वाई:-“डोंगर पोखरले, गाव धोक्यात! वाईच्या पश्चिम भागावर ‘लँड माफिया’चा कहर; भूस्खलनाच्या संकटाला जबाबदार कोण?”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“डोंगर पोखरले, गाव धोक्यात! वाईच्या पश्चिम भागावर ‘लँड माफिया’चा कहर; भूस्खलनाच्या संकटाला जबाबदार कोण?”

बेसुमार उत्खननामुळे डोंगर खचले, शेती उद्ध्वस्त; महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह, संतप्त ग्रामस्थांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी.
सातारा | वाई, दि. ०९ :
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या बेसुमार उत्खननामुळे पुन्हा एकदा भूस्खलनाचे संकट गडद झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुणे-मुंबईतील काही धनदांडग्यांनी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करून उन्हाळ्यात डोंगर पोखरत केलेल्या उत्खननाचा परिणाम आता पावसाळ्यात भूस्खलनाच्या स्वरूपात समोर येत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
२०२२ मधील भूस्खलनात जोर, जांभळी खोऱ्यासह परिसरातील शेकडो एकर भातशेती, जनावरे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. त्या वेळी बचाव आणि पुनर्वसनाची मोठी मोहीम राबवण्यात आली होती. मात्र चार वर्षांनंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याने पुन्हा त्याच संकटाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, डोंगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि ब्लास्टिंग झाल्याने नैसर्गिक रचना कमकुवत झाली आहे. मुसळधार पावसात डोंगर खचत असून शेती वाहून जात आहे. अनेक ठिकाणी जमिनीत मोठमोठ्या भेगा पडल्या असून दगड-धोंड्यांचे ढिगारे साचल्याने शेती करणेही अशक्य बनले आहे.
याशिवाय, डोंगरकपारीत आलिशान बंगले उभारण्यासाठी रस्ते काढले जात असल्याचा आरोप करत, अशा कामांना परवानग्या कशा दिल्या जातात, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. २०२२ मधील नुकसानीनंतरची अनेक विकासकामे अद्याप अपूर्ण असून, यंदाच्या पावसात काही पूल वाहून गेले तर काही ओढ्यांनी मार्ग बदलल्याने नव्याने संकट निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी महसूल विभागातील संबंधित अधिकारी, बेकायदा उत्खनन करणारे आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“दर दोन वर्षांनी मृत्यूची भीती; आता सुरक्षित पुनर्वसन हाच पर्याय!”
वाईच्या पश्चिम भागातील अनेक कुटुंबे प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत धरून जगत आहेत. भूस्खलनाच्या धोक्यामुळे रात्रभर जागून काढावी लागते. “दर दोन वर्षांनी मृत्यूची भीती सहन करण्यापेक्षा शासनाने सुरक्षित ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करावे,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शासनाच्या उपाययोजना अपुऱ्या पडत असून, चुकीची किंमत सर्वसामान्यांना मोजावी लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
2) वाई:-धरणे भरू लागली… प्रशासन ‘अलर्ट’ मोडवर!
धोम-बलकवडीत जलसाठ्याची झपाट्याने वाढ; हजारो क्युसेक पाण्याची आवक, मात्र अद्याप विसर्ग नाही!

सातारा | वाई दि. ०९ : वाई तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धोम आणि धोम-बलकवडी धरणांतील जलसाठ्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून, दोन्ही धरणे भरावाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. धरणांमध्ये हजारो क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असली, तरी सध्या कोणत्याही माध्यमातून विसर्ग करण्यात आलेला नसल्याने जलसंपदा विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे.
धोम धरणाची पाणीपातळी ७३९.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, धरणातील एकूण जलसाठा २१६.६६ दशलक्ष घनमीटर (७.६५ टीएमसी) म्हणजे ५६.६७ टक्के झाला आहे. उपयुक्त जलसाठा १६५.३९ दशलक्ष घनमीटर (५.८४ टीएमसी) म्हणजे ४९.९६ टक्के इतका आहे. आज ८,६८१ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, स्पिलवे, वीजगृह, कालवे, डीएलबीसी, डीआरबीसी, गळती किंवा आसरे बोगद्यातून अद्याप कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही.
दुसरीकडे, धोम-बलकवडी धरणाची पाणीपातळी ८०४.९० मीटर झाली असून, एकूण जलसाठा ७९.४५१ दशलक्ष घनमीटर (२.८१ टीएमसी) म्हणजे ६८.७७ टक्के झाला आहे. उपयुक्त जलसाठा ७६.०६१ दशलक्ष घनमीटर (२.६९ टीएमसी) म्हणजे ६७.८३ टक्के आहे. या धरणातही ४,४१३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून, ICPO, डिस्चार्ज व्हॉल्व्ह, स्पिलवे आणि जललक्ष्मी या कोणत्याही माध्यमातून सध्या विसर्ग करण्यात आलेला नाही.
धोम परिसरात आज १० मिमी, तर धोम-बलकवडी परिसरात ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हंगामातील एकूण पर्जन्यमान अनुक्रमे ४९९ मिमी आणि १,४५५ मिमी इतके झाले आहे.
सध्या धरणांतून विसर्ग नसला, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थितीनुसार कोणत्याही क्षणी निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
3) वाई:-राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत साताऱ्याचा दमदार डंका!

ब्लॅक ड्रॅगन अकॅडमीची पदकांची लयलूट; सुवर्णासह ६ पदकांवर जिल्ह्याची मोहोर
सातारा | वाई, दि. ०९ :
अहिल्यानगर येथे ३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा २०२६-२७ मध्ये सातारा जिल्ह्याच्या ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्याचा झेंडा राज्यभर दिमाखात फडकावला. वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील १३ खेळाडूंनी साताऱ्याचे प्रतिनिधित्व केले असून, त्यापैकी सहा खेळाडूंनी एक सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण सहा पदके जिंकत जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात आणखी एक मानाचा अध्याय लिहिला.
अकॅडमीचे संचालक विशाल आबासाहेब कुमठे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि जिद्दीचे दर्शन घडवले. आकांक्षा बनसोडे हिने सुवर्णपदक पटकावत स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी केली. अद्वैत परामणे, शौर्य शेंडगे आणि तृषा धनावले यांनी रौप्यपदकांची कमाई केली, तर आयुष सपकाळ आणि मनस्वी पिसाळ यांनी कांस्यपदके जिंकून साताऱ्याच्या यशात मोलाची भर घातली.
स्पर्धेत मंजुषा गायकवाड, प्राची बेलोशे, श्रुती कदम, अनवित जगताप, आरोही केलगणे, अथर्व जगताप आणि दिव्या बनसोडे यांनी पदक जिंकता आले नसले तरी त्यांच्या लढाऊ आणि दर्जेदार खेळाने परीक्षक व प्रेक्षकांची दाद मिळवली.
या यशाबद्दल बोलताना संचालक विशाल कुमठे म्हणाले, “ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये अफाट क्षमता आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि पालकांचा पाठिंबा मिळाल्यास हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरही साताऱ्याचा झेंडा अभिमानाने फडकवतील. आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आणखी मोठे यश मिळवण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
या यशामागे सहकारी प्रशिक्षक विष्णू खोत, रिद्धी शिरसागर आणि प्रेमजीत चव्हाण यांचे तांत्रिक मार्गदर्शन तसेच पालक प्रतिनिधी स्वाती परामणे यांचे सहकार्य लाभल्याचे अकॅडमीतर्फे सांगण्यात आले.
खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सातारा जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4) “महाबळेश्वर–तापोळा मार्गावर ‘डेथ झोन’चा इशारा! ५० मीटर रस्ता खचण्याच्या उंबरठ्यावर; पर्यटकांनी जीव धोक्यात.

महाबळेश्वर–तापोळा मार्गावर रस्ता खचण्याचा धोका; ५० मीटर भाग धोकादायक, वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा.
सातारा | महाबळेश्वर, दि. ०९ :
सातारा–कास–बामणोली–तापोळा–महाबळेश्वर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गावरील प्रजिमा-२६ मध्ये कि.मी. ९७/४०० येथे सुमारे ५० मीटर लांबीचा रस्त्याचा अर्धा भाग स्लिप सर्कलमुळे खचण्याच्या स्थितीत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणचा धोका अधिकच वाढला असून, प्रशासनाने वाहनचालक आणि पर्यटकांना अत्यंत सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.
सततच्या पावसामुळे रस्त्याखालची माती सरकल्याने हा भाग कमकुवत झाला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवणे, समोरून येणाऱ्या वाहनांना प्राधान्य देणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संबंधित विभागाकडून धोकादायक ठिकाणाची सातत्याने पाहणी केली जात असून, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी शक्यतो अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी महत्त्वाच्या सूचना : • धोकादायक ठिकाणी वाहनाचा वेग कमी ठेवा.
• ओव्हरटेक करण्याचे टाळा.
• सुरक्षित अंतर राखून वाहन चालवा.
• प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे पालन करा.
• मुसळधार पावसात शक्यतो अनावश्यक प्रवास टाळा.
5) साताऱ्याची तहान वाढली! सांबरवाडीत भूस्खलनाने कास जलवाहिनी तुटली; शहराचा पाणीपुरवठा ठप्प.

सातारा | दि. ०९ : मुसळधार पावसाने सातारा शहराला मोठा फटका बसला आहे. सांबरवाडी येथे झालेल्या भीषण भूस्खलनामुळे कास धरणातून शहराकडे येणारी मुख्य जलवाहिनी तुटल्याने शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
गुरुकुल टाकी, कात्रेवाडा, व्यंकटपूरा, भैरोबा टाकी परिसर, पॉवर हाऊस, झोपडपट्टी भाग, पोळवस्ती, डोंगराळ भागातील वस्त्या, सोसायट्या तसेच शाळा, रुग्णालये, सार्वजनिक संस्था आणि गुरुत्व नलिकेवरील थेट जोडणीधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
घटनेनंतर नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, भूस्खलनाखाली गाडलेली जलवाहिनी शोधून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा अत्यंत जपून वापर करण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनीचे नुकसान मोठे असल्याने पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो.
6) सातारा:-कास रस्त्यावर पोलिसांचा ‘ॲक्शन मोड’!
नाकाबंदी तोडून पळणारा तरुण जेरबंद; देशी पिस्तूल, जिवंत काडतूससह १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

कास रस्त्यावरील सांबरवाडी येथे सातारा तालुका पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत नाकाबंदी तोडून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतूस, दुचाकी आणि दोन मोबाईल असा तब्बल १ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव श्रेयश दशरथ जाधव (वय २०, रा. रविवार पेठ, सातारा) असे आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर कास परिसरातील धबधबे, घाटमाथा आणि नदीकाठच्या भागात पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन सांबरवाडी येथे पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. मंगळवार (दि. ७) रोजी सायंकाळी सुमारे ४.५० वाजता मास्क घालून दुचाकीवरून जाणाऱ्या संशयिताला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने नाकाबंदी तोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने ओळख, वाहनाची कागदपत्रे आणि परवाना दाखविण्यास टाळाटाळ केल्याने संशय अधिक बळावला. पंचांसमक्ष झडती घेतली असता दुचाकीच्या डिकीत सिल्वर रंगाचे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दोन मोबाईल आणि दुचाकी असा एकूण १.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनू शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सोनू शिंदे तसेच पोलीस हवालदार मालोजी चव्हाण, रायसिंग घोरपडे, अजित निकम आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
7) फलटण:-खामगावावर काळाचा घाला! विजेच्या एका धक्क्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; सातारा जिल्हा शोकसागरात.

सातारा | फलटण, दि. ९ : फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे घडलेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. घरावरून जाणाऱ्या वीजवाहिनीच्या संपर्कामुळे लोखंडी तारेत उतरलेल्या विद्युतप्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलगा आणि मुलगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही क्षणांत हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने गावासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये सचिन सतीश शिंदे (२६), सतीश उर्फ पिसुराड्या किसन शिंदे (४५), गंगू सतीश शिंदे (४०) आणि आरती सतीश शिंदे (२४) यांचा समावेश आहे.
बुधवारी पहाटे सचिन शिंदे हे घरावरील केबलला आधार म्हणून लावलेल्या लोखंडी तारेजवळ काम करत असताना त्या तारेत आधीच विद्युतप्रवाह उतरलेला होता. तारेचा स्पर्श होताच त्यांना विजेचा जबरदस्त धक्का बसला. मुलाचा आक्रोश ऐकून धावलेल्या आई-वडिलांनाही विजेने कवेत घेतले. त्यानंतर भावाला व आई-वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या आरतीलाही विजेचा धक्का बसून तिचाही जागीच मृत्यू झाला.
या भीषण प्रसंगी सचिन यांची पत्नी शीतल शिंदे यांनी प्रसंगावधान राखत काठीच्या साहाय्याने लोखंडी तार दूर केली. मात्र, तोपर्यंत चौघांच्याही प्राणज्योती मालवल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शवविच्छेदनानंतर चारही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून वीजसुरक्षेबाबत अत्यंत गंभीर इशारा आहे. काही क्षणांत संपूर्ण संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या दुर्घटनेने खामगावसह संपूर्ण फलटण तालुका सुन्न झाला असून, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर एकच प्रश्न आहे—अशी वेळ पुन्हा कोणावरही येऊ नये!




