वाई:- किसन वीरांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोलाचे – प्रा.श्रीधर साळुंखे.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई दि. 16
किसन वीरांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोलाचे – प्रा.श्रीधर साळुंखे.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ज्या विभूतींनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांपैकी थोर देशभक्त, स्वातंत्र्यसेनानी किसन वीर हे एक होते. त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान मोलाचे आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात स्टाफ वेलफेअर समितीच्यावतीने थोर देशभक्त व स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, माजी प्रभारी प्राचार्य रमेश डुबल, स्टाफ वेलफेअर समितीचे सेक्रेटरी डॉ. शिवाजी ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. साळुंखे म्हणाले, भारताच्या राजकारणात महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचे राजकारण साताऱ्यातून आणि साताऱ्याचे राजकारण वाईतून चालायचे. वाईमध्ये किसन वीर आबांसारखे थोर समाजसुधारक व स्वातंत्र्यसेनानी होते. लोकसंघटन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते. वैयक्तिक कुटुंबाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामाला प्राधान्य दिले. भूमिगत राहून देशसेवेचे कार्य केले. प्रतिसरकार मध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबरोबर त्यांनी ब्रिटीश सरकारला सळो की पळो करून सोडले. किसन वीरांचे जीवन हे संघर्षमय होते. चारित्र्यसंपन्नता, परखडपणा, कर्तव्यदक्षता व धाडसीपणा ही त्यांच्या स्वभावाची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, महापुरुषांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. किसन वीर यांनी राजकारणाबरोबरच समाजकारणाला, सहकार व शिक्षणक्षेत्राला प्राधान्य दिले. किसन वीर यांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे व त्यांचा अंगिकार सर्वांनी करावा, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी ताटे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. आभार श्री. संदीप पातुगडे यांनी मानले व सूत्रसंचालन श्रीमती सुमती कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमास वाई परिसरातील ग्रामस्थ, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.