वाई:-प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात.

वाई : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘ज्ञानामृत’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन मा. मदनदादा भोसले व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. डॉ. झांबरे यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजे, या उद्देशाने ‘ज्ञानामृत हा गौरवग्रंथ महत्त्वाचा आहे. संस्थाध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या शुभहस्ते प्रा.डॉ.झांबरे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले व झांबरे दांपत्याचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, संचालक श्री. केशवराव पाडळे, श्री. सुरेश यादव, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. शिवाजी ताटे, ज्ञानामृत या ग्रंथाचे संपादक डॉ. संदीप वाटेगांवकर, सहसंपादक प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे आणि डॉ. संग्राम थोरात यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री. मदनदादा भोसले म्हणाले, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांचा जीवनप्रवास हा संघर्षातून यशाकडे जाणारा प्रेरणादायी आहे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडवले आणि संशोधन क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. झांबरे सरांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. अशा व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे म्हणजे शिक्षण क्षेत्राचा गौरव आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, झांबरे सरांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला असून त्यांनी शिक्षक म्हणून केवळ ज्ञानदानच केले नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न केले. त्यांच्या कार्यातून महाविद्यालयाच्या मूल्यांना अधिक बळकटी मिळाली आहे. सत्काराला उत्तर देताना गौरवमूर्ती डॉ. झांबरे यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, जनता शिक्षण संस्थेने मला काम करण्यासाठी योग्य संधी दिली. सहकारी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच माझा प्रवास यशस्वी झाला. या संस्थेचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.
या कार्यक्रमात अनेकांनी डॉ. झांबरे यांच्या विषयी मनोगते व्यक्त करून, त्यांच्या जीवनावर व शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी ताटे यांनी केले तर गौरवग्रंथाविषयी माहिती डॉ. संदीप वाटेगावकर यांनी दिली. मानपत्राचे वाचन प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी केले,
सूत्रसंचालन डॉ. मंजुषा इंगवले यांनी केले तर आभार सहा. प्राध्यापक संदीप पातूगडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आप्तेष्ट मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




