आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बदलत्या हवामानात ‘CRA’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-बदलत्या हवामानात ‘CRA’ तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

वाई तालुक्यातील कृषी प्रकल्पांची पाहणी; आधुनिक शेती व प्रक्रिया उद्योगांवर भर.

वाई, दि. १० : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत असून, अशा परिस्थितीत ‘CRA’ (Climate Resilient Agriculture – बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी शाश्वत शेती) तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानामुळे हवामान बदलाच्या परिणामांवर प्रभावीपणे मात करता येत असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.
वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्प, फळबागा आणि कृषी प्रक्रिया उद्योगांची नुकतीच पाहणी करताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तसेच आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन केले.
दौऱ्यादरम्यान त्यांनी कुसगाव (ता. वाई) येथील प्रगतशील शेतकरी संजीव वरे यांच्या आंबा बागेला भेट दिली. येथे ‘CRA’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यानंतर पसरणी येथील शेतकरी सुनील महांगडे यांच्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या फळबागेची पाहणी केली. याच ठिकाणी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगालाही त्यांनी भेट देत उद्योजकतेला प्रोत्साहन दिले.
यावेळी मार्गदर्शन करताना फरांदे म्हणाल्या, “शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि कृषी प्रक्रिया उद्योगांचा स्वीकार करणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनाला योग्य बाजारपेठ मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.”
वाई तालुक्यात कृषी विभागामार्फत विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे सांगत त्यांनी तालुक्यातील कृषी विभागाच्या कामकाजाचे कौतुक केले. आधुनिक, शाश्वत आणि उत्पन्नवाढीला पूरक अशा शेती पद्धतींचा प्रसार करण्यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पाहणी दौऱ्यावेळी तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, उप कृषी अधिकारी किरण बाबर, निखिल मोरे, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जगताप, प्रवीण नाळे यांच्यासह प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे, तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे, राजश्री वरे, शिवराज वरे आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

2) वाई तालुक्यातील आसरे गावचे सुपुत्र अमोल सणस यांना ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान!

पुण्यातील भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरव; वाई-कोरेगाव तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव.

सातारा
वाई, दि. १० : सामाजिक, औद्योगिक आणि विकासात्मक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत वाई तालुक्यातील आसरे गावचे सुपुत्र, भारतीय जनता पक्ष उद्योग आघाडीचे सहसंयोजक तथा समाजसेवक अमोल सणस यांना प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे आयोजित भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास पुणे महानगरपालिकेच्या माजी सभागृह नेत्या स्वरदाताई बापट, उद्योजक अशोकराव पळंडे, आयएमआरपी इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. राम यादव, मराठा क्रांती मोर्चाचे नेते राहुल लोहार पवार तसेच आम आदमी पार्टी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अमोल सणस यांनी वाई व कोरेगाव तालुक्यात सामाजिक आणि जनहिताच्या कामांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विविध सामाजिक उपक्रम राबविणे, गरजूंना मदतीचा हात देणे तसेच युवकांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी स्वरदाताई बापट म्हणाल्या, “अमोल सणस हे सामाजिक बांधिलकी जपत जनतेसाठी सातत्याने कार्य करणारे ऊर्जावान युवा नेतृत्व आहे. वाई आणि कोरेगाव तालुक्यात त्यांनी विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार’ हा त्यांच्या कार्याचा योग्य गौरव आहे.”
समाजकारणासोबतच उद्योग क्षेत्रातही अमोल सणस यांनी यशस्वी वाटचाल केली आहे. उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला चालना देताना त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. त्यामुळेच राज्यस्तरावर त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
पुरस्कार स्वीकारताना अमोल सणस म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून समाजहित आणि विकासासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा देणारा आहे. हा पुरस्कार माझ्या खांद्यावर अधिक मोठी सामाजिक जबाबदारी टाकणारा आहे, याची मला जाणीव आहे.”
दरम्यान, अमोल सणस यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आसरे गावासह संपूर्ण वाई व कोरेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

3) भुईंज:-देगाव फाटा हादरला! महिलेला धडक देत आयशरचा ओढ्यात ‘स्टंट’

महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी; अनियंत्रित टेम्पो थेट ओढ्यात कोसळला, ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी.

सातारा | भुईंज दि. १० : भुईंज-देगाव महामार्गावरील सर्व्हिस रोडवर सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. भरधाव आयशर टेम्पोने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले, तर धडकेनंतर अनियंत्रित झालेला टेम्पो थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात जाऊन कोसळला.
या अपघातात प्राजक्ता नंदकुमार महानवर (वय ४०, रा. लगडवाडी, ता. वाई) या गंभीर जखमी झाल्या असून, टेम्पो चालक प्रवीण नामदेव पोळ (वय ५०) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ता महानवर या देगाव फाट्याजवळ फोनवर बोलत पायी जात असताना पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांच्या दोन्ही पायांवरून टेम्पोचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. धडक दिल्यानंतरही टेम्पो थांबला नाही आणि पुढे जाऊन थेट मोठ्या ओढ्यात कोसळला.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिला आणि चालकाला रुग्णवाहिकेद्वारे सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार दगडे करीत आहेत.
दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले? चालक झोपेत होता की अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात घडला? याची सखोल चौकशी करण्याची मागणी लगडवाडी व देगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
भुईंज ते देगाव मार्गावर दररोज शेकडो नागरिक, महिला तसेच विद्यार्थी प्रवास करतात. अपघाताच्या वेळी गर्दी कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, गर्दीच्या वेळी हा अनियंत्रित टेम्पो लोकांमध्ये घुसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अशा घटनांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button