सातारा जि.प.सत्तेसाठी ईश्वरी चिठ्ठी काढण्याची आली वेळ?
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR.PRALHAD CHAVAN – 8208717483

1) सातारा जि.प.सत्तेसाठी ईश्वरी चिठ्ठी काढण्याची आली वेळ?

सातारा प्रतिनिधी अजित जगताप
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीतील राजकारण सध्या अनिश्चित झाले आहे. जिल्हा परिषद सत्ता कुणाची? याचा तिढा आता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्याचे मंत्री सांगतात. त्यामुळे प्रथमच सातारा जिल्हा परिषद सत्ता कोणाची येणार? हे ईश्वरी चिठ्ठीनच स्पष्ट होईल. अशी गमतीदार चर्चा सुरू झालेली आहे. हा एक प्रकारे राज्यकर्त्यांच्यावर गैर विश्वास मानावा लागत आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर निकाल बाहेर पडला. भाजप २७ राष्ट्रवादी २० शिवसेना १५ अन्य २ आणि काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल आहे. नैसर्गिक रित्या केंद्रांमध्ये व राज्यात महायुती म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुती आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये वेगळी परिस्थिती आहे.
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भाजप विरोधात धनुष्यबाण तर काही ठिकाणी कमळ विरोधात शिवसेना आणि या तिन्ही महायुती विरोधात काँग्रेस अशी लढत पाहण्यास मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहातील भाजपमध्ये ही बंडखोरी झाली. त्यामुळे कराड तालुक्यात भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. त्याचबरोबर महायुतीमध्येही एकमेकांच्या विरोधात निवडणुकीमध्ये जय पराजय झालेला आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये नैसर्गिकरित्या भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. आता स्वबळावरच विरोधी पक्षांमध्ये बसण्याची मतदारांनी वेळ आणली आहे. तरीसुद्धा भाजपचे नेते सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आमचा होणार अशी दस्तुरखुद मंत्री वल्गना करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे अध्यक्ष होतील. तसाच सूर शिवसेना उपनेते सातारा जिल्हा पालकमंत्री शंभूराजे देसाई व राष्ट्रवादीचे नेते व मंत्री मकरंद पाटील सांगत आहेत. आता या सर्व घटनेमध्ये ईश्वरी चिठ्ठी टाकण्याची वेळ आणू नये? अशी विनंती आता मतदार करत आहेत. तसं पाहिलं तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा महायुतीतील घटक पक्षाचा प्रामाणिक विचार दिसत आहे. काही नेत्यांमुळे भाजपमधील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. या सर्व गोष्टी पाहता राष्ट्रवादी अध्यक्ष व शिवसेना उपाध्यक्ष असे झाले तर ते नैसर्गिक नियमाप्रमाणे होईल. असे आता शिवसेना व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगत आहेत.
निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर आमची युती म्हणा किंवा आघाडी झालेली आहे. त्यामुळे आम्ही एकत्रच राहणार असे पालकमंत्री शंभूराजे यांनी स्पष्ट केले आहे. पहिले इस्तमाल करो… फिर विश्वास करो.. या न्यायाप्रमाणे आता सातारा जिल्हा परिषद लवकरच सत्ता स्थापना व्हावी अन्यथा लवकर सत्ता स्थापन करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील कायद्याची माहिती असणाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतल्यास त्याला महायुती जबाबदार राहील असे बोलले जात आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चौकट– राजकीय दृष्ट्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी व शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षाला सातारा जिल्हा परिषदेवर आपली सत्ता असावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु मतदारांनी राष्ट्रवादी व शिवसेना युती किंवा आघाडी यांना बऱ्यापैकी कौल दिलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेचा हक्क आहे त्यामुळे भाजपने नैतिकता म्हणून विरोधी पक्षात बसावे. असा मार्मिक सल्ला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी बोलताना सांगितले आहे.
2) सातारा:-श्रमाला प्रतिष्ठा देणारी भाकर आता बाजारात…

सातारा दि: आदरणीय ग्रामीण कविवर्य बहिणाबाई चौधरी यांनी अरे संसार संसार संसार.. जसा तवा चुल्यावर वर ..आधी हाताला चटके ..तेव्हा मिळते भाकर.. अशी कविता करून श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. आज हीच भाकर बाजारपेठेमध्ये अनेकांची भूक भागवत आहे.
सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने पौष्टिक तृणधान्य महोत्सवानिमित्त वर्षभर टिकणाऱ्या ज्वारी, बाजरी भाकरी चक्क कृषी महोत्सवामध्ये विक्री आली होती. अत्यंत पौष्टिक व चवदार भाकरी खऱ्या अर्थाने अनेकांची भूक भागवत आहे. काही वेळेला आपल्या गावातील नातेसंबंध व नातेवाईक यांच्या हातची भाकरी खाण्याचे स्वप्न आता शहरातील लोकांना सुद्धा पाहता येणार आहे. कारण, क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात बाजारपेठेत आता भाकरी सुद्धा विक्रीस आलेली आहे. कडक पापडा सारख्या भाकरीची चव आता शहरातील लोकांनाही उपलब्ध होणार आहे. धामणेर तालुका कोरेगाव येथील ओम साई महिला गृह उद्योग यांच्या वतीने सौ . सुचिता राहुल कांबळे नावाच्या महिलांनी ही भाकरी तयार केलेली आहे. धामणेर येथील महिला बचत गटाने तसेच इतरांनी ही या भाकरी निर्मितीने खऱ्या अर्थाने क्रांती केलेली आहे. पन्नास रुपयांमध्ये पापडा सारख्या भाकरीने पोटाची भूक भागवली जात आहे. ही भाकरी वर्षभर चांगल्या प्रकारे राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी भाकरी सुद्धा खरेदी केलेली आहे. त्यामुळे आता भाकरीची चव न्यारी.. भूक भागवण्यासाठी आता खावी लागणार भाकरी.. असेच नमूद करावे वाटत आहे. आमटी, ताक ,दूध यामध्ये ती चांगल्या पद्धतीने विरघळते. तसेच ती पौष्टिक असल्यामुळे आरोग्यालाही लाभदायक ठरणार आहे. सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सौ. भाग्यश्री फरांदे- पवार यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा चांगल्या पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक महिलांनी महोत्सव आयोजित केल्याबद्दल कृषी विभागाला धन्यवाद दिले आहेत.




