वाई:-भारतीय मान्सूनचे अनवट वाटा शोधणारा सृजनशील ग्रंथ
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-भारतीय मान्सूनचे अनवट वाटा शोधणारा सृजनशील ग्रंथ

———————————————-
‘‘मान्सून हा विषय फक्त हवामानशास्त्र, भूगोल आणि पर्यावरण यापुरताच मर्यादित नाही तर या मोसमाची एक विज्ञान आहे, आणि रोमान्स ही माझ्या वाचनात इतके प्रकल्प वैज्ञानिक आणि रोमँटिक असे वर्णन विवेचन विश्लेषण आले नव्हते’’ अशा शब्दात जेष्ठ पत्रकार व विचारवंत कुमार केतकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हंटल आहे. ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी आपले अभिप्राय ग्रंथात नोंदविले आहे. त्यामुळे या पुस्तकाला एक शैलीदार लय मिळाली असून ज्यांना या विषयांमध्ये आस्था-अभिरुची नाही, त्यांनाही त्यातील वाचनीयता व मांडणीतील प्रगल्भता जाणवते. ‘मान्सून:जन-गण-मन’ हा ग्रंथ अलिकडेच पत्रकार-लेखक सुनील तांबे यांनी लिहिलेलं आहे आणि तो प्रकाशित होऊन वाचकांसाठी सहज उपलब्ध आहे. अलिकडेच वाईतील किसन वीर महाविद्यालयाच्या पाचगणी रोडवरील ‘वाईची आमराई’ या हॉटेलमधील वाचनकट्यावर लेखकाशी संवाद देखील साधण्याचा योग आला. हर्षवर्धन मेढेकर या उत्साही तरुणांनी लेखकाची मुलाखत घेतली व लेखकाला बोलत केल. मान्सूनचे विहंगम वर्णन, इतिहासाचा धावता परंतु अभ्यासपूर्ण, शक्य तेथे सप्रमाण वर्णन-विवेचन हा ग्रंथ उलगडून दाखविते. विशेष म्हणजे हे वर्णन वाचकांना एक जाणीव करून देते की, आपण या भूततलावर असो वा नसो, हे निसर्ग वैभव, नैसर्गिक वैविध्यता गेली लाखो-हजारो वर्षे पृथ्वीला विविध रंगी वेश परिधान करीत आहे, पृथ्वीला सजवत आले आहे. विशेषत: मान्सूनचे सौंदर्य आणि सांस्कृतिकता आपल्याला प्रगल्भ, व्यासंगी व प्रबुद्ध करते. भारताचे आणि भारतीयत्वाची इतके सखोल विवेचन आणि विश्लेषण क्वचितच अशा ग्रंथात आपल्याला पहावयास मिळते, हे या ग्रंथाचे विशेष होय. या ग्रंथामुळे तांबे आता रा. चिं. ढेरे, दुर्गा भागवत, माधव गाडगीळ, वसंत गोवारीकर, वर्षा गजेंद्रगडकर, अनुराग लव्हेकर, गावगाड्याचे लेखक त्र. ना. अत्रे, अनिल अवचट, मारुती चितमपल्ली या अशा सर्जनशील संशोधक-लेखकांच्या मांदियाळीत सामील झाले आहेत. हे विधान काहींना अवास्तव व अप्रासंगिक वाटत असले तरी ग्रंथ वाचल्यानंतर त्यात लेखकाची प्रगल्भ मांडणी, विषयाची बहुआयामी विवेचन-व्यासंग वाचकांच्या लक्षात येते. मान्सून म्हणजे फक्त मौसम नव्हे, किंवा पर्जन्याचा प्रवास नव्हे; परिस्थितीकीशास्त्र (Ecology), भूगोल आणि हवामान शास्त्राच्या पलीकडे त्याला वैश्विक संस्कृतीचे विलक्षण वेधक परिमाण आहे. सामाजिकच नव्हे; तर कृषी अर्थशास्त्राबरोबर अगदी भू-राजकीय (Geo-political) संदर्भ देखील आहेत. शिवाय इतिहास आणि मानववंशशास्त्र, समाजविज्ञानाचे लाखो वर्षाचे संदर्भ आहेत, ज्याला ‘सभ्यतेचा आंतरविद्याशाखीय’ (Interdisciplinary Studies of Civilization) अभ्यास म्हणतात. त्याचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मान्सून, त्याचा सांस्कृतिक आविष्कार, बॉलीवूडच्या हिंदी चित्रपटातील गीत, संगीत-साहित्यात आणि संत साहित्यात कविता आणि कलाकृती तसेच वेशभूषेतही प्रकर्षाने जाणवते. एकूणच या अथांग विश्वात आणि विशेषत: मान्सूनने भरलेल्या भारतीय उपखंडात, जागतिक हवामान बदलाच्या युगात एक वेगळीच वैश्विक ते स्थानिक (Global to Local) जाणीव करून देते. मान्सूनच्या सौंदर्याने तांबे यांनी या अभ्यासपूर्ण आणि प्रगल्भ ग्रंथातून केवळ मान्सूनचाच नव्हे तर एकूणच सिव्हिलायझेशनल मार्च कसा होत होता याचे दर्शन घडविले आहे. तसे पाहिले तर प्रत्येक देशात पाऊस पडतो, अमेरिकेतला पाऊस आफ्रिका खंडातल्या देशांपेक्षा वेगळा असतो पण युरोप-अमेरिका व आफ्रिकेत मान्सूनचा पाऊस पडत नाही. भारतीय उपखंड किंवा दक्षिण आशिया त्या अर्थाने भाग्यवान म्हणायला हवा,कारण येथे मान्सूनचा पाऊस पडतो. तांबेंना या इतिहासाची आणि भौगोलिकचे भान नसते तर मान्सूनवरती ग्रंथ लिहावा, असे वाटलेच नसते. शिवाय केवळ भौगोलिक-प्राकृतिक इतिहास इतकाच मान्सूनचा परिप्रेक्ष्य ठेवला असता तर हा ग्रंथ माहितीपूर्ण परंतु तांत्रिक आणि क्लिष्ट झाला असता. तांबे केवळ काव्यत्व सांगून बसत नाहीत, तर थेट विज्ञान-संस्कृती, मान्सूनची विविध प्रारूपे, हवामान बदलासंबंधी होणारी राजनीती (ज्याला ‘हरित राजकारण’ (green politics) म्हणून अलिकडे ओळखले जाते) आणि विशेष म्हणजे पक्षी निरीक्षणाकडे देखील जाणीवपूर्वक वळतात. तांब्यांनी मान्सूनचा अभ्यास करताना सिंधू संस्कृती मोहनजोदडोतील उत्खननात सापडलेल्या अवशेषांमार्फत रेखाटलेले तत्कालीन जीवन त्यावेळची खरीप, रब्बी पिके शेतीव्यवस्था, स्थिर ग्रामीण जीवनासाठी गाई-बैल यांचा सांभाळ, नांगरणी, मळणी, शेतमालाची वाहतूक, त्यावेळची लोकसंख्या आणि त्यांचा उदरनिर्वाह या सर्व बाबतीत ज्येष्ठ पुरातत्वेत्ता एम. के. ढवळीकर, इतिहास संशोधक इरफान हबीब, ज्येष्ठ पर्यावरण विचारवंत-लेखक माधव गाडगीळ, रामचंद्र गुहा यासारख्या तज्ञांच्या आधारे सप्रमाण विवेचन केले आहेत. या ग्रंथाचे समकालीन महत्त्व विशद करायचे झाले तर या ऐतिहासिक भूगोलाचा परिणाम राष्ट्र-राज्य निर्माण होण्यात कसा झाला? जातीव्यवस्थांचे समाजशास्त्र, सामाजिक उतरंड (social hierarchy) कसे निर्माण झाले? यावरही तांबेंनी समीक्षात्मक मांडणी केली आहे, हे विशेष योगदान या ग्रंथाचे मानावे लागेल. परंतु काहीसा लोककथा-दंतकथा, परंपरा यांचे संमिश्रण ग्रंथात झाल्यामूळे शास्त्रीय मांडणीला काहीसे मर्यादा पडतात का? असा प्रश्न सुजाण, विवेकी, चोखंदळ वाचकांना पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात विचारवंत-संशोधकांमध्ये जोरकस चर्चा-विचारमंथन देखील घडू शकते. सरतेशेवटी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण:2020’ च्या अनुषंगाने ‘भारतीय ज्ञान व्यवस्था (IKS), आंतरविद्याशाखीय-बहुविद्याशाखीय मांडणी करता येणे शक्य आहे, किंबहुना पारंपारिक विषयांच्या, ज्ञानशाखेच्या चौकटी-परीघाबाहेरील चिंतनास देखील प्रेरित करणारे आहे. मात्र त्यासाठी वैचारिक मुखवटा बाजूला ठेवून सर्वसामान्य वाचकांना समजेल- उमजेल अशा भाषेत-शैलीत मांडणी करणे देखील गरजेचे आहे, असं मला वाटतं.
ग्रंथ शीर्षक: ‘मान्सून: जन-गण- मन’
लेखक: सुनील तांबे (पत्रकार-लेखक)
प्रकाशक: मनोविकास प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती: ३० सप्टेंबर, २०२५
पृष्ठसंख्या: १९२
मूल्य: २७०/-




