आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-दादाचे एक्झिट.. मनाला चटका — अजित जगताप,सातारा

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

दादाचे एक्झिट.. मनाला चटका
— अजित जगताप,सातारा

 

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दमदार तेवढाच कणखर आणि स्पष्टवक्तेपणा अंगी मुरलेले नेते अनेक होऊन गेले. त्यामध्ये अलीकडच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय आणि न केलेल्या भ्रष्टाचाराबाबतही टीकाटिपणी सहन करणारे नेते म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार होय . बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी बारामती या त्यांच्या कर्मभूमीत तथा बालेकिल्ल्यात विमान अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाला. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आरोप- प्रत्यारोप सुरू असतानाच एका धक्कादायक बातमीने सर्वसामान्य माणूस ते अति महत्त्वाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनाला चटका लावणारे एक्झिट म्हणजेच ही दुर्दैवी बातमी आहे. या बातमीमुळे वातावरणातील बदल आणि मानवी मनाची घालमेल पाहण्यास मिळाली. अजितदादांचे सहकारी अक्षरशा रडले. तर त्यांचे राजकीय विरोधकांना सुद्धा आपल्या चेहऱ्यावरील दुःख लपवता आलेले नाही. भारत देशाने अनेक अपघाती मृत्यू पाहिलेले आहेत. त्यामध्ये आता याही अपघाताची नोंद झाली आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती बातमीमुळे प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती निघून गेल्याचा भास अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवू लागला. मनाला चटका लावणाऱ्या एक्झिट मुळे व्यक्तिमत्त्वाची ओळख सुद्धा कायमची स्मरणात राहिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर नवी पिढी राजकारणात उतरली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली बारामती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. अजितदादांनीही जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपली दमदार व नेतृत्वगुणाची चुणूक सातारकरांना दाखवून दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील सहकारी संस्था, सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेती उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका आणि सातारा जिल्हा बँक, शिक्षण संस्था अशा महत्त्वाच्या पदावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. एकच वादा… अजित दादा.. ही टॅग लावून अनेकांनी आपल्या कर्तबदारीतून व दादा नावाचा फायदा करून घेतला. परंतु राजकीय महत्त्वकांक्षा आणि बदललेली परिस्थिती यामुळे काही काळासाठी राष्ट्रवादीला गळती लागली. तरीसुद्धा राखेतून फिनिक्स पक्षासारखे उड्डाण करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय दबदबा कायम राखला. अजितदादांनी ज्यांना राजकारणामध्ये बोट दुरून चालायला शिकवले. ते विरोधी पक्षात पळून गेले. तरी सुद्धा दादांनी त्यांची कामे अडवून ठेवलेली नाही. उलट त्यांनाही विकास कामाच्या निधीबाबत सहकार्य केले. सर्वांना सहकार्य करत असल्यामुळे त्यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील शासकीय देवगिरी बंगल्यामध्ये पहाटेपासून ते रात्रीपर्यंत लोकांची गर्दी पाहण्यास मिळत होती. प्रत्येकाची समस्या ऐकून त्यावरती उपाय योजना तसेच सूचना करण्यामध्ये अजित दादा पवार हुकमी एक्का होते .
सातारा जिल्ह्यातील आमचे परम स्नेही पत्रकार संजय कदम, मनोज पवार, शैलेश धुमाळ, रेवण महाजन यांच्या समवेत अनेकदा देवगिरी बंगल्यामध्ये अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व दादांना भेटण्याचा योग आला. या बंगल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सकाळी आदरपूर्वक कांदे पोहे व चहापान घेतल्यानंतरच क्रमवारीनुसार अजित दादांना भेटण्यास मिळत होते. माझ्या व्यक्तिगत पत्रकारितेच्या बाबतच्या एका कामाबाबत त्यांना निवेदन सादर करताच तातडीने संबंधित वरिष्ठ आय.ए.एस. अधिकाऱ्यांना स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी मोबाईलवर संपूर्ण निवेदन वाचून माहिती दिली. आणि माझे काम तातडीने पूर्ण करा. अशी सूचना केली.
वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यातील एक सामान्य ग्रामीण भागातील ज्येष्ठ पत्रकारासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझी केलेली शिफारस माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस होते. त्यांच्या कृपेमुळे बऱ्याच गोष्टी अनेकांना लाभल्या त्याचा मीही साक्षीदार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे २२ जुलै १९५९ मध्ये श्री. अजितदादा पवार यांचा जन्म झाला.
लहान वयातच खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलत असतानाच आजूबाजूच्या सामाजिक प्रश्नांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या संवेदना समजून घेऊन त्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील अभ्यासपूर्ण मांडणी आणि विनोदी शैली यामुळे त्यांचे भाषण म्हणजे एक अभ्यासाचा विषय होता. विविध सहकारी संस्था, साखर कारखाने, सहकारी बँका, शिक्षण संस्था या माध्यमातून महत्त्वाची पदे भूषवित सुरु झालेल्या प्रवासाला १९९१ साली नवे वळण लागले.
खासदार, आमदार, राज्यमंत्री, अनेक महत्त्वाच्या खात्यांतील मंत्रीपदे आणि महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्रीपद ४ वेळा भूषविण्याचा बहुमान या कार्यकुशल नेतृत्वाला लाभला आहे. आज त्यांच्या एक्झिट मुळे सर्वच कार्यकर्ते पोरके झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाची कुराड कोसळली आहे. जन्म आणि मृत्यू नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे या दुःखातून सावरण्याचं बळ सर्वांना मिळो हीच भगवंता चरणी प्रार्थना करून.. आदरणीय लोकनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो….
— पत्रकार अजित जगताप, सातारा
मो, ९९२२२४१२९९/९१५६१४०४९१

_______________________________

फोटो– आदरणीय अजितदादा पवार यांच्या सहवासात सातारा जिल्ह्यातील पत्रकार..

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button