वाई:-‘प्रश्न विचारणारा विद्यार्थीच उद्याचा शास्त्रज्ञ!’ – NIV चे संशोधक डॉ.गुरुदास देशपांडे द्रविड हायस्कूलमध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चा विज्ञान प्रेरणा कार्यक्रम उत्साहात.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘प्रश्न विचारणारा विद्यार्थीच उद्याचा शास्त्रज्ञ!’ – NIV चे संशोधक डॉ.गुरुदास देशपांडे
द्रविड हायस्कूलमध्ये ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’चा विज्ञान प्रेरणा कार्यक्रम उत्साहात.

वाई दि. ०६ : “प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उपजत कुतूहल आणि जिज्ञासा असते. या कुतूहलातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचा सातत्याने शोध घेतल्यास मोठे वैज्ञानिक शोध लागतात. महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनाही एका साध्या प्रश्नातून प्रेरणा मिळाली आणि ते जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक बनले. त्यामुळे आजचा जिज्ञासू विद्यार्थीच उद्याचा शास्त्रज्ञ ठरतो,” असे प्रतिपादन पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) चे संशोधक डॉ. गुरुदास देशपांडे यांनी केले.
येथील ऐतिहासिक द्रविड हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवार, दि. ५ मार्च २०२६ रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे यांच्या वतीने आयोजित ‘विज्ञान प्रेरणा – बाह्य संपर्क कार्यक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले यांच्या हस्ते डॉ. गुरुदास देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी पदोन्नती झाल्याबद्दल उपमुख्याध्यापिका सौ. नेत्रा मुळे यांचा सत्कार डॉ. देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला, तर नवनियुक्त पर्यवेक्षक घनश्याम नवले यांचा सत्कार विद्यार्थी विज्ञान मंथनच्या राज्य समन्वयक श्रीमती मीना माळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना मीना माळगावकर यांनी थोर शास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांच्या कार्याचा आढावा घेत विज्ञान प्रसाराचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांमधील दडलेला वैज्ञानिक शोधून त्यांना योग्य दिशा देणे हा आमचा मुख्य हेतू आहे,” असे सांगत त्यांनी शाळेच्या ग्रंथालयाला ‘सायन्स इंडिया’ हे मासिक भेट दिले. तसेच शंभर वर्षांची परंपरा असलेले ‘सृष्टीज्ञान’ हे वैज्ञानिक मासिकही भेट देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाचा लाभ इयत्ता पाचवी ते नववीच्या सुमारे २०० निवडक विद्यार्थ्यांनी घेतला. डॉ. देशपांडे यांनी पीपीटीच्या माध्यमातून विषाणूंचे प्रकार, त्यांचा प्रसार आणि अँटिव्हायरस निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली. विशेष आकर्षण म्हणजे इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने विषाणू प्रत्यक्ष कसे दिसतात, हे विद्यार्थ्यांना पाहता आले, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक महेश इनामदार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश लिमये यांनी मानले. यावेळी एनआयव्हीचे वैज्ञानिक जैसी सी. जो, विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक सुनीलजी चांदुरकर यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान प्रमुख सौ. भोज, कोळी, माळी, जवान यांसह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
2) वाई:-लाखो भाविकांच्या स्वागतासाठी बावधन सज्ज! बगाड यात्रेपूर्वी ग्रामपंचायतीची स्वच्छता, सुरक्षा व सुविधा यांची भक्कम तयारी.

वाई प्रतिनिधी : बावधन गावची सुप्रसिद्ध बगाड यात्रा येत्या ८ मार्च रोजी पार पडणार असून लाखो भाविकांच्या स्वागतासाठी बावधन ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत यात्रा यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ मंडळ व ग्रामस्थांच्या समन्वयातून नियोजनबद्ध तयारी करण्यात आली आहे. अशी माहिती सरपंच सौ. वंदना कांबळे, उपसरपंच उदयसिंह पिसाळ आणि ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत धुमाळ यांनी दिली.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बावधनच्या बगाड यात्रेसाठी दरवर्षी चार ते पाच लाख भाविक गावात दाखल होतात. या पार्श्वभूमीवर यंदा ग्रामपंचायतीने स्वच्छता, शुद्ध पाणी आणि डासमुक्त गाव हा संकल्प हाती घेतला आहे.
गटविकास अधिकारी नारायण घोलप व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव यांच्या सूचनेनुसार गावातील प्रत्येक घरात ‘मेडिक्लोर-एम’ बाटलीचे वाटप करून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. वॉर्डनिहाय ग्रामपंचायत सदस्य व आशा सेविकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी शुद्धीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातील अंतर्गत गटारांची स्वच्छता करून बीएससी पावडरची फवारणी करण्यात आली असून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फॉगिंग मशीनद्वारे फॉगिंग करण्यात आले आहे. तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांचे सपाटीकरण करून परिसर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.
यात्रा काळात लावण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिकांच्या स्टॉल्सचे नियोजनबद्ध नियोजन करण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्टे आखून दुकाने लावण्यासाठी निश्चित जागा देण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. तसेच मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वाहनांसाठी विशेष पार्किंग झोन उभारण्यात आला आहे.
यावर्षी प्रथमच ग्रामपंचायतीने गावातील २५ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्यामुळे गावातील सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. यात्रा कमिटी, भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी ४० लाख रुपयांचा निधी बावधन बगाड रस्त्यासाठी मंजूर केला आहे. या निधीतून रस्त्याचे सपाटीकरण, रुंदीकरण, मुरमीकरण आणि डांबरीकरण सुरू असून त्यामुळे बगाड रथ गावात येणे अधिक सुलभ होणार आहे.
चौकट :
“गावात येणाऱ्या भाविकांना चांगल्या मूलभूत सेवा व सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याचा विचार करून घरटी मेडिक्लोर देऊन पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका टाळण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवून सुरक्षा अधिक बळकट केली आहे.”
— उदयसिंह पिसाळ, उपसरपंच, बावधन




