कराड:-राज्य गुणवत्ता यादीत ९ वा, जिल्ह्यात ७ वा क्रमांक; लाहोटी कन्या प्रशालेच्या स्वरांजली खबालेची दैदिप्यमान कामगिरी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-राज्य गुणवत्ता यादीत ९ वा, जिल्ह्यात ७ वा क्रमांक; लाहोटी कन्या प्रशालेच्या स्वरांजली खबालेची दैदिप्यमान कामगिरी.

परिणीता पाटीलचाही जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक; लाहोटी कन्या प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
कराड :- इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या जाहीर झालेल्या निकालात शिक्षण मंडळ, कराड संचलित लाहोटी कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी उज्ज्वल यश संपादन करत प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा पुन्हा एकदा ठसा उमटविला आहे.
प्रशालेतील कु. स्वरांजली मंगेश खबाले हिने राज्य गुणवत्ता यादीत ९ वा क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत ७ वा क्रमांक मिळवून दैदिप्यमान यशाची नोंद केली. तसेच कु. परिणीता बाळासाहेब पाटील हिने जिल्हा गुणवत्ता यादीत २६ वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे लाहोटी कन्या प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशामागे विद्यार्थिनींची जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेतील रूपाली काकडे, बाळासाहेब देसाई, प्रांजली कुलकर्णी, अश्विनी कुंभार आणि तानाजी बुरुंगले यांनी विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन केले.
याशिवाय प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम, उपमुख्याध्यापिका छाया कुंभार, पर्यवेक्षक सयाजीराव नांगरे तसेच संस्था नियुक्त पर्यवेक्षक जगदीश कुंभार यांनी विद्यार्थिनींना वेळोवेळी मार्गदर्शन, प्रोत्साहन व प्रेरणा देत त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण मंडळ, कराडचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, सदस्य, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
लाहोटी कन्या प्रशालेने सातत्याने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत विद्यार्थिनींना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या यशामुळे संपूर्ण कराड परिसरातून प्रशालेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




