कराड:-लाहोटी कन्या प्रशालेत उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

लाहोटी कन्या प्रशालेत उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन.

कराड :- “योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्याचा सुंदर समतोल साधणारी जीवनपद्धती आहे,” या संदेशाचा प्रत्यय देत शिक्षण मंडळ, कराड संचलित स्व. शेठ रामबिलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.
योगाचे महत्त्व विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवता यावे, त्यांच्यामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे, अधिकारी युवराज पाटील तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशालेतील विद्यार्थिनी, शिक्षकवृंद आणि महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सामूहिक योगाभ्यास, विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी असून नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मानसिक ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींनी दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करून निरोगी, सक्षम आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका हेमलता जंगम यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. योग दिनाच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच योग हा निरोगी जीवनाचा पाया असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय प्रशालेचे क्रीडा शिक्षक महेंद्र भोसले यांनी केले. त्यांच्या कुशल नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थिनींचे आभार व्यक्त करण्यात आले.
“योगः कर्मसु कौशलम्” या भगवद्गीतेतील विचाराप्रमाणे योगामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जातो. निरोगी शरीर, शांत मन आणि सुदृढ समाज निर्मितीचा संदेश देणारा हा आंतरराष्ट्रीय योग दिन लाहोटी कन्या प्रशालेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.




