पारनेर:-(रांजणगाव)- “वाढदिवस नव्हे, विकासदिन!” – सरपंच महेश देशमुख यांचा अनोखा आदर्श.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पारनेर:-(रांजणगाव)- “वाढदिवस नव्हे, विकासदिन!” – सरपंच महेश देशमुख यांचा अनोखा आदर्श.

पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी राजकुमारी इकडे
पारनेर तालुक्यातील रांजणगाव येथील सरपंच महेश देशमुख यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक प्रेरणादायी आणि समाजाभिमुख उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे.
सामान्यतः वाढदिवसाच्या निमित्ताने होणाऱ्या अवांतर खर्चाला फाटा देत त्यांनी सार्वजनिक हितासाठी मोठे पाऊल उचलले. रांजणगाव ते पठारेमळा उपरवाट या सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे काम त्यांनी स्वखर्चातून पूर्ण करून दिले. त्यांच्या या योगदानामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, हा उपक्रम खऱ्या अर्थाने “जनतेसाठी वाढदिवस” ठरला आहे.
आजच्या काळात अनेक राजकीय नेते वाढदिवसानिमित्त अन्नदान, शाळा किंवा देवस्थानांना देणग्या देतात. मात्र महेश देशमुख यांनी या सर्वांपेक्षा वेगळा आणि दीर्घकालीन उपयोगाचा निर्णय घेत, लोकांच्या दैनंदिन गरजेशी निगडित असलेला रस्ता तयार करून दिला. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
त्यांच्या या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, माजी सरपंच शरद सरोदे, बाबा सरोदे, शिवाजी शिंदे, सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल जवक, बंटी साबळे, भाऊ देशमुख, भाऊ येणारे, पत्रकार राजकुमार इकडे, मनोहर साबळे, राजू पवार, बाळासाहेब गाढवे, काशिनाथ लोणकर, देवा धोंडे तसेच ग्रामस्थांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
“केक नाही, रस्ता कापला – विकासासाठी वाढदिवस साजरा करणारा खरा नेता!”
2) पारनेर:-(रांजणगाव रोड)-उत्साह, भक्ती आणि कीर्तनमय वातावरणात हनुमान जयंती साजरी! –

पारनेर तालुक्यातील रांजणगाव रोड येथे श्री हनुमान मंदिर परिसरात यंदाची हनुमान जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने साडेतीन दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताहात अमृतानुभव पारायण, हरिनामाचा गजर आणि कीर्तन सोहळ्यांचे सुंदर नियोजन करण्यात आले होते. विविध कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेद्वारे उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
या कीर्तन सोहळ्यात आदरणीय ह.भ.प. मच्छिंद्र महाराज पवार, ह.भ.प. गणेश महाराज पाठक, ह.भ.प. संपत महाराज जवक यांनी आपली सेवा अर्पण केली. कार्यक्रमाची सांगता ह.भ.प. अमृत महाराज शिंदे यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले.
साडेतीन दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाची आणि हनुमान जयंतीची सांगता अत्यंत उत्साहात पार पडली. यासोबतच सहभोजनाचेही उत्तम नियोजन करण्यात आले होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन रांजणगाव रोड येथील एस.पी. ग्रुप तसेच ग्रामस्थ आणि सर्व भाविकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या करण्यात आले.
👉 “भक्ती, कीर्तन आणि एकतेचा संगम – रांजणगाव रोडवर हनुमान जयंतीचा जल्लोष!”




