मायणी:-“उन्हाचा तडाखा वाढला; थंडगार फळांकडे नागरिकांची धाव!”
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“उन्हाचा तडाखा वाढला; थंडगार फळांकडे नागरिकांची धाव!”

मायणी प्रतिनिधी :
मायणीसह पूर्व भागात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीचा प्रभाव कमी होत चालला होता. मात्र गेल्या काही दिवसांत थंडी पूर्णपणे गायब झाली असून वातावरणात मोठा बदल जाणवू लागला आहे.
दिवसा अकरा वाजल्यानंतर उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी विविध थंडावा देणाऱ्या फळांकडे व पेयांकडे वळताना दिसत आहेत. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, केळी, पपई, अननस या फळांना मोठी मागणी वाढली आहे.
उन्हाळ्याचा कडाका वाढत असल्याने ग्रामीण भागातही फळांचे स्टॉल मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. वाढत्या तापमानामुळे फळांच्या किमतीतही वाढ होत आहे. तसेच कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, फळांचे ज्यूस, ताक, दही, काकडी, गाजर, बीट यांसारख्या थंड पदार्थांनाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे लिंबालाही चांगलाच भाव मिळत आहे. बाजारात लिंबाची आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात एक लिंबू पाच ते सात रुपयांना विकले जात आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक दररोज फळांची खरेदी करत असून, जरी दर वाढले असले तरी आरोग्याच्या दृष्टीने फळांना प्राधान्य दिले जात आहे. “नागरिकांना दर्जेदार फळे देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यामुळे विक्रीतही वाढ होत आहे,” असे फळ विक्रेत्यांनी सांगितले.




