माळेवाडी:-“वॉचमनच्या मुलाने गाठला UPSC चा किल्ला; श्रीरामपूरचा रोहित सांगळे 865 व्या रँकसह यशस्वी”
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“वॉचमनच्या मुलाने गाठला UPSC चा किल्ला; श्रीरामपूरचा रोहित सांगळे 865 व्या रँकसह यशस्वी”

श्रीरामपूर प्रतिनिधी संजय पगारे
श्रीरामपूरचा झेंडा UPSC मध्ये फडकला.
माळेवाडी (प्रतिनिधी): प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने मार्ग काढत श्रीरामपूरच्या रोहित निलेश सांगळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 865 वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एका छोट्याशा घरातून पाहिलेलं स्वप्न आज वास्तवात उतरल्याने संपूर्ण श्रीरामपूर शहरात आनंदाचे वातावरण आहे.
रोहितचे वडील नरेश सांगळे हे श्रीरामपूर नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने वॉचमन म्हणून काम करतात, तर आई घराबाहेर असलेल्या छोट्याशा किराणा दुकानातून संसाराचा गाडा ओढत होत्या. “आपण कष्ट सोसले तरी चालतील, पण मुलांनी शिकले पाहिजे,” या जिद्दीने त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला.
आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवत रोहितनेही अभ्यासात सातत्य ठेवले आणि पुण्यातील सीओईपीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. कोणताही महागडा क्लास न लावता केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर त्याने UPSC मध्ये यश मिळवले. यापूर्वी त्याची निवड EPFO विभागात अकाउंटंट अँड एनफोर्समेंट ऑफिसर (वर्ग-२) या पदावर झाली होती आणि ती जबाबदारी सांभाळत असतानाच त्याने UPSC ची तयारी केली.
सांगळे कुटुंबातील इतर मुलांनीही शिक्षणात उत्तम प्रगती केली आहे. रोहितची लहान बहीण रविना सांगळे हिने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले असून सध्या ती श्रीरामपूर नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ज्या नगरपालिकेत वडील वॉचमन म्हणून काम करतात, त्याच ठिकाणी मुलगी अधिकारी म्हणून काम करत असल्याचा दुर्मीळ योग या कुटुंबाने साधला आहे. धाकटा भाऊ निखिल सांगळे याने बीबीए पूर्ण करून सध्या एमबीएचे शिक्षण सुरू ठेवले आहे.
संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर रोहितने मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




