कराड:-स्वच्छतेत कराड आगाराचा दबदबा कायम! पुणे विभागात ‘द्वितीय’ मानांकित; आज पुण्यात होणार गौरव.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-स्वच्छतेत कराड आगाराचा दबदबा कायम! पुणे विभागात ‘द्वितीय’ मानांकित; आज पुण्यात होणार गौरव.

कराड दि. ०१ : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या चौथ्या फेरीत कराड आगाराने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप उमटवत पुणे विभागातील ‘अ’ वर्गात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे कराड आगाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, आज एस.टी. महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त पुणे येथे होणाऱ्या भव्य समारंभात या यशाचा गौरव करण्यात येणार आहे.
कराड आगाराने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. पहिल्या फेरीत राज्यात थेट द्वितीय क्रमांक, तिसऱ्या फेरीत पुणे विभागात तृतीय क्रमांक आणि आता चौथ्या फेरीत पुन्हा द्वितीय क्रमांक मिळवत कराड आगाराने स्वच्छता, शिस्त आणि प्रवासी सेवेमधील आपले वर्चस्व कायम राखले आहे.
राज्यस्तरीय उच्चस्तरीय समितीने कराड बसस्थानकाची सखोल पाहणी करत प्रवासी आरक्षण कक्ष, चौकशी केंद्र, पास विभाग, वाहतूक नियंत्रक कक्ष, आगार व्यवस्थापक कार्यालय, विविध नोंदवही व प्रशासकीय कामकाज, तसेच पुरुष-महिला स्वच्छतागृहे आणि चालक-वाहक विश्रांतीगृहांची तपासणी केली. सर्व निकषांवर कराड आगाराने उत्कृष्ट गुण मिळवत हा मानाचा बहुमान पटकावला.
“हे यश अधिकारी, चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सामूहिक मेहनतीचे फलित आहे. प्रवाशांना दर्जेदार सेवा आणि स्वच्छ परिसर उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत,” अशी भावना कराड आगार व्यवस्थापनाने व्यक्त केली.
कराड आगाराच्या या यशामुळे संपूर्ण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, आज पुण्यात होणाऱ्या गौरव सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वच्छता आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या बळावर कराड आगाराने पुन्हा एकदा आपला लौकिक सिद्ध केला आहे.
2) कराड:-“जिंकलेल्यांसह हरलेल्यांचाही जल्लोष! सवादेत लोकशाहीचा अनोखा सोहळा; पराभूत लढवय्यांनाही मिळाला मानाचा मुजरा”.

मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत विजयी-पराभूत उमेदवारांचा शाही सत्कार; उदयसिंह दादांच्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक.
कराड दि. ०१ : निवडणुकीतील विजय-पराजयाच्या राजकारणाला छेद देत कराड तालुक्यातील सवादे येथे लोकशाहीचा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबतच पराभूत उमेदवारांचाही तितक्याच सन्मानाने गौरव करण्यात आल्याने सवादे गावाने राजकीय संस्कृतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्याने परिसराचे लक्ष वेधून घेतले.
या सोहळ्यात विजयी उमेदवार नितीन थोरात, सौ. विजया थोरात, सौ. वृषाली पाटील, सौ. स्वाती थोरात आणि सौ. पूजा काटवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मात्र कार्यक्रमाचे खरे आकर्षण ठरले ते निवडणुकीत अल्प मतांनी पराभूत झालेल्या, पण जनतेसाठी आणि पक्षासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या उमेदवारांचा सन्मान.
मंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांच्या हस्ते पराभूत उमेदवारांचाही गौरव करण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्व उमेदवारांचे स्वागत केले.
उदयसिंह दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, निवडणूक म्हणजे केवळ विजयाचा उत्सव नसून लोकशाहीसाठी लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान असतो, हा संदेश सवादेकरांनी कृतीतून दिला.
यावेळी बोलताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले, “विजयी उमेदवारांचा सत्कार सर्वत्र होतो; मात्र पराभूत उमेदवारांच्या कार्यालाही सन्मान देणारा हा उपक्रम खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत करणारा आहे. हा सकारात्मक पायंडा राज्यभर राबविण्याचा प्रयत्न केला जाईल.”
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, रयत संघटनेचे कार्यकर्ते, विविध गावांतील नागरिक आणि समर्थक यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. सवादेच्या या उपक्रमाने राजकीय परिपक्वता आणि लोकशाही मूल्यांचा नवा आदर्श निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
3) कराड:-वेणूताई चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन; जन्मशताब्दी विशेषांकाचे कराडमध्ये दिमाखदार प्रकाश.

पुण्यतिथीनिमित्त विविध संस्थांचा संयुक्त उपक्रम; शिक्षण, समाजकारण आणि संस्कारांचा वारसा उजागर
कराड दि. ०२ : स्व. सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथे आयोजित अभिवादन सभेत त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्व. सौ. वेणूताई चव्हाण जन्मशताब्दी विशेषांकाचे’ मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. श्री शिवाजी शिक्षण संस्था उच्च शिक्षण मंडळ कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स आणि सौ. वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार व पणन मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था व उच्च शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुण्या म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्था, ऊरुण-ईश्वरपूरच्या जनरल सेक्रेटरी सरोज नारायण पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. वेणूताई चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आणि समाजसेवेच्या वारशाचा गौरव करत भावपूर्ण अभिवादन केले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब पाटील यांनी वेणूताईंच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदानाला उजाळा दिला.
यावेळी संस्थेचे जनरल सेक्रेटरी अल्ताफहुसेन मुल्ला, विश्वस्त अरुण पाटील, प्रकाश पाटील, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, संजय बदियानी, नंदकुमार बटाने, भास्करराव कुलकर्णी, दादासो सुतार, अशोक पोतदार, आर. जी. तांबे, माजी प्राचार्य बी. एन. कालेकर, एस. बी. केंगार यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन वेणूताई चव्हाण कॉलेजचे प्राचार्य आर. आर. जाधव आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य एस. एच. बुरुंगले यांनी केले. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
वेणूताई चव्हाण यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प या अभिवादन सभेतून व्यक्त करण्यात आला.
4) कराड:-‘लोकतीर्थ’वर कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा महासागर; कदम-मोहिते-भोसले यांची एकजूट, सहकार पॅनेलच्या विजयाचा निर्धार!

ऐतिहासिक गर्दीत पार पडला सभासद संवाद मेळावा; स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प.
कराड दि. ०२ : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनेते स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतींना साक्षी ठेवून सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातील ‘लोकतीर्थ’ येथे आयोजित करण्यात आलेला कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा संवाद मेळावा उत्साह, जल्लोष आणि ऐतिहासिक गर्दीत संपन्न झाला. या मेळाव्यात कदम, मोहिते आणि भोसले नेतृत्वाची अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली असून, सहकार पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मेळाव्यापूर्वी उपस्थित मान्यवरांनी सहकार महर्षी स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ स्मृतिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी डॉ. कदम यांच्या सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.
“सहकार क्षेत्राला लोकचळवळीचे स्वरूप देत ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण करणारे डॉ. पतंगराव कदम यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी उभारलेल्या संस्था आजही विकासाची दिशा दाखवत आहेत,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि विकासाची यशस्वी परंपरा कायम ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. सभासदांच्या विश्वासाच्या बळावर कृष्णा कारखान्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला.
या मेळाव्याला आ. मोहनराव कदम, आ. डॉ. विश्वजीत कदम, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन मदनदादा मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, आ. डॉ. अतुल भोसले, डॉ. शांताराम कदम, रघुनाथराव कदम, डॉ. जितेश कदम, दिग्विजय कदम, सुदन मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कृष्णा कारखान्याचे सभासद, शेतकरी बांधव आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसर सहकार पॅनेलच्या घोषणांनी दणाणून गेला होता. शेवटपर्यंत उत्साह कायम राहिल्याने हा मेळावा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन ठरल्याची चर्चा सभासदांमध्ये रंगली.
5) कराड:-आठवणींचा जल्लोष अन् यशाचा गौरव! कराडच्या महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात.

महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या कु. श्वेता यादवचा विशेष सत्कार; जुन्या आठवणींना उजाळा.
कराड, दि. ०२ : शिक्षण मंडळ कराड संचलित महिला महाविद्यालय, कराड येथे माजी विद्यार्थिनी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साह, स्नेह आणि भावनिक क्षणांनी भरलेला वातावरणात संपन्न झाला. माजी विद्यार्थिनींनी अनेक वर्षांनंतर एकत्र येत कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आली. पर्यावरणपूरक आणि प्रेरणादायी अशा या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष स्वागत केले. माजी विद्यार्थिनी संघाच्या अध्यक्षा सौ. ज्योती पाटील यांनी प्रास्ताविकातून सर्व माजी विद्यार्थिनींचे स्वागत करत मेळाव्याचे महत्त्व विशद केले.
या मेळाव्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते महिला महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. श्वेता यादव हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल करण्यात आलेला विशेष सत्कार. तिच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी सौ. स्वप्ना केतकर, सौ. शोभा पाटील, श्रीमती प्रतीक्षा भाडळकर, तेजस्विनी जोशी आणि स्वाती कलबुर्गी यांनी मनोगते व्यक्त करताना महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाने दिलेल्या संस्कारांमुळे आणि शिक्षणामुळे आयुष्यात घडलेल्या सकारात्मक बदलांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भरत बजरंग बल्लाळ होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी माजी विद्यार्थिनींच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय यशाचा गौरव करत महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख भविष्यातही अधिक उंचावत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी प्रा. उज्वला ताटे, सौ. ज्योती पाटील, सौ. स्मिता सावंत, सौ. वैशाली सुभेदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. विलास सखाराम सुर्वे आणि प्रा. किशोर गुजर यांनी केले, तर डॉ. अखिलेश शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
मोठ्या संख्येने माजी विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा मेळावा जुन्या आठवणी, नव्या प्रेरणा आणि यशाचा गौरव यांचा सुंदर संगम ठरला.
6) कराड:-कुस्तीच्या तपस्व्याचा भव्य गौरव! वस्ताद नजरुद्दीन नायकवडी यांचा आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान.

कराड दि. ०२ : कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादी संघटित कामगार संघटनेच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील पहिले शिवछत्रपती पुरस्कार विजेते, गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे मानकरी तसेच आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक वस्ताद नजरुद्दीन महंमद नायकवडी यांचा ईश्वरपूर येथे विशेष सन्मान करण्यात आला. सिद्धनाथ मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे माजी जलसंपदा व गृहमंत्री Jayant Patil यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.
लोकनेते राजारामबापू कुस्ती केंद्राच्या माध्यमातून वस्ताद नजरुद्दीन नायकवडी यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविले आहेत. कुस्ती क्षेत्रातील तपस्वी, शिस्तप्रिय प्रशिक्षक आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आजवर विविध पुरस्कार आणि सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, उपनगराध्यक्ष खंडेराव जाधव, इंद्रप्रस्थ नागरी पतसंस्थेचे चेअरमन संग्रामसिंह पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच सरचिटणीस बाळासाहेब पाटील, अध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील, नगरसेवक सचिन कोळी, जावेद ईबुशे, शिवाजीराव जाधव, आष्टा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विशाल शिंदे आणि उपनगराध्यक्ष दिलीपराव वग्याणी यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सुभाष सूर्यवंशी, विक्रम धुमाळ, निवास जाधव, प्रकाश पवार आणि नौशाद नायकवडी यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. या सोहळ्यास परिसरातील क्रीडाप्रेमी, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वस्ताद नायकवडी यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.
7) उंडाळे:-राळेगणसिद्धीत पर्यावरणाचा महासंगम; अण्णा हजारेंच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यशाळा ५ जूनला!

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यभरातील पर्यावरणप्रेमी एकाच व्यासपीठावर; संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प.
उंडाळे दि. ०२ : निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय पर्यावरण कार्यशाळेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. वृक्षमित्र स्व. आबासाहेब मोरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची माहिती मंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी दिली.
सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक Anna Hazare राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून Dr. Pankaj Ashiya उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेत पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकास या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक आर. मुमक्का सुदर्शन, चंद्रकांत शिंदे, ॲड. सुरेश लगड, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड तसेच विभागीय वनाधिकारी अमोल जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी होणार असून पर्यावरण संरक्षणाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
“पर्यावरण जनजागृती ही काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे. राज्यातील नागरिकांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे यांनी केले आहे.




