आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याची दमदार कामगिरी; उपविजेतेपदावर मोहोर!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याची दमदार कामगिरी; उपविजेतेपदावर मोहोर!

सातारा जिल्ह्याच्या सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड; पंजाबमध्ये चमक दाखविण्याची संधी.

सातारा |
वाई : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत सातारा जिल्ह्याच्या मुलींनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यातील सहा गुणवंत खेळाडूंची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

हॅण्डबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने हॅण्डबॉल असोसिएशन सातारा आणि ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ४८ वी महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर मुली हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सातारा जिल्हा संघाने प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज देत द्वितीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्ह्यातील सहा खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. यामध्ये कु. श्रेया शेखर बाबर, कु. सौख्यदा सचिन लेंभे, कु. आदिती नंदराज निंबाळकर, कु. मनस्वी मनोजकुमार जाधव, कु. गायत्री संतोष गलांडे आणि कु. श्रेया कानिफनाथ जाधव या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

उपविजेतेपद पटकावणाऱ्या सातारा जिल्हा संघात कु. प्राची प्रेमचंद कुमार, कु. श्रीजा अजय पिसाळ, कु. तनिष्का यशवंत चव्हाण, कु. आदिती दत्तात्रय जगताप, कु. आरती संतोष निषाध, कु. तनिष्का अभिजित भोसले, कु. ज्ञानेश्वरी नवनाथ चव्हाण, कु. सायली शिवाजी जाधव, कु. वैभवी मंगेश हगवणे आणि कु. तनुश्री सतीश माने या खेळाडूंनीही मोलाचे योगदान दिले.

या यशाबद्दल खासदार तथा सातारा जिल्हा हॅण्डबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नितीन काका पाटील, एकनाथ जगताप, चंद्रकांत ढमाळ, बाळकृष्ण पवार, चंद्रकांत शिंदे, विश्वनाथ पवार, जिजाबा पवार, दिलीप चव्हाण, दत्तात्रय वाघचवरे, विजय कासुर्डे, रविंद्र केंजळे, दुष्यंत जगदाळे, दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, कॅप्टन समीर पवार आदी मान्यवरांनी खेळाडूंचे व संघाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या संघाला सचिन लेंभे सर, अमित वाघांबरे आणि शिवराज वरे यांचे मार्गदर्शन लाभले.

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या या खेळाडूंनी राज्यस्तरावर मिळवलेले यश आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेली निवड ही जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

2) वाई एमआयडीसीतील कामगारांच्या हक्कांची पायमल्ली होतेय? कंपन्या आणि कंत्राटदारांची होणार चौकशी!

बोनस, पीएफ, ईएसआय अन् कायदेशीर सुविधांबाबत तक्रारी; कामगार आयुक्तांकडे निवेदन देणार – योगेश फाळके यांचा इशारा.

वाई, दि. २६ : उद्योगांच्या प्रगतीसाठी दिवस-रात्र राबणाऱ्या कामगारांनाच त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर प्रकार वाई औद्योगिक वसाहतीत सुरू असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. दिवाळी बोनस, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) यांसह शासनाने निर्धारित केलेल्या विविध कायदेशीर सुविधांचा लाभ कामगारांना मिळतो की नाही, याची आता सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्या, व्हेंडर्स आणि कंत्राटदारांच्या कारभाराची तपासणी करण्यासाठी शिवसेना शिव कामगार सेनेने पुढाकार घेतला आहे.

शिवसेना शिव कामगार सेनेचे योगेश फाळके यांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या महिन्यात सातारा जिल्हा कामगार आयुक्तांकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार आहे. वाई एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून कामगारांना मिळणाऱ्या वेतनासह सर्व कायदेशीर लाभांची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगांच्या उभारणीत आणि उत्पादनवाढीत कामगारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, उत्पादनासाठी घाम गाळणाऱ्या कामगारांनाच आपल्या हक्काच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागत असेल, तर ही बाब गंभीर आहे. काही कंपन्या आणि त्यांच्या माध्यमातून काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून कामगारांच्या कायदेशीर हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर कामगारांचे नियमित वेतन, दिवाळी बोनस, पीएफ व ईएसआयची रक्कम, वेतनातून केली जाणारी कपात, विविध भत्ते आणि कामगार कायद्यानुसार देय असलेल्या सुविधांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्याची मागणी केली जाणार आहे. विशेषतः कामगारांच्या पगारातून पीएफ व ईएसआयसाठी कपात केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये प्रत्यक्ष जमा झाली आहे की नाही, याचीही सखोल पडताळणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

चौकशीदरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटदारांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी योगेश फाळके यांनी केली आहे.

“कामगारांच्या घामावर उद्योगांची भरभराट होत असेल, तर त्याच कामगारांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार कदापि सहन केला जाणार नाही. वाई एमआयडीसीतील प्रत्येक कामगाराला योग्य वेतन, बोनस, पीएफ, ईएसआय आणि शासनाने ठरवून दिलेल्या सर्व कायदेशीर सुविधा मिळाल्याच पाहिजेत. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना शिव कामगार सेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील,” असा निर्धार योगेश फाळके यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कामगार आयुक्तांकडे निवेदन सादर झाल्यानंतर प्रशासन या तक्रारींची कितपत गंभीर दखल घेते, प्रत्यक्ष चौकशी कधी सुरू होते आणि त्यातून कोणत्या बाबी समोर येतात, याकडे वाई एमआयडीसीतील कामगारांसह औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

3) वाई:-ठरावांचा खेळ, आरोपांचा मेळ; वाईकरांच्या समस्यांचा मात्र छळ!

नगरसेवकांचा प्रशासनावर हल्लाबोल; ७८ विषयांच्या सभेत वाईच्या नागरी समस्यांचा पंचनामा!

कचरा डेपोतील कथित गैरव्यवहाराने खळबळ, डेंग्यूच्या मुद्द्यावर आरोग्य विभागाची कोंडी; फॉगिंग मशीनवरून भाजप-राष्ट्रवादीत संघर्ष, वृक्षतोड अन् भाजी मंडईवरूनही घमासान!

सातारा |
वाई दि. २६ : शहराच्या विकासाचे दावे एका बाजूला आणि नागरिकांच्या रोजच्या समस्यांचा डोंगर दुसऱ्या बाजूला… अशा विसंगत परिस्थितीत वाई नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. तब्बल ७८ विषयांच्या चर्चेत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. कचरा व्यवस्थापनातील अनागोंदी, कचरा डेपोतील कथित आर्थिक गैरव्यवहार, डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव, रस्त्यांची दुरवस्था, वृक्षतोडीचा वाद आणि भाजी मंडईचा रखडलेला प्रश्न यावरून सभागृहात प्रश्नांचा भडिमार झाला. फॉगिंग मशीनच्या फवारणीवरून भाजप आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आमनेसामने आल्याने राजकीय वातावरणही चांगलेच तापले. बहुतांश विषयांना मंजुरी मिळाली; मात्र वाईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस उपाययोजना कधी होणार, हा सवाल अनुत्तरितच राहिला.

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सभा पार पडली. सभेच्या प्रारंभीच नगराध्यक्षांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजीचा सूर लावला. कर्मचाऱ्यांवर मुख्याधिकाऱ्यांचाही वचक राहिलेला नाही, अशी खंत व्यक्त करत प्रशासनाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे काय, असा बोचरा सवाल त्यांनी केला. सर्वसाधारण सभेला संबंधित विभागांचे अधिकारीच उपस्थित नसल्याने त्यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले.

कचरा डेपोचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कर्मचाऱ्यांवर परस्पर पैसे घेतल्याचा आरोप!

शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा सभेत उघड झाला. दररोज १०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्या संस्थांनी स्वतःच्या स्तरावर प्रक्रिया करणे अपेक्षित असतानाही अशा संस्था पालिकेच्या कचरा डेपोमध्ये कचरा टाकत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. या संस्थांकडून आकारले जाणारे शुल्क, कचरा वाहतुकीसाठी उपलब्ध गाड्या आणि डेपोतील व्यवस्थापन याबाबत नगरसेवक संदीप जावळे यांनी आरोग्य विभागाची चांगलीच उलटतपासणी घेतली. मात्र, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत.

कचरा स्वीकारण्याचे दर कोणी निश्चित केले, असा सवाल नगराध्यक्ष सावंत यांनी उपस्थित केला. कचरा डेपोला साधे कंपाऊंड गेटही बसवता आले नाही, यावरून त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

नगरसेवक सचिन सावंत यांनी तर कचरा डेपोमध्ये कचरा टाकणाऱ्या संस्थांकडून कर्मचारी परस्पर पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार पुराव्यानिशी सिद्ध करू, असा इशारा देत कथित गैरव्यवहाराला तातडीने लगाम घालण्याची मागणी त्यांनी केली. या आरोपामुळे कचरा डेपोच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची गरज अधोरेखित झाली.

नगरसेविका डॉ. जागृती पोरे यांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई, कचरा टाकण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही, स्वच्छता स्पर्धा आणि प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. भाजी विक्रेत्यांनी स्वतःचा कचरा उचलून नेल्यास शुल्कात सवलत द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. नगरसेवक सचिन सावंत यांनी गडहिंग्लज पॅटर्ननुसार कापडी पिशव्यांचा वापर वाढवून स्थानिक व्यावसायिकांना रोजगाराची संधी देण्याचा पर्याय मांडला.

डेंग्यूचा विळखा घट्ट; आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर संतापाचा उद्रेक!

शहरातील डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येने सभागृहाचे तापमान वाढवले. नगरसेवक प्रसाद बनकर यांनी एका प्रभागातील रुग्णसंख्या नऊवरून १४ वर गेल्याचे सांगत आरोग्य विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. फॉगिंग मशीनची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी करत आरोग्य विभागाचे अधिकारी शहरात फिरताना दिसत नाहीत, मग नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

याच मुद्द्यावर नगरसेवक अजित शिंदे यांनी फॉगिंग मशीनच्या फवारणीमध्ये भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागांना प्राधान्य दिले जात असून अन्य प्रभागांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. या आरोपाने सभागृहात राजकीय ठिणगी पडली. भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. आरोप-प्रत्यारोपांनी सभागृह दणाणले. अपक्ष नगरसेवक सुशील खरात यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र वाद काही केल्या शमला नाही. अखेर नगराध्यक्षांनी पुढील विषय चर्चेला घेण्याची विनंती करत या वादावर पडदा टाकला.

मूलभूत सुविधांचा बोजवारा; विकासाच्या दाव्यांना नगरसेवकांचा आरसा!

वाईकरांना साध्या नागरी सुविधांसाठीही झगडावे लागत असल्याचा मुद्दा नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी आक्रमकपणे मांडला. पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, गटारांची झाकणे, पथदिवे आणि सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेचा पाढाच त्यांनी वाचला. नागरिकांना स्वच्छ शौचालयेही देता येत नसतील, तर विकासाच्या वल्गना करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून दाखवा, अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाला सुनावले.

२४ तास पाणीपुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमधून वाट काढताना नागरिकांना कसरत करावी लागत असून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक भारत खामकर यांनी केली.

वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून संघर्ष; नगराध्यक्षांचे राजीनाम्याचे खुले आव्हान!

भाजी मंडई परिसरातील झाडांचा प्रश्न सभेत पुन्हा ऐरणीवर आला. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून सुरू असलेल्या चर्चेचे पडसाद सभागृहात उमटले. डिव्हायडरमधील एकही झाड तोडलेले नाही, असा दावा नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केला. गेल्या सात वर्षांपासून पालिकेकडून या झाडांचे संगोपन केले जात असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांना वस्तुस्थिती तपासण्याचा सल्ला दिला.

माझ्याकडून चुकीचे काम झाल्याचे सिद्ध झाले, तर मी स्वतः राजीनामा देईन, असे खुले आव्हानही त्यांनी दिले.

मात्र, नगरसेवक भारत खामकर आणि गुरुप्रसाद चव्हाण यांनी ताम्हण झाडांच्या प्रश्नावर नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले. झाडांच्या बुंध्याभोवती केलेले काँक्रिटीकरण पर्यावरणाच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. दुष्काळसदृश परिस्थितीत नागरिक आणि जनावरांना पाणी मिळत नसताना भाजी मंडई वातानुकूलित करण्याच्या नियोजनावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे यांनी या विषयाची दुसरी बाजू मांडली. जुन्या झाडांच्या फांद्या पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने फांद्यांची छाटणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. झाडांच्या बुंध्याभोवतीचे सिमेंट काढून आळी तयार करून माती भरावी, अशी सूचना त्यांनी केली. अखेर भाजी मंडई आणि डिव्हायडरमधील झाडांची पाहणी करून वस्तुस्थिती तपासण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजी मंडईच्या पुनर्वसनाचा तिढा; अनामत रकमेवरूनही मतभेद!

वाईकरांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक दिवसांपासून रखडलेल्या भाजी मंडईच्या प्रश्नावर सभेत सविस्तर चर्चा झाली. जुन्या नगरपालिका इमारतीच्या जागेवर दुचाकी पार्किंग, शुद्ध पाण्याची सुविधा आणि स्वच्छतागृह उभारण्याचे नियोजन असल्याचे नगराध्यक्ष सावंत यांनी स्पष्ट केले. जुन्या व्यावसायिकांना प्रथम प्राधान्य देऊन भाजी विक्रेत्यांना सामंजस्याने जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवीन शेडमध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी ५० हजार रुपये अनामत रक्कम आणि दररोज ७० रुपये भाडे, तर आखीव पट्ट्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी १० हजार रुपये अनामत रक्कम आणि दररोज ५० रुपये भाडे, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

मात्र, नगरसेवक अजित शिंदे यांनी ५० हजार रुपयांच्या अनामत रकमेवर आक्षेप घेत शेडधारकांकडून २० हजार रुपयेच घ्यावेत, अशी मागणी केली. सर्व विक्रेत्यांना समान न्याय मिळावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मंडईतील स्वच्छतेसाठी दोन ट्रॅक्टर उभे केले जाणार असून विक्रेत्यांनी त्यामध्ये कचरा टाकणे बंधनकारक असेल. कायमस्वरूपी विक्रेत्यांची नोंदणी करून त्यांना बॅच दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांकडून अनामत रक्कम न घेता भाडे किंवा रोजची पावती आकारण्याचे नियोजन असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.

मात्र, सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांचे काय, हा प्रश्न अद्याप कायम आहे. नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी बाहेरील व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी केली. नगरसेविका केतकी पाटणे यांनी हातगाडीधारकांचा प्रश्न उपस्थित केला. सर्व विक्रेते आणि हातगाडीधारकांची स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. पुढील आठवड्यात भाजी मंडईचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

अग्निशमन विभागात सहा पदे रिक्त; स्मशानभूमीच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर!

वाई नगरपरिषदेसाठी अग्निशामक केंद्र उभारण्याच्या विषयावरही चर्चा झाली. अग्निशमन विभागातील सहा पदे रिक्त असून कर्मचारी भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

नगरसेवक शैलेंद्र देवकुळे यांनी स्मशानभूमीतील अस्वच्छता, कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता, शववाहिनी आणि गॅस शवदाहिनीच्या सुविधांचा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारला. नागरिकांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील सुविधांकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा या चर्चेतून व्यक्त झाली.

*७८ विषयांना मंजुरी; वाईकरांच्या पदरी प्रत्यक्ष दिलासा कधी?*

एकूण ७८ विषयांपैकी बहुतांश विषयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. स्वच्छता, आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा, वृक्षसंवर्धन आणि भाजी मंडई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. मात्र, सभागृहात होणारी चर्चा, मंजूर होणारे ठराव आणि प्रत्यक्षात नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा यांच्यातील तफावत पुन्हा एकदा समोर आली.

कचरा डेपोतील कथित गैरव्यवहार, डेंग्यूचा वाढता धोका, रस्त्यांची दुरवस्था, वृक्षसंवर्धनाचा वाद आणि भाजी मंडईचा रखडलेला प्रश्न यावर आता केवळ चर्चा करून चालणार नाही. प्रशासनाला प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे लागणार आहे.

वाईकरांना आता आश्वासनांचा पाऊस नको, तर समस्यांवर उपाययोजनांचा वर्षाव हवा आहे. ७८ विषयांच्या निमित्ताने सभागृहात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला; मात्र शहरातील समस्यांचे चित्र बदलण्यासाठी प्रशासन किती तत्परतेने मैदानात उतरते, याकडे आता वाईकरांचे लक्ष लागले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button