जळगाव:-जीवनमूल्य वृद्धिगत करणारे “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुस्तक समीक्षण
जीवनमूल्य वृद्धिगत करणारे “दंतकथा आणि इतर गोष्टी” पुस्तक

“दंतकथा आणि इतर गोष्टी” हा कथालेखक श्री. दगा तुकाराम चित्ते यांचा अवतीभवतीच्या परिसरातील ओळखी पाळखीतील ज्ञात कथांचा प्रथम लघुकथा संग्रह.
संपूर्ण पुस्तकाचे अवलोकन केले असता साधारणता दीड ते दोन पानांत सामावलेल्या कथांमुळे या संग्रहाला लघुकथा संग्रहाचे स्वरूप प्राप्त होते.
कुमुद पब्लिकेशन जळगाव प्रकाशनात 22 डिसेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेल्या या प्रथम आवृत्तीचे मूल्य 175 रुपये असून संग्रह लेखकांनी कैलासवासी पत्नी हिराबाई चित्ते यांना अर्पण केले आहे.
संग्रहाला लाभलेल्या प्रस्तावनेत श्री. दयानंद शेवाळे नाशिक यांनी लेखकांचे व त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केल्याचे वाचनात येते. डॉ. मनिषा चित्ते, लेखकांच्या सुनबाई यांनी देखील लेखक व त्यांच्या लिखाणाबद्दल असलेला आदर “पुस्तकाविषयी थोडेशे” यामधून मांडला आहे.
लेखकांचे मनोगत म्हणजे पुस्तकाचा आरसा असतो. या कथा संग्रहाच्या लेखकांनी मनोगतात देखील दंतकथे बद्दल उत्सुकता निर्माण होईल असे मनोगत व्यक्त करून प्रत्येक दंतकथेतून काही ना काही बोध घेण्यासारखे असल्याचे ते स्पष्ट करतात. त्याचप्रमाणे पुस्तकासाठी सातत्याने नऊ महिने पाठपुरावा वाक्यरचना दुरुस्ती आणि मोलाचा सहभाग असणारे मिथुन ढिवरे सर यांच्या बद्दल आभार व्यक्त केले आहे.
संग्रहाच्या शीर्षकाला साजेशे असे मुखपृष्ठ असून 92 पृष्ठाच्या या संग्रहात एकूण 45 कथांचा व पूर्वीपासून चालत असलेले शुभ अशुभ संकेतांचा समावेश लेखकांनी केला आहे.
कथा, दंतकथा म्हटले की निश्चितच आपणास आपले बालपण आठवते. डोळ्यासमोर चित्र उभा राहतो तो रात्र झाली की घरातील जेष्ठ मंडळी घरातील बालकांना कवेत घेऊन रामायण, महाभारतातील कथासह इतर प्रचलित व स्थानिक कथा सांगत असल्याचे आठवते
आजी-आजोबा, आई-वडील, आत्या-काका, मामा-मावशी यांच्या मुखातून कथा ऐकत झोपी जाणे ही परंपरा हल्लीच्या आधुनिक युगामध्ये फक्त लुप्तच नाही तर पूर्णतः संपत आल्याचे चित्र आज उघड्या डोळ्यांनी आपण बघतो. आपण बालपणी ऐकलेल्या कथा ह्या काही लिखित स्वरूपातील वाचलेल्या कथा नाही, तर एकमेकांच्या मुखातून बालपणापासून ऐकत येऊन स्मरणात संग्रही झालेल्या त्या कथा. ज्यास दंतकथा असे म्हणत असत.
सामान्यतः दंतकथेतून ग्रामीण व प्रचलित बोली भाषेतून सर्व सामान्य लोकांचे जीवन, समाजात प्रचलित श्रद्धा, पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रद्धा, प्रथा, परंपरा यांच्यावर भाष्य होत असते. तसेच या संग्रहात देखील पुढे पुढे सरकत जातांना अनुभवास येते.
संग्रहाची सुरुवात होते ते “मुलाला नकळत जीवन जगण्याचे वडिलांचे मार्गदर्शन” या कथेने. ही कथा वाचताना थोडी मजेशीर वाटणारे पण खूप मोठा आशय दडलेली ही कथा. पूर्वी अनेकदा गुप्त संकेतात म्हणजे कोड्यात बोलण्याची युक्ती वापरली जात होती. ही कथा देखील गुप्त भाषेत दडलेले गुढ उकलून, पूर्वजांनी जे दिले आहे ते कसे संवर्धन करायचे याचे मतितार्थ सांगून जाते.
दुसरी कथा “कष्टाच्या पैशाचा योग्य वापर करावा” असा अर्थ बोध देणारी आहे. कथेचा बोध होण्यासाठी लेखकाने खूप सुंदर अशी कथा रेखाटली आहे, जी वाचत असताना वाचक देखील त्या कथेच्या मतितार्थचा बोध घेत कथेच्या खोल तळाशी शीरत जातो.
“हुशार आंधळा पती” या कथेतून “आपण आपलेच कौतुक करून घेऊ नये,ऐकणाराही आपल्यापेक्षा हुशार असतो” हा बोध मिळतो.
“पंचमुखी परमेश्वर” म्हणजे जी गोष्ट एका व्यक्तीने सांगितले ती गोष्ट खरी असली तरी त्यावर कोणाचा विश्वास बसत नाही. पण तीच गोष्ट पाच लोकांनी सांगितली व ती असत्य असेल, तरी ती सत्य समजली जाते.
गावातील तंटा, गावातीलच अनुभवी, ज्ञानी, सज्जन अशा पंच लोकांकडून सोडवण्याची पूर्वापार परंपरा. पण सध्या न्याय निवाडा करण्याच्या पद्धतीवर व यंत्रणेवर प्रकाश टाकत कथा क्रमांक चार मध्ये लेखकांनी “बहुमताने घेतलेला निर्णय हाच खरा कसा मानला जातो” याचे कथा स्वरूप उदाहरण प्रस्तुत केले आहे.
कथांचे स्वरूप जरी छोटे असले पण त्यांचा अर्थ बोध हा जीवनाचा प्रगल्भ आशय असलेल्या कथा, या संग्रहाचे वैशिष्ट्य ठरते. वाचनात अतिशय सुटसुटी व अर्थबोध होण्यास अतिशय सोपी आणि दैनिक व्यवहाराची भाषा, यामुळे पुढील कथा वाचण्याची उत्कंठा वाढत जाते.
जीवनमूल्ये जोपासण्यासंबंधी मिळत जाणारे ज्ञान सांगणारे व ऐकणारे नाते लुप्त होत जाऊन एकीकडे सांगणारे नाही तर दुसरीकडे ऐकणारे नाही. हल्ली अशी स्थिती प्रत्येक घराघरात दिसून येत आहे. त्या स्थितीवर मात करण्यासाठी या कथासंग्रहाचा नक्कीच उपयोग होणार आहे. जीवनमूल्य वृद्धिगत करणारे, दैनंदिन व्यवहारातील काही वास्तव्य तर काही गतकाळातील दंतकथेतून लेखकाने भावी पिढीला मर्मज्ञानाचा हा साठा कथेच्या रूपातून दिलेला आहे.
संग्रहाचे काही ओळींत रसपान करून वाचकांचे समाधान होण्यासारखे नाही. तर त्यासाठी कथांमधून मिळणारे जीवनमूल्याचे ज्ञान घेण्यासाठी प्रत्येकाने हा कथासंग्रह वाचायला हवा, एवढेच आवर्जून सांगता येईल.
कथा संग्रह वाचकांच्या पसंतीस उतरावे अशा शुभेच्छा व्यक्त करून लेखकांचे अभिनंदन करते.
कथा संग्रह – “दंतकथा आणि इतर गोष्टी”
लेखक-श्री. दगा तुकाराम चित्ते
मूल्य – १७५ रू.
संपर्क – ९४०४२१०६२१
समीक्षण- अस्मिता प्रशांत “पुष्पांजली”
भंडारा – 9921096867




