वाई:-ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना गरवारेची नवी भरारी; २५० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना गरवारेची नवी भरारी; २५० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण.

वाई, दि. १५ : ग्रामीण भागातील युवक-युवतींना कौशल्याधारित शिक्षण देऊन स्वावलंबनाच्या मार्गावर नेणारे गरवारे युवा विकास केंद्र आज अनेकांसाठी आशेचा दीपस्तंभ ठरत आहे. गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आणि सेवा सहयोग संस्थेच्या सहकार्याने सुरू असलेल्या या केंद्राच्या वार्षिक प्रमाणपत्र वितरण समारंभात २५० हून अधिक प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रे व भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्रीनिवास कुलकर्णी यांनी, “गरवारे युवा विकास केंद्र हा केवळ प्रशिक्षण प्रकल्प नसून ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा उपक्रम आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य येथे सुरू आहे. अनेक तरुण आज स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असे सांगितले.
कार्यक्रमास विवेक कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, युवराज थोरात, विवेक देशपांडे तसेच कविता साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेताना विवेक कुलकर्णी यांनी सांगितले की, एप्रिल २०२३ मध्ये सुरू झालेल्या या केंद्रामार्फत आतापर्यंत ९०० हून अधिक युवक-युवतींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे १०० जणांना रोजगार मिळाला असून १०० हून अधिक युवक-युवतींनी स्वतःचे व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे.
प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात फोटोग्राफी, टॅली, सीएनसी ऑपरेटर, ब्युटी पार्लर आणि जेंट्स पार्लर या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांची आणि कौशल्यांची झलक पाहून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. दिपाली शिंदे, निकिता पार्टे आणि स्नेहल घाडगे यांनी सादर केलेल्या लघुनाटिकेने उपस्थितांची मने जिंकली. पूजा सपकाळ यांनी सूत्रसंचालन, अक्षय सोनवणे यांनी प्रास्ताविक, तर कविता साठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंदन देशमुख, श्रीनिवास जमदाडे आणि चेतन जायगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो ओळ : प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीनिवास कुलकर्णी. समवेत विवेक कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, युवराज थोरात, विवेक देशपांडे व कविता साठे.




