वाई:-धोमच्या कालव्यांतून पाण्याचा महापूर, शेतकऱ्यांच्या शेतात मात्र कोरडाच दुष्काळ! हजारो क्यूसेक्स पाणी वाया;पाटबंधारे प्रशासनाची उघड बेपर्वाई.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

धोमच्या कालव्यांतून पाण्याचा महापूर, शेतकऱ्यांच्या शेतात मात्र कोरडाच दुष्काळ!
हजारो क्यूसेक्स पाणी वाया; पाटबंधारे प्रशासनाची उघड बेपर्वाई.

पाच तालुक्यांच्या शेतीसाठी जीवनदायिनी ठरणारे धोम धरण आणि त्यावरील कालवा व्यवस्थापन सध्या पूर्णपणे ढासळल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. धोम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे कोणतेही ठोस नियोजन, मोजमाप किंवा नियंत्रण नसल्याने हजारो क्यूसेक्स मौल्यवान पाणी ओढे, नाले, रस्ते आणि मोकळ्या जागांतून वाहून जात आहे. मात्र, या पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
धोम धरणाच्या कालव्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, अनेक ठिकाणी कालव्यांना फुटी पडल्या आहेत. परिणामी पाणी रस्त्यांवरून वाहत आहे, तर काही ठिकाणी ओढ्या-नाल्यांतून बेधुंदपणे वाया जात आहे. एकीकडे शेतकरी पाण्यासाठी प्रशासनाच्या दारात हेलपाटे मारत असताना, दुसरीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी आणि विशेषतः पाटकरी मात्र या गंभीर परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे.
“शेतकऱ्यांच्या घामाच्या किंमतीचं पाणी खिसे गरम करण्यासाठी वाया घालवणाऱ्यांना कोण जाब विचारणार?” असा संतप्त सवाल आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. धोम पाटबंधारे विभागाकडून वारंवार कालवा फुटीचे प्रकार घडत असतानाही, या अमूल्य पाण्याचे संरक्षण करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी वसूल केली जात आहे, तर दुसरीकडे वीटभट्टी व्यावसायिकांसाठी आणि चिरीमिरीच्या व्यवहारातून ओढ्या-नाल्यांत पाणी सोडले जात असल्याचे आरोपही पुढे येत आहेत. या पाण्याचे कोणतेही मोजमाप नाही, नियंत्रण नाही आणि जबाबदारी निश्चित नाही—हे अत्यंत धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी पाण्याअभावी हतबल होत असताना, पाटबंधारे प्रशासनाची ही बेपर्वाई शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. धोम पाटबंधारे विभाग व संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की शेतकऱ्यांच्या जीवावर अशीच पाण्याची उधळपट्टी सुरू राहणार, हा प्रश्न आता संपूर्ण परिसरात तीव्र चर्चेचा विषय ठरला आहे.




