वाई:-विदेशी पाहुणाही झाला वाईच्या लघु कुंभमेळ्याच्या भक्तिमय वातावरणाचा चाहता! ऑस्ट्रेलियन पीटर म्हणाला — “हिंदू संस्कृतीतील आदरभाव जगात भारी!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-विदेशी पाहुणाही झाला वाईच्या लघु कुंभमेळ्याच्या भक्तिमय वातावरणाचा चाहता!
ऑस्ट्रेलियन पीटर म्हणाला — “हिंदू संस्कृतीतील आदरभाव जगात भारी!”

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई नगरीत सुरू असलेल्या भव्य लघु कुंभमेळ्याची कीर्ती आता थेट परदेशात पोहोचली आहे. साधू-संतांच्या उपस्थितीने आणि भक्तिमय वातावरणाने नटलेल्या या सोहळ्याने थेट ऑस्ट्रेलिया येथून आलेल्या पाहुण्यालाही अक्षरशः भारावून टाकले. “हिंदू संस्कृतीतील आदरभाव आणि माणुसकी जगात सर्वोत्तम आहे,” अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन नागरिक पीटर हर्ड यांनी वाईच्या संस्कृतीचे तोंडभरून कौतुक केले.
वाई एमआयडीसीतील गरवारे वॉल रोप्स कंपनीत कामानिमित्त आलेल्या पीटर यांना लघु कुंभमेळ्याविषयी माहिती मिळताच त्यांनी थेट वाई गाठली. कृष्णामाईच्या घाटावर सुरू असलेली महाआरती, साधू-संतांचा दरबार, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो भाविकांचा उत्साह पाहून ते थक्क झाले.
कार्यक्रमस्थळी लघु कुंभमेळ्याचे निमंत्रक तथा वाई नगरपरिषद अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन पीटर यांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. भारतीय पद्धतीने झालेल्या या सत्काराने ते विशेष भारावून गेले.
प्रसार माध्यमांशी बोलताना पीटर म्हणाले, “वाईमध्ये पहिल्यांदाच असा भव्य मेळावा होत असल्याचं समजलं आणि हा अनुभव घेण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. इथले लोक अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. मला कुठेही भीती वाटली नाही, उलट खूप सुरक्षित वाटलं.”
भारत भेटीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मी भारतात तिसऱ्यांदा आलो आहे. मुंबईपेक्षा वाईचं वातावरण खूप शांत, थंड आणि आल्हाददायक आहे.” यावेळी त्यांनी हसतच “क्रिकेटमध्येही तुम्ही आम्हाला भारी पडता,” अशी मिश्किल कबुली दिली.
हिंदू संस्कृतीबद्दल बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “इथल्या लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे. जगभर फिरलो, पण असा आदरभाव क्वचितच पाहायला मिळतो.”
वाईच्या पावन भूमीत ‘अतिथी देवो भव’ची परंपरा पुन्हा एकदा जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले असून, ऑस्ट्रेलियन पाहुण्याने केलेल्या या कौतुकामुळे लघु कुंभमेळ्याची चर्चा आता राज्यासह परदेशातही रंगू लागली आहे.




