मावळ:-मावळातील ग्रामीण भागात आजही टिकून आहे लेकी मागण्याच्या लोक कलेची परंपरा.
प्रतिनिधी धर्मेंद्र ठाकर मावळ:-9960044802

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
मावळातील ग्रामीण भागात आजही टिकून आहे लेकी मागण्याच्या लोककलेची परंपरा.
मावळ तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये आजही लेकी मागण्याचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आनंदात साजरा करण्याची परंपरा टिकून असल्याचे पाहायला मिळते. या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिला समाजातील विविध घटकांची नकल करतात ज्यामध्ये वैदु, वैदीन, तुंबडीवाला इत्यादींपासून राजकीय नेत्यांपर्यंतची नकल केली जाते. तसेच फेरावरची गाणी फुगड्या आणि लांब लचक उखाणे घेण्याची स्पर्धा या ठिकाणी होते. रात्रभर अशी विविध कला सादर करून दुसऱ्या दिवशी लहान मुला मुलींचा विवाह सोहळा आयोजित केला जातो ज्यामध्ये मुलगा-मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासून साखरपुडा, हळदी, विवाह सोहळा मंगलाष्टके तसेच वरातीचाही समावेश असतो. शेवटी डीजे लावून जल्लोषात वरातही साजरी केली जाते. ज्यामध्ये या सर्व महिला सर्व दुःख, वेदना, क्षीण, थकवा, वादविवाद, तंटे विसरून सहभागी होतात आणि मनसोक्तपणे नाचण्याचा आनंद घेतात.
मावळात भाताचे मुख्य पीक असल्याने शेतामधील सर्व कामे संपल्यानंतर या महिला नागपंचमी पासून गौरी गणपतीच्या काळात दररोज वेगळ्या घरी जाऊन वेगवेगळ्या कला सादर करतात यावेळी आयोजकांच्या घरी चहा नाश्त्याची सोय केली जाते. आणि गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी किंवा विसर्जनाच्या नंतर एक दोन दिवसांमध्ये लेकी मागण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामागे गौरी गणपतीसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशीन मुलींसह सासुरवासी असलेल्या मुलीही सहभागी होतात. यामागे सामाजिक एकता आणि संसाराच्या गराड्यात अडकून पडलेली महिला वर्षातून एक दिवस स्वतःसाठी जगते.