शिरूरमध्ये टोळीयुद्धातून थरार: करडे घाटात कार अडवून गोळीबार, माजी नगरसेवक मल्लाव खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू.
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिरूरमध्ये टोळीयुद्धातून थरार: करडे घाटात कार अडवून गोळीबार, माजी नगरसेवक मल्लाव खून प्रकरणातील आरोपीचा मृत्यू.

शिरूर:
शिरूर-चौफुला मार्गावरील करडे घाटात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका टोळीयुद्धाच्या वादातून भीषण गोळीबार झाला. चार ते पाच जणांच्या टोळीने फिल्मी स्टाईलने कार आडवी लावून केलेल्या या हल्ल्यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुण आणि मुख्य संशयित हल्लेखोर हे दोघेही शिरूरचे माजी नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या खून प्रकरणातील जामीनप्राप्त आरोपी असल्याने या घटनेने पुणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कारला धडक दिली, मग डोक्यात घातल्या गोळ्या!
विशाल सुनील काळे (वय ३१, रा. ढोरआळी, मुंबई बाजार, शिरूर) असे या गोळीबारात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर केदार चंद्रकांत झाडगे (वय २५, रा. कुंभार आळी, शिरूर) आणि उमेश अनिल जगदाळे (वय २६, रा. ढोरआळी, मुंबई बाजार, शिरूर) हे दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. झाडगे याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल काळे आणि त्याचे मित्र कारमधून चालले असताना, हल्लेखोरांनी प्रथम आपल्या ताब्यातील कारने काळे यांच्या कारला जोरात धडक दिली. कार थांबताच हल्लेखोरांनी विशाल काळे याला जबरदस्तीने कारबाहेर ओढले आणि त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या. गोळी लागून विशाल रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्यानंतरही हल्लेखोरांचे समाधान झाले नाही; त्यांनी त्याच्या डोक्यात मोठा दगड घातला. यानंतर हल्लेखोरांनी कारमधील इतर सहकाऱ्यांवरही जीवघेणी दगडफेक केली आणि तेथून पळ काढला.
मल्लाव खून प्रकरणाची पार्श्वभूमी आणि आर्थिक वाद
पोलिस तपासातील महत्त्वाची माहिती:
मृत विशाल काळे आणि मुख्य हल्लेखोर सनी यादव हे दोघेही शिरूरचे माजी नगरसेवक महेंद्र मल्लाव यांच्या हत्याकांडातील आरोपी आहेत. काही दिवसांपूर्वीच ते जामिनावर बाहेर आले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात अंतर्गत आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून तीव्र वाद सुरू होते. याच वादाचा कटू शेवट आजच्या या गोळीबारात झाला.
वाघोलीतील संशयितांवर गुन्हा दाखल
जखमी उमेश जगदाळे याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मुख्य संशयित सनी संजय यादव (रा. बकोरी फाटा, वाघोली, पुणे) आणि विशाल पन्दी (रा. वाघोली, पुणे) यांच्यासह त्यांच्या इतर ४ ते ५ साथीदारांविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) आणि इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने करडे घाटात धाव घेऊन पंचनामा केला. परिसरातील संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू असून, आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा घडलेल्या या थरारक प्रकरामुळे शिरूर आणि परिसर हादरून गेला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



