वाई:-नशेचा थयथयाट मोडीत! वाईत व्यसनमुक्तीचा धगधगता इशारा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) वाई:-नशेचा थयथयाट मोडीत! वाईत व्यसनमुक्तीचा धगधगता इशारा.

वाई | प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली विशेषतः तरुण पिढी मोठ्या प्रमाणात दारू व इतर व्यसनांच्या पहिल्या संपर्कात येत असून, पुढे जाऊन गंभीर व्यसनाधीनतेकडे वाटचाल करत असल्याचे चिंताजनक वास्तव समाजासमोर उभे ठाकले आहे. दारू हे व्यसन केवळ शरीरालाच नव्हे, तर मानसिक, सामाजिक, आर्थिक व नैतिक अधःपतन घडवणारे असल्याचे वास्तव सर्वश्रुत आहे.
याच पार्श्वभूमीवर योद्धा प्रतिष्ठान, वाई व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “चला व्यसनाला बदनाम करूया” या प्रभावी मोहिमेअंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला व्यसनमुक्तीपर प्रबोधन उपक्रम राबविण्यात आला. सर्वत्र मद्यप्राशनाचा धुमाकूळ सुरू असताना, वाईत मात्र “दारूचा नव्हे तर दुधाचा ‘द’” हा ठोस संदेश देत नागरिकांना दूध वाटप करण्यात आले.
हा उपक्रम केवळ प्रतीकात्मक न राहता समाजाला अंतर्मुख करणारा ठरला. नशेच्या झगमगाटाला नकार देत विवेक, संस्कार आणि आरोग्याचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या व्यसनमुक्ती उपक्रमास वाईनगरीचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. अनिलजी सावंत, विद्यमान नगरसेवक विजय ढेकणे, नगरसेविका केतकी विजय पाटणे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री. शरद राव अभ्यंकर सर व श्री. दिलीप डोंबवलीकर सर, उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक अमर कोल्हापुरे, उद्योजक श्री. गोविंद आबा इथापे, लोकमतचे वार्ताहर पांडुरंग भिलारे सर, प्रगती टाइम्स न्यूज चॅनलचे प्रवीण गाडे, तसेच गंगापुरी व नावेचेवाडी येथील बहुसंख्य नागरिक व समस्त वाईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी 31 डिसेंबर म्हणजे नशेचा जल्लोष नव्हे, तर आत्मपरीक्षण, सकारात्मक संकल्प आणि व्यसनमुक्त जीवनाचा निर्धार करण्याचा दिवस असावा, असा ठाम संदेश दिला. तरुणाईने क्षणिक नशेऐवजी दीर्घकालीन आरोग्य, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमामुळे वाई शहरात 31 डिसेंबरला नशेच्या थयथयाटाऐवजी व्यसनमुक्तीचा धगधगता इशारा उमटल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
2) साताऱ्यात भाजपचा विजयसोहळा!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष-नगरसेवकांचा भव्य सत्कार.
सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवत तब्बल ७ नगराध्यक्ष पदांवर भगवा फडकावला आहे. या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा उद्या शुक्रवार, दि. २ रोजी दुपारी १२.३० वाजता पार पडणार आहे.
हा दिमाखदार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.
या सोहळ्यास खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात
🔸 साताऱ्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते,
🔸 वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत,
🔸 फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर,
🔸 रहिमतपूरच्या नगराध्यक्षा वैशाली माने,
🔸 म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर,
🔸 मेढ्याच्या नगराध्यक्षा रुपाली वारगडे,
🔸 मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनवले
यांच्यासह भाजपच्या सर्व नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या विजयसोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधणार असून आगामी काळातील विकासाचा रोडमॅप मांडणार आहेत.
तरी या भव्य सत्कार समारंभास भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




