वाई:-आरोग्य, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संगम! वाई नगरपरिषदेच्या शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद; कृष्णोत्सवात रंगला भव्य ‘महिला गौरव’ सोहळा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-आरोग्य, सन्मान आणि सक्षमीकरणाचा संगम!
वाई नगरपरिषदेच्या शिबिराला महिलांचा प्रचंड प्रतिसाद; कृष्णोत्सवात रंगला भव्य ‘महिला गौरव’ सोहळा.

वाई दि. १९ : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वाई नगरपरिषद व महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर, औषधोपचार आणि महिला सन्मान सोहळ्याने शहरात उत्साहाची लाट निर्माण केली. कृष्णोत्सव मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या उपक्रमाला वाई शहरासह परिसरातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत कार्यक्रमाला अक्षरशः उत्सवाचे रूप दिले.
ग्रामीण रुग्णालय वाई यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी भोसले, साक्षी कन्स्ट्रक्शनच्या संचालिका सरिताताई सावंत, ॲड. दिप्ती पिसाळ, किमिन्स हायस्कूलच्या उपप्राचार्या तेजल सावंत, माजी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगराध्यक्ष अनिल सावंत आणि उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
शिबिरामध्ये महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार देण्यात आले. आरोग्य सेवेबरोबरच महिलांच्या आर्थिक सबलीकरणालाही चालना देत विविध महिला बचत गटांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला, तर विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी वातावरणात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पद्मा जाधव-पाडळे यांच्या नेतृत्वाखाली दिपाली सावंत, डॉ. जागृती पोरे, अपर्णा जमदाडे, केतकी मोरे, नूतन मालुसरे व ज्योती गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले. नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे पार पडला.
प्रास्ताविक पद्मा जाधव यांनी केले, सूत्रसंचालन केतकी मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिपाली सावंत यांनी मानले.




