कराड:-रेशनचा काळाबाजार फोडला! कराडमध्ये धान्याचा मोठा साठा जप्त; रॅकेट उघडकीस.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

रेशनचा काळाबाजार फोडला! कराडमध्ये धान्याचा मोठा साठा जप्त; रॅकेट उघडकीस.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कराड दि. ३० : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (रेशन) गरजूंसाठी येणाऱ्या गहू आणि तांदळाचा बेकायदेशीर साठा उघडकीस आल्याने कराडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर धान्य जप्त करण्यात आले असून, या कारवाईमुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांना वाखण रोड परिसरातील एका शेडमध्ये रेशनच्या धान्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची गंभीरता ओळखून नायकवडे यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वाखण रोडवरील बंद शेडची तपासणी केली असता, आत प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला गहू आणि तांदळाचा मोठा साठा आढळून आला. शेड मालकाला तातडीने पाचारण करण्यात आले. प्राथमिक चौकशीत रमेश पाटणे याचा या साठ्याशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले.
पुरवठा विभागाने संपूर्ण साठा जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. हा साठा नेमका कुठून आणण्यात आला, तसेच कोणत्या रेशन दुकानदारांशी याचा संबंध आहे, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र या रॅकेटमध्ये मोठे मासे अडकण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांनी सांगितले की, “मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आम्ही वाखण रोडवरील शेडवर छापा टाकला. तिथे मोठ्या प्रमाणात रेशन धान्य साठा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई शासन स्तरावर सुरू आहे.”




