कराड:-सर्वेश पाटील (पार्लेकर) यांची यशस्वी भरारी; कराड नगरपालिका शाळा क्र. ३ च्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यात १५१ वी रँक.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सर्वेश पाटील (पार्लेकर) यांची यशस्वी भरारी; कराड नगरपालिका शाळा क्र. ३ च्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत सातारा जिल्ह्यात १५१ वी रँक.

कराड : – कराड नगरपालिका शाळा क्रमांक ३ मधील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सर्वेश प्रदीप पाटील (पार्लेकर) याने महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत २३४ गुण मिळवत सातारा जिल्ह्यात १५१ वी रँक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्वेशच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे कराड शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्वेशने शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विविध स्पर्धा परीक्षांमध्येही आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली आहे. मंथन स्पर्धा परीक्षेत ३०० पैकी २७४ गुण मिळवत सातारा जिल्ह्यात १३ वा क्रमांक, बी.डी.एस. परीक्षेत ८१/१०० गुणांसह कांस्यपदक, नवोदय प्रवेश परीक्षेत ९०/१०० गुण, तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ३०० पैकी २१७ गुण मिळवत पात्रता मिळवून त्याने सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली आहे.
सर्वेशच्या या यशामागे त्याची जिद्द, नियमित अभ्यास, पालकांचे प्रोत्साहन आणि शाळेचे मुख्याध्यापक आलेकरी सर यांच्या मार्गदर्शनासह शिक्षक सतीश मोरे सर व अश्विनी पाटील मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्वेशने हे उल्लेखनीय यश संपादन करून कराड नगरपालिका शाळा क्रमांक ३ च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
सर्वेशच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कराड उत्तरचे आमदार मा. मनोजदादा घोरपडे तसेच भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटील (पार्लेकर) यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. भविष्यातही सर्वेशने आपल्या गुणवत्तेच्या बळावर अधिक मोठी यशशिखरे सर करून कराड शहर, सातारा जिल्हा आणि राज्याचे नाव उज्ज्वल करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सर्वेशच्या या दैदिप्यमान यशाबद्दल मुख्याध्यापक आलेकरी सर, शिक्षक सतीश मोरे सर, अश्विनी पाटील मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




