वाई:-‘एआय’मुळे ऊस उत्पादनात ४० टक्के वाढ – डॉ. विवेक भोईटे वाईतील किसन वीर महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
‘एआय’मुळे ऊस उत्पादनात ४० टक्के वाढ – डॉ. विवेक भोईटे
वाईतील किसन वीर महाविद्यालयात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा.
वाई, दि. २१ ऊस पिकाचे उत्पादन वाढवून शेतकरी व साखर कारखान्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ४० टक्क्यांपर्यंत उत्पादनवाढ शक्य असल्याचे प्रतिपादन ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे डॉ. विवेक भोईटे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्था व ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने किसन वीर महाविद्यालयात आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता व ऊसशेती या विषयावरील कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामतीच्या अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार हे होते. याप्रसंगी संचालक केशवराव पाडळे, खजिनदार नारायणराव चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, रयतचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव, यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रताप यादव, मोहन भोसले, अनिरुद्ध गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. भोईटे म्हणाले, बारामती ट्रस्टने पाच वर्षांच्या संशोधनातून एआय तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सिद्ध केले आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मॅप माय क्रॉप, फसल आणि सिमू सॉफ्ट यांचे सहकार्य मिळाले आहे. प्रथम शेतीचे स्कॅनिंग होऊन, मातीपरीक्षण केले जाते. तिथे स्वयंचलित हवामान यंत्र बसविले जाते. शेतकऱ्यांना कृषिक गणक यंत्राच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलवर मराठीतून सूचना प्राप्त होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी, खते किती प्रमाणात वापरावीत याची माहिती मिळते. एआय प्रणालीमुळे पिकाच्या वाढीविषयी, पाणी व खत व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोगनिदान, कीड नियंत्रण, ऊस पक्वता व साखर उतारा याची अचूक माहिती मिळते. ड्रिपद्वारे पाणीपुरवठा आणि आवश्यक त्या काळात खत देणे यामुळे पाणी, खत व मजुरी खर्चात बचत होऊन ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन वाढते हे त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले. डॉ. भोईटे यांनी विद्यार्थ्यांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली व एआय तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथेच्या चित्रफिती दाखविल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राजेंद्र पवार म्हणाले, एआय तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांच्यात गैरसमज आहे. तो बाजूला सारून त्यांनी नवतंत्रज्ञानाचा अवलंब करायला हवा. पुढील काळात एआय जगावर राज्य करणार आहे. त्याला लागणारी सर्व माहिती तरुण विद्यार्थ्यांनी एआयला पुरवायला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत निरीक्षण करायला पाहिजे. एआय हे आव्हान नसून संधी आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनदादा भोसले यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. विनोद वीर यांनी केले.
कार्यक्रमास वाई पंचक्रोशीतील शेतकरी, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे आजी माजी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चौकट
******************************************************************************
प्रास्ताविकात मदनदादा भोसले म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वच क्षेत्रात गतीने होत आहे. शेतीमध्ये बारामती ट्रस्टने प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांपर्यंत याचा फायदा पोहोचायला पाहिजे. या नवतंत्रज्ञानाचे सर्वत्रीकरण व्हायला हवे, हा हेतू मनाशी बाळगून या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कारण शाश्वत विक्रीव्यवस्था असणारे ऊस हे अर्थकारणातील महत्त्वाचे पीक आहे. तसेच ही संस्था उभारताना परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी बँकेला तारण ठेवून योगदान दिले आहे. या अनुषंगाने त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे मला सयुक्तिक वाटते.