राहाता:-नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला वेग द्या; अन्यथा १६ मार्चला बाभळेश्वर चौकात तीव्र आंदोलनाचा इशारा.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

राहाता:-नगर–मनमाड महामार्गाच्या कामाला वेग द्या; अन्यथा १६ मार्चला बाभळेश्वर चौकात तीव्र आंदोलनाचा इशारा.

बाभळेश्वर (ता.राहाता):
बाभळेश्वर हद्दीतून जाणाऱ्या नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा वेग वाढवून रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अन्यथा १६ मार्च २०२६ रोजी बाभळेश्वर चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगर–मनमाड महामार्ग जनआक्रोश आंदोलनाचे नेते मा. श्री. गोरखदादा यशवंतराव गवारे व ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अहिल्यानगर येथील प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या अहिल्यानगर–मनमाड, सूरत–चेन्नई, पुणे–अहिल्यानगर, संभाजीनगर तसेच नांदुर शिंगोटे ते कोल्हार या मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली असून काही मार्गांची कामे सुरू आहेत. मात्र अहिल्यानगर–मनमाड मार्गावरील कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मागील कंत्राटदाराने गटारीची कामे चुकीच्या पद्धतीने केल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. तसेच बाभळेश्वर येथे रस्त्याच्या दुतर्फा खोदाई करून काम अर्धवट सोडल्याने वाहतुकीची कोंडी होत असून अनेक अपघात घडत आहेत.
कालव्याच्या शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे विद्यार्थी, पालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्गखोल्यांमध्ये तसेच परिसरातील मंदिरात धूळ साचत असून आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
या पार्श्वभूमीवर बाभळेश्वर येथे नगर–मनमाड रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली असून अन्यथा १६ मार्च रोजी बाभळेश्वर ग्रामस्थ, व्यावसायिक, विद्यार्थी व पालकांच्या वतीने बाभळेश्वर चौकात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.




