कराड पोलिसांचा धडक अॅक्शन मोड! मुंढेतील ‘सह्याद्री रेसिडेन्सी’वर छापा; ३ बांगलादेशी ताब्यात, आश्रयदात्यावर गुन्हा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

कराड पोलिसांचा धडक अॅक्शन मोड! मुंढेतील ‘सह्याद्री रेसिडेन्सी’वर छापा; ३ बांगलादेशी ताब्यात, आश्रयदात्यावर गुन्हा.

वाई प्रतिनिधी सारिका गवते
कराड दि. २३ : कराड शहर पोलिसांनी मुंढे परिसरात धडक कारवाई करत विनापरवाना भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे तिघे ‘सह्याद्री रेसिडेन्सी’ येथील चौथ्या मजल्यावर राहत असल्याची माहिती तपासात समोर आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
डीवायएसपी राजश्री पाटील आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी बिलाल सलाल उद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला (तिघेही बांगलादेशी नागरिक) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही संरक्षणात्मक ताब्यात घेण्यात आले आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी मुंबईत बनावट पत्त्यावर आधारकार्ड तयार केल्याचे समोर आले. कोणतीही वैध कागदपत्रे अथवा सीमा परवानगी नसताना त्यांनी भारतात प्रवेश केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात त्यांना आश्रय देणारा करण बापू कांबळे (वय २९, रा. मुंढे/किवळ) याच्यावरही कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परकीय नागरिकांना अधिकृत कागदपत्रांशिवाय निवास देणे त्याला महागात पडले आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास कराड शहर पोलीस करत असून, संबंधितांवर परकीय नागरिक कायद्यान्वये कडक कारवाई होणार असल्याचे संकेत पोलिस सूत्रांकडून मिळत आहेत.




