वाई:-आधीच कोंडी, त्यात खड्ड्यांची भर! सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या बळीची वाट पाहतोय का?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

आधीच कोंडी,त्यात खड्ड्यांची भर! सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या बळीची वाट पाहतोय का?

वाई दि. २१ : ऐतिहासिक आणि पर्यटनाचे केंद्र असलेल्या वाई शहरासह परिसरातील रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाई येथील यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीतील कलागार्डन ते बावधन नाका या मुख्य रहदारीच्या रस्त्याची तर अक्षरशः ‘चाळण’ झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे असल्याचे संतापजनक चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
विशेषतः महावितरण कार्यालयासमोरील मार्गाची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, तिथे रस्ता शिल्लक आहे की फक्त खड्डे, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार सातत्याने घसरून पडत आहेत. अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी जायबंदी झाले आहेत, मात्र तरीही संबंधित यंत्रणेला जाग येताना दिसत नाही.

प्रशासनाची भूमिका: ‘डोळे झाक आणि हात वर’
शहरात आधीच वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असताना आता या खड्डेमय रस्त्यांनी वाहनचालक आणि प्रवाशांच्या त्रासात भर घातली आहे. वारंवार अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. खड्डे भरण्याची साधी मानसिकताही या विभागाकडून दाखवली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
कलागार्डन ते बावधन नाका हा मार्ग रहदारीचा आहे. रोज इथे अपघात होत आहेत, लोक जखमी होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून बसला आहे का? प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास संबंधित विभागाला तीव्र रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.




