वाई:-कातकरी समाजाच्या ‘घरकुल’ स्वप्नाला बळ; विभागीय आयुक्तांकडून कामाची पाहणी – प्रशासकीय यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; ‘प्रधानमंत्री जनमन योजने’तून २१ घरकुलांचे काम प्रगतीपथावर.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कातकरी समाजाच्या ‘घरकुल’ स्वप्नाला बळ; विभागीय आयुक्तांकडून कामाची पाहणी – प्रशासकीय यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; ‘प्रधानमंत्री जनमन योजने’तून २१ घरकुलांचे काम प्रगतीपथावर.

वाई, दि. २५ : वाई तालुक्यातील पाचवड येथे प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत कातकरी समाजासाठी उभारण्यात येत असलेल्या २१ घरकुल प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन कामाची पाहणी केली.
या दौऱ्यामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, घरकुलांचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत.
या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप तसेच पाचवडचे सरपंच महेश गायकवाड उपस्थित होते. मान्यवरांनी बांधकामाची बारकाईने तपासणी करत कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, “एकही कुटुंब घरापासून वंचित राहू नये आणि सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अधिकाऱ्यांनी कातकरी वस्तीत जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेत शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. दौऱ्यादरम्यान परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
“शासनाच्या जनकल्याणकारी योजना जेव्हा प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास साध्य होतो. पाचवडमधील हा प्रकल्प कातकरी समाजाच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवेल,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या प्रकल्पामुळे कातकरी बांधवांना हक्काचे घर मिळणार असून, कामाच्या गतीमुळे महसूल व पंचायत समिती प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




