होता. चिकाटी, मेहनत व नेतृत्वगुणांच्या बळावर त्याची भारतीय नौदलात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. तसेच आदित्य तुळशीदास वाडकर या कॅडेटने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुजरात येथील आर.आर.यू. (राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी ) येथे NIELIT Organisation च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या सायबर डिफेंडर कॅम्प मध्ये त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कॅम्प मध्ये त्याला सायबर सिक्युरिटी ची मूलभूत तत्वे, लिरिक्स ऑपरेटिंग सिस्टम, मोबाईल सिक्युरिटी, तसेच विविध साधनांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आदित्य विजय गुरव या कॅडेटने हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटन अँड अलाईट स्पोर्ट्स अंतर्गत रिजनल वॉटर स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर पोंग डॅम येथील विशेष जलक्रीडा प्रशिक्षण मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य गुरुनाथ फगरे आणि एन.सी.सी. अधिकारी मेजर डॉ. समीर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.मदन (दादा) भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य डॉ.विनोद वीर, 22 महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. साताराचे कंमांडिंग ऑफिसर कर्नल अमर भोसले, ऍडमिनिस्ट्रॅटिव्ह ऑफिसर लेफ्टनंन्ट कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर हिरेमठ, महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व सेवक यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
2) वाई:-ग्रामकन्यांची मुंबई पोलीस दलात भरारी
‘किसन वीर’ मध्ये यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव.

पत्रकार प्रतिनिधी रेखा येवले
जनता शिक्षण संस्थेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा आणखी एक यशस्वी टप्पा; मा. मदनदादा भोसले यांचे गौरवोद्गार.
वाई :
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून घडलेल्या आणखी एका यशस्वी पर्वाचा आनंदोत्सव नुकताच महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनींची मुंबई शहर पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला.
जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून आणि प्रेरणेतून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मोफत शारीरिक प्रशिक्षण, लेखी परीक्षांचे मार्गदर्शन तसेच अत्यल्प दरात ग्रंथालय आणि अभ्यासिकेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या माध्यमातून अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या मुंबई शहर पोलीस भरती प्रक्रियेत कुमारी रेश्मा चव्हाण (बावधन), कुमारी सुहाना शेख (चांदवडी), अमृता शिर्के (धोम पुनर्वसन), नेहा सपकाळ (केंजळ), नूतन वरखडे (वरखडवाडी), सानिका तरडे (सुलतानपूर), लक्ष्मी सिन्नूर (सुलतानपूर) आणि प्रतीक्षा राजपुरे (कनूर) या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही जिद्द, कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी मिळवलेले हे यश अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. यावेळी विद्यार्थिनींसह शारीरिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले निवृत्त सुभेदार श्री. विशाल महांगडे यांचाही मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपल्या संघर्षमय प्रवासाचे अनुभव कथन करताना महाविद्यालयाने दिलेल्या आधारामुळेच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अडचणींवर मात करून यश मिळवता आल्याचे सांगितले. त्यांनी जनता शिक्षण संस्था, किसन वीर महाविद्यालय तसेच मार्गदर्शन केंद्रातील सर्व शिक्षक, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना हे यश केवळ नोकरीपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर संस्था सचिव मा. डॉ. जयवंत चौधरी यांनी स्पर्धा परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची मोठी संधी असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना सातत्य, शिस्त आणि आत्मविश्वास जपण्याचा सल्ला दिला.
अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांनी आपल्या प्रेरणादायी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. जनता शिक्षण संस्था ही स्थापनेपासूनच ग्रामीण, गरीब आणि दुर्बल घटकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील स्वप्नांना दिशा देणे आणि ती स्वप्ने पूर्ण होताना पाहणे, यापेक्षा मोठा आनंद संस्थेसाठी दुसरा नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करताना त्यांनी सांगितले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही चिकाटी, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावर मिळवलेले हे यश संपूर्ण ग्रामीण समाजासाठी प्रेरणादायी आहे. “तुमच्या जीवनातील यशामध्ये संस्था आणि महाविद्यालयाची मदत झाली, हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देत सांगितले की, जीवनात यशस्वी झाल्यानंतर समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हीच खरी कृतज्ञता आहे. “आपण ज्या समाजातून पुढे आलो आहोत, त्या समाजासाठी काहीतरी परत देण्याची भावना कायम जिवंत ठेवा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. संस्था भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. विनोद वीर यांनी केंद्राची उभारणी, त्याचे कार्य तसेच महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्र आणि विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रशिक्षक श्री. विशाल महांगडे, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक सहायक प्राध्यापक राजेंद्र जायकर, मराठी विषयाचे मार्गदर्शक तानाजी हाके, गणित व बुद्धिमत्ता विषयाचे मार्गदर्शक उमेश आडुळकर तसेच विक्रम जाधव यांचे विशेष आभार मानले. “आमचे जीवन घडविण्यात किसन वीर महाविद्यालयाची भूमिका आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही,” अशी भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केली.
कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थिनींचे पालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र जायकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.




