सातारा:-अकॅडमी संचालकाकडे एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!
Remove term: पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-अकॅडमी संचालकाकडे एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पैसे न दिल्यास विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी; घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद.
सातारा |
सातारा दि. २८ : अकॅडमीमधून मुलीला काढून टाकल्याच्या कारणावरून वाद घालत संचालकाकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा शहरातील गोडोली परिसरात उघडकीस आला आहे. मागितलेली रक्कम न दिल्यास विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोडोली येथील साईबाबा मंदिर परिसरात तक्रारदार गेल्या दहा वर्षांपासून अकॅडमी चालवत आहेत. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.४० वाजण्याच्या सुमारास तक्रारदार दाम्पत्य घरी असताना काही जण त्यांच्या घरी आले. अकॅडमीमधून मुलीला काढून टाकल्याच्या कारणावरून त्यांनी संचालकाला जाब विचारत वाद घातल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
यावेळी संबंधितांनी अकॅडमी बंद पाडण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्यासोबत आलेल्या एका महिलेने संचालकाकडे एक लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम न दिल्यास विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी देण्यात आली. याशिवाय न्यायालयात साक्ष देण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर संबंधित अकॅडमी संचालकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार वर्षा पोटेकर करीत आहेत.
2) वाई:-नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जोडणारे; भीती न बाळगता सकारात्मकतेने सामोरे जा!

कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांचे प्रतिपादन; जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी व्याख्यानमालेचे चौथे पुष्प संपन्न.
सातारा | वाई दि. २८ : नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे आणि त्यांना जागतिक स्तराशी जोडणारे महत्त्वपूर्ण परिवर्तन आहे. या धोरणाबाबत विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. देशाच्या सीमा ओलांडून जगाशी संवाद साधण्याची आणि जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी या धोरणातून उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा येथील कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानमालेतील चौथे पुष्प गुंफताना ते ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले होते.
यावेळी कुलगुरू डॉ. म्हस्के यांनी नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्त्व, त्यामागील संकल्पना आणि भविष्यातील शैक्षणिक संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, माणूस म्हणून सर्वांचा डीएनए एकच असून ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया देखील मूलतः समान आहे. नवीन शैक्षणिक धोरण भारतीय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संशोधनाला प्रोत्साहन आणि भारतीय शिक्षणाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणे, ही या धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
वाईच्या ऐतिहासिक ज्ञानपरंपरेचा गौरव करताना त्यांनी पैठण, काशी यांसारख्या ज्ञानकेंद्रांबरोबरच वाईलाही ज्ञानाचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान असल्याचे सांगितले. विश्वकोश निर्मिती तसेच प्राज्ञ पाठशाळा मंडळाच्या शैक्षणिक आणि धर्मकोश निर्मितीच्या कार्यामुळे वाईने ज्ञानक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. प्राचीन तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपरंपरेतून अनेक विचारवंत घडले. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये समाजसुधारणा व स्वातंत्र्य चळवळीचे विचार अधिक व्यापक झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राजाराम मोहन रॉय यांचे कार्य आजही जागतिक स्तरावर प्रेरणादायी आहे, असे त्यांनी नमूद केले.
आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ देशापुरते मर्यादित न राहता जागतिक संधींचा वेध घेतला पाहिजे. इंग्रजी भाषेची भीती न बाळगता बहुभाषिक बनण्याचा प्रयत्न करावा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक उपयोग करून मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. प्रत्येक कृतीमागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मनोगतात मदनदादा भोसले यांनी पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यावरणाचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास आणि पावसाचे घटते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. शाश्वत विकासासाठी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. मोठ्या परिवर्तनाची सुरुवात नेहमी छोट्या कृतीतूनच होत असते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील ज्येष्ठ व ख्यातनाम इंग्रजी प्राध्यापक यशवंत कळमकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रा. रमेश डुबल यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर यांनी आभार मानले, तर रेश्माबानो मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, मोहनआबा भोसले, संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : विद्यार्थ्यांच्या हातून पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श घडवा!
कुलगुरू डॉ. म्हस्के यांच्याशी संवाद साधताना मदनदादा भोसले यांनी एक महत्त्वपूर्ण पर्यावरणपूरक संकल्पना मांडली. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांतील प्रत्येक विद्यार्थ्याला आंब्याचे एक रोप देऊन त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी द्यावी. पुढील चार वर्षे या रोपांचे नियमित निरीक्षण आणि देखभाल केली, तर मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन होऊन पर्यावरण रक्षणाला हातभार लागेल. विद्यापीठाने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले.
3) वाई:-लांब उडीत सोहम वाडकरची तालुक्यात बाजी! प्रथम क्रमांकासह जिल्हास्तरीय स्पर्धेत धडक.

वयगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; जिद्द, मेहनत आणि सरावाच्या जोरावर सोहमची दमदार कामगिरी.
सातारा |
वाई दि. २८ :स्व. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत वयगावच्या सोहम विजय वाडकर याने आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याची छाप उमटवत लांब उडी या प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटातील या स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे सोहमची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाने वयगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
जिद्द, चिकाटी, नियमित सराव आणि मेहनतीच्या बळावर सोहमने हे यश संपादन केले. त्याला संतोष वाकचौरे आणि ललिता खंडागळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सोहमच्या या यशाबद्दल पंचायत समिती सभापती पै. विक्रांत डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव शिंदे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे, विस्ताराधिकारी साईनाथ वाळेकर, केंद्रप्रमुख विशाल गिरी, जिल्हा क्रीडा समन्वयक शिवाजी निकम, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नलावडे, शाळा व्यवस्थापन समिती वयगाव आणि ग्रामस्थ मंडळ वयगाव यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात मोठी गुणवत्ता दडलेली आहे. योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि संधी मिळाल्यास हे विद्यार्थीही यशाची उंच भरारी घेऊ शकतात, याचा प्रत्यय सोहमच्या कामगिरीतून आला आहे. आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही सोहमने आपल्या कामगिरीची अशीच चमक दाखवून यशाची नवी उंची गाठावी, अशा शुभेच्छा त्याला सर्व स्तरांतून दिल्या जात आहेत.



