सोलापूर:-“माणुसकीचा हात पुढे; WOW संघटनेच्या महिलांनी दिव्यांग बाबू बेरे यांना दिली तीन चाकी सायकल, आनंदाश्रूंनी व्यक्त केल्या भावना!”
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“माणुसकीचा हात पुढे; WOW संघटनेच्या महिलांनी दिव्यांग बाबू बेरे यांना दिली तीन चाकी सायकल, आनंदाश्रूंनी व्यक्त केल्या भावना!”

Wow संघटनेने दिला दिव्यांगाला आधार; तीन चाकी सायकल भेट देत दिले नवजीवन.
सोलापूर
समाजातील गरजू, वंचित आणि दिव्यांग बांधवांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या WOW संघटनेने पुन्हा एकदा माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. कोनापुरे चाळ परिसरातील दिव्यांग युवक श्री. बाबू बेरे यांना उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दिवसभर उन्हातान्हात, अनवाणी पायाने घराघरांत फिरत असताना त्यांची होणारी फरफट आणि हालअपेष्टा पाहून WOW संघटनेच्या महिला प्रतिनिधी श्रीमती मार्था आसादे यांचे मन हेलावून गेले.
बाबू बेरे यांच्या परिस्थितीची जाणीव होताच श्रीमती मार्था आसादे यांनी संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्याकडे त्यांच्या मदतीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर WOW संघटनेच्या महिला सदस्यांनी एकत्र येत वर्गणी जमा केली आणि बाबू बेरे यांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना तीन चाकी सायकल भेट देण्याचा निर्णय घेतला.
संघटनेच्या वतीने बाबू बेरे यांना नवीन तीन चाकी सायकल भेट देण्यात आली. ही सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. बोलता येत नसतानाही त्यांनी आपल्या भावना अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
या वेळी परिसरातील नागरिकांनी WOW संघटनेच्या कार्याचे कौतुक करत भावना व्यक्त केल्या. “आमची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मदत करण्याची इच्छा असूनही आम्ही बाबूला मदत करू शकलो नाही. मात्र WOW संघटनेने ते काम करून दाखवले,” अशा शब्दांत त्यांनी संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. झोपडपट्टी परिसरातील महिलांनीही संघटनेचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमामुळे केवळ एका दिव्यांग व्यक्तीला मदतीचा हात मिळाला नाही, तर समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेशही पोहोचला आहे. WOW संघटनेच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी WOW संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांच्यासह शोभा गायकवाड, मार्था आसादे, पुष्पा हलकुडे, स्वाती मुकणार, वैशाली देशपांडे, स्वाती जाधव, शबाना मुलाणी, शीतल वाघमारे, नागम्मा बेरे, मोनिका बेलदोर, यल्लाम्मा म्हेत्रे आदी महिला उपस्थित होत्या.




