आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-प्रेमसंबंधासाठी पतीचा काटा काढला! पत्नी, प्रियकरासह चार जण जेरबंद; कराड पोलिसांनी २४ तासांत उकलला थरारक खून.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-प्रेमसंबंधासाठी पतीचा काटा काढला! पत्नी, प्रियकरासह चार जण जेरबंद; कराड पोलिसांनी २४ तासांत उकलला थरारक खून.

कराड | दि. ०९
कराड शहर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत अवघ्या २४ तासांत एका थरारक आणि नियोजनबद्ध खुनाचा पर्दाफाश केला आहे. पतीच्या छळाला कंटाळल्याच्या कारणावरून पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात पत्नी, तिचा भाऊ आणि दोन कॉन्ट्रॅक्ट किलर अशा चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मृत लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४, मूळ रा. मनव, ता. कराड) हे ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, कराड शहर पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले आणि त्यांची पत्नी सारिका यांच्यात वारंवार वाद होत होते. दरम्यान, सारिका हिचे २०१३ पासून प्रथमेश प्रकाश थोरात (वय २५) याच्याशी प्रेमसंबंध होते. पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी सारिका आणि प्रथमेश यांनी कट रचला. या कटात आकाश अशोक होनसुरे (वय २३) यालाही सहभागी करून घेण्यात आले. खून करण्यासाठी आरोपींनी खास अल्टो कार खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे.
५ जून रोजी रात्री लक्ष्मण मंडले यांनी ठाण्याहून कराडला येत असल्याची माहिती पत्नीला दिली होती. ६ जूनच्या पहाटेपासून सारिका मंडले सतत पतीच्या संपर्कात राहून त्यांचे लोकेशन घेत होती. हे लोकेशन ती प्रियकर प्रथमेश थोरात याला पुरवत होती. पहाटे सुमारे ५.२० वाजता कोल्हापूर नाका परिसरात उतरून लक्ष्मण मंडले घराच्या दिशेने निघाले असताना शिंदे हॉस्पिटलसमोर आरोपींनी भरधाव अल्टो कारने त्यांना जोरदार धडक दिली.
धडकेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, मंडले जिवंत असल्याची शंका आल्याने ते काही वेळाने पुन्हा घटनास्थळी परतले. त्यानंतर त्यांनी पुन्हा कार अंगावर घालून त्यांना चिरडल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला असून तपासातील महत्त्वाचा पुरावा ठरला.
घटनेनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी प्रथम पत्नी सारिका मंडले आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण यांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेने कार्वे नाका आणि बैल बाजार रोड परिसरात सापळा रचून प्रथमेश थोरात आणि आकाश होनसुरे यांना अटक केली.
या प्रकरणातील चारही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १२ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, अशोक भापकर, निलेश तारू, पीएसआय निखिल मगदूम, दीपक वागवे, कृष्णा डिसले तसेच कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

2) कराड:-कृष्णा कारखाना निवडणुकीत मोठी घडामोड! अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी ६ उमेदवारांनी घेतली माघार.

मंगळवारच्या अंतिम मुदतीपूर्वी राजकीय समीकरणे बदलली; रेठरे बुद्रुक परिसरात चर्चांना उधाण.

कराड | दि. ०९ : सहकार क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलेल्या रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक (२०२६-२०३१) प्रक्रियेत अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. सोमवार (दि. ८ जून) रोजी विविध गटांतील एकूण ६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील राजकीय गणिते बदलू लागली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अर्पणा यादव यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.
व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक १ (वडगाव हवेली–दुशेरे) मधून बाळासो आकाराम जगताप (कोडोली) आणि जनता आप्पासाहेब ज्ञानदेव जगताप (कोडोली) यांनी उमेदवारी मागे घेतली. तर व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक २ (काले–कार्वे) मधून शरदराव गुणवंतराव पाटील (अटके) आणि शशिकांत अशोक जाधव (कपील) यांनी माघार घेतली.
याशिवाय व्यक्तिगत ऊस उत्पादक गट क्रमांक ५ (येडेमच्छिंद्र–वांगी) मधून प्रतापसिंह आनंदराव जाधव (हिंगणगाव खुर्द) यांनी उमेदवारी मागे घेतली. तसेच इतर मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघातून संजय बाबुराव शेवाळे (सवादे) यांनीही आपला अर्ज मागे घेतला.
अर्ज माघारीची अंतिम मुदत मंगळवार, दि. ९ जून असल्याने आणखी काही उमेदवार माघार घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम मुदतीनंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार आणि कोणत्या गटांमध्ये थेट लढती होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पहिल्याच दिवशी झालेल्या या सहा माघारींमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात राजकीय चर्चांना वेग आला असून, सभासद आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मंगळवारच्या अंतिम घडामोडीनंतर कृष्णा कारखाना निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.

3) पाटण:-तरुणाईचा आदर्श पुढाकार! तामकडे गावात ‘एक दिवस गावासाठी’ उपक्रम; श्रमदानातून गाव चकाचक.

पाटण दि. ०९ : “आपलं गाव, आपली जबाबदारी” या भावनेतून तामकडे गावातील युवकांनी राबविलेल्या ‘एक दिवस गावासाठी’ या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. रविवारी गावातील युवक, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून संपूर्ण गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवला.
या उपक्रमांतर्गत गावातील मुख्य रस्ते, शाळा, मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली. रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे काढून मार्ग मोकळे करण्यात आले. तसेच गावात विखुरलेला प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
स्वच्छतेबरोबरच गावाच्या सौंदर्यीकरणावरही भर देण्यात आला. भविष्यात कोणत्या ठिकाणी वृक्षारोपण करायचे, सार्वजनिक जागांचा विकास कसा करायचा याचे नियोजनही युवकांनी यावेळी केले. त्यामुळे हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
पाटण तालुक्यातील पुरस्कारप्राप्त ‘माण्याचीवाडी’ गावाच्या प्रेरणेने तामकडे गावातील युवकांनी घेतलेला हा पुढाकार परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. गाव स्वच्छ, सुंदर आणि पर्यटनासाठी आकर्षक बनवण्याच्या उद्देशाने युवकांनी पुढील काळातही नियमित श्रमदान सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दर रविवारी शाळा, मंदिरे, शासकीय जागा आणि रस्त्यांच्या कडेला स्वच्छता मोहीम राबविणे तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून गाव हरित बनवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. युवकांच्या एकजुटीमुळे तामकडे गावाला विकासाची नवी दिशा मिळत असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
“गाव बदलायचे असेल, तर तरुणाईने पुढे यावे लागते” याची प्रचिती तामकडेच्या युवकांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button