आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-देगावात खरीपाचा बिग प्लॅन! शेतकरी गटांची एकजूट; आधुनिक शेतीकडे निर्णायक पाऊल.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-देगावात खरीपाचा बिग प्लॅन! शेतकरी गटांची एकजूट; आधुनिक शेतीकडे निर्णायक पाऊल.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

देगाव (ता. वाई)२४ : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर देगाव येथे शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण हंगामपूर्व नियोजन बैठक उत्साहात पार पडली. भैरवनाथ शेतकरी गट, कृषी क्रांती गट, आझाद हिंद शेतकरी गट आणि प्रगती महिला शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या बैठकीत शेतीत संघटितपणे काम करण्याचा ठोस निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी विनोद शेळके व सुवर्णा थोरात उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
विनोद शेळके यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून एकत्रितपणे निविष्ठा खरेदी केल्यास उत्पादन खर्चात मोठी बचत होऊ शकते.” तसेच बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासणे अत्यंत गरजेचे असून, त्यामुळे संभाव्य नुकसान टाळता येते, असे त्यांनी अधोरेखित केले.
सुवर्णा थोरात यांनी कृषी विभागाच्या महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलविषयी माहिती देत, पीक प्रात्यक्षिके, प्रमाणित बियाणे आणि विविध शासकीय योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. शेतकरी गटांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीचे अध्यक्ष तथा देगावचे माजी सरपंच सुरज पिसाळ यांनी सांगितले की, “देगावमधील शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वाटचाल करत असून, प्रत्येक गटाला तांत्रिक व प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी आम्ही कृषी विभागास पूर्ण सहकार्य करू.”
या बैठकीस गावातील सर्व शेतकरी गटांचे अध्यक्ष, सचिव तसेच प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भुईंज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हंगामपूर्व मार्गदर्शन सुरू केल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत मिळत असून, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या मार्गदर्शन बैठकींमुळे शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढत असून, नियोजनबद्ध आणि आधुनिक शेतीकडे त्यांची वाटचाल अधिक वेगाने होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

2) कराड:-“गीत आणि संगीत मानवी जीवनात आनंद निर्माण करते” — अजित थोरात

कराड, दि. २४ : मळाई ग्रुप मलकापूर, जिमखाना असोसिएशन व समाज प्रबोधिनी सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संगीत रजनी – गीत निनाद’ अंतर्गत ‘गाणी तुमच्या मनातील’ हा बहारदार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अजित थोरात यांनी गीत-संगीताचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “गीत आणि संगीतामुळे अखिल विश्वात आनंदाच्या लहरी निर्माण होतात. मानवी जीवनातील ताण-तणाव दूर होऊन ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ निर्माण होतात.”
दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. २२ रोजी शरद तांबवेकर सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलानी यांनी उपस्थित राहून सुंदर गीत सादर केले. तसेच अशोकराव थोरात यांच्या आवाजातील ‘पहाटे केव्हातरी रात्र उलटून गेली’ व ‘काळ्या मातीत…’ या गीतांनी वातावरण भारावून गेले.
हा कार्यक्रम मलकापूर येथील आनंदराव चव्हाण विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमात प्रा. मोनाली उपरे, अपर्णा काटकर, मयुरी जाधव, उमेश भोकर, शिवराज इंगवले, शुभांगी कल्याणकर, डॉ. अपर्णा कुलकर्णी, मधुरा पाटील, सुनील परीट, शिवानंद स्वामी आणि अभिजित तडाके यांनी आपल्या सुरेल गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
निवेदनाची धुरा अनिल थोरात सर यांनी समर्थपणे सांभाळली. हार्मोनियमवर शरद तांबवेकर, तर तबल्यावर ज्ञानेश्वर कल्याणकर व अभिजित भोयटे यांनी उत्कृष्ट साथ दिली. साउंड रिदमची जबाबदारी अमोल कुलकर्णी व श्रेयस तांबवेकर यांनी पार पाडली.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सुरेल गाणी, भावपूर्ण सादरीकरण आणि उत्साही वातावरणामुळे उपस्थितांनी कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
एकंदरीत, मळाई ग्रुपच्या या उपक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत परंपरेचे जतन व संवर्धन करत रसिकांना एक अविस्मरणीय सांस्कृतिक पर्व अनुभवायला मिळाले.

3) शिरवळ:-कडक कारवाई! शिरवळमध्ये ४.४४ लाखांचा मुद्देमाल जप्त; हातभट्टी दारू वाहतूक उघड.

शिरवळ, दि. २३ : सातारा जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला असून, भरारी पथकाने शिरवळ (ता. खंडाळा) येथे धाडसी कारवाई करत मोठा साठा उघडकीस आणला. या कारवाईत हातभट्टी दारू आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी शिरवळ परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मारुती सुझुकी वॅगनआर गाडीची तपासणी करण्यात आली. तपासणीत ३५ लिटर क्षमतेचे एकूण १२ प्लास्टिक कॅन आढळून आले, ज्यामध्ये तब्बल ४२० लिटर हातभट्टी दारू साठवलेली होती.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे व विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या सूचनेनुसार पार पडली.
कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सागर आवळे, अजित रसाळ, आबासाहेब जानकर, अरुण जाधव व बाळासो पांचुदे यांचा सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत.
दरम्यान, “जिल्ह्यात कुठेही बनावट किंवा हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री अथवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती द्यावी,” असे आवाहन अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांनी केले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button