वाई तालुक्यात मध्यरात्रीचा थरार! एकसर पार्टेवाडीत सशस्त्र दरोडा; माजी सैनिकाच्या कुटुंबाला मारहाण करत मंगळसूत्र लंपास.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई तालुक्यात मध्यरात्रीचा थरार! एकसर पार्टेवाडीत सशस्त्र दरोडा; माजी सैनिकाच्या कुटुंबाला मारहाण करत मंगळसूत्र लंपास.

दरवाजा तोडून ४ अज्ञातांचा घरात धुमाकूळ; वृद्ध दाम्पत्यावर हल्ला, नातवाला खोलीत केले बंद
सातारा |
वाई दि. २४ : वाई तालुक्यातील एकसर पार्टेवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. तोंडाला पांढरे फडके बांधून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश करत वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण केली आणि सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र लंपास केले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकसर पार्टेवाडी येथील रहिवासी शिवाजी देशमुख (आण्णा) आणि त्यांच्या पत्नी सुमन देशमुख हे घराच्या पडवीत झोपले होते. त्यांचा नातू पंकज देशमुख हा सुट्टीसाठी गावी आला असून तो आतील खोलीत झोपला होता. पहाटे साधारण तीनच्या सुमारास दरवाजा तोडल्याचा मोठा आवाज झाल्याने सुमन देशमुख यांना जाग आली. तोपर्यंत चार दरोडेखोर घरात घुसले होते.
घरात प्रवेश करताच चोरट्यांनी कपाटांची उचकापाचक सुरू केली. सुमन देशमुख यांच्या उशीजवळ ठेवलेले १२.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र त्यांनी लंपास केले. तसेच कानातील सोन्याची फुले हिसकावण्याचाही प्रयत्न केला. मात्र ती खाटेखाली पडल्याने चोरट्यांच्या हाती लागली नाहीत.
यावेळी दरोडेखोरांनी शेजारी झोपलेल्या शिवाजी देशमुख यांना खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण केली. सुमन देशमुख यांनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आतील खोलीत झोपलेला पंकज बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र दरोडेखोरांनी त्याच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून ठेवला होता. खिडकीतून पाहिले असता चारही इसम अंधाराचा फायदा घेत पळून जाताना दिसले.
दरम्यान, देशमुख यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी या चोरट्यांनी परिसरातील सुधीर शेलार यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला होता. मात्र घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे लक्षात येताच त्यांनी आपला मोर्चा देशमुख यांच्या घराकडे वळवला.
विशेष म्हणजे, शिवाजी देशमुख यांची दोन्ही मुले भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावून आलेली आहेत. देशासाठी सेवा केलेल्या सैनिकाच्या कुटुंबावरच अशा प्रकारे हल्ला झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच कुटुंबाच्या घरी तीन वर्षांपूर्वीही चोरीची घटना घडली होती.
घटनेनंतर शेजाऱ्यांनी तातडीने ‘डायल ११२’ वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. वाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
पंकज कल्याण देशमुख यांच्या तक्रारीवरून वाई पोलीस ठाण्यात अज्ञात चार दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून तपास वेगाने सुरू आहे.




